रामोपासनेचे प्रयोजन

    28-Oct-2020
Total Views | 156

ramdaswami_1  H



रामोपासना ही सर्वांसाठी आवश्यक अट होती. आजही सर्व रामदासी मठांतून रामाची काकड आरती, पूजाअर्चा या गोष्टी कटाक्षाने पाळून रामोपासना सांभाळली जाते, तथापि रामोपासना सांभाळण्यासाठी प्रथम रामाचे दास्य स्वीकारले पाहिजे. समर्थ स्वत:ला रामदास म्हणजे रामाचा दास म्हणवून घेत असत. हे ‘रामदास्य’ कसे असते, त्यासाठी महंतांनी भक्तांनी आचरण ठेवले, हा आजच्या लेखाचा प्रमुख विषय आहे.


श्री रामदासस्वामींनी समर्थ संप्रदायात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांसाठी २०लक्षणे ठरवून दिली होती, त्यावर मी एक स्वतंत्र लेख गेल्या वर्षी लिहिला होता. समर्थ संप्रदायात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सांप्रदायिकांना काही अटी असत. त्यात प्रामुख्याने लिहिणे, वाचणे, अर्थांतर सांगणे, आशंका निवृत्ती म्हणजे श्रोत्यांनी पारमार्थिक शंका विचारली असता त्या श्रोत्यांचे समाधान करुन त्याच्या शंकेचे निवारण करणे, या अटींचा समावेश होता. तसेच गाणे, नाचणे, तालज्ञान या कलाही शिष्याला अवगत असाव्यात, असा स्वामींचा आग्रह होता. कारण, ज्याला लोकसमुदायात जाऊन काम करायचे आहे, अध्यात्माचा व भक्तिमार्गाचा प्रचार करायचा आहे. त्याला गायन, तालज्ञान, नर्तन इत्यादी कला अवगत असल्या पाहिजेत, हे स्वाभाविकच होते, त्याचबरोबर वैराग्य, विवेक, लोक राजी राखणे हे चारित्र्यवार गुण संप्रद्रायातील प्रत्येकाला आवश्यक होते, या सर्व अटींत शेवटची अट रामोपासना ही महत्त्वाची होती. तिचे पालन करणे बंधनकारक होते, यावरुन समर्थ संप्रदायात प्रवेश मिळणे हे येरागबाळ्याचे काम नव्हते. तत्कालीन इतर पंथांत प्रवेशासाठी अशा कडक अटी पाळण्याचे बंधन नव्हते. त्यामुळे तिथे प्रवेश सोपा होता. परंतु, स्वामींना सांप्रदायिकांची नुसती संख्या वाढवायची नव्हती, तर संघटना उभारताना त्यांचा भर शिष्यांच्या चारित्र्यावर आणि गुणवत्तेवर होता हे यातून दिसून येते. रामोपासना ही सर्वांसाठी आवश्यक अट होती. आजही सर्व रामदासी मठांतून रामाची काकड आरती, पूजाअर्चा या गोष्टी कटाक्षाने पाळून रामोपासना सांभाळली जाते, तथापि रामोपासना सांभाळण्यासाठी प्रथम रामाचे दास्य स्वीकारले पाहिजे. समर्थ स्वत:ला रामदास म्हणजे रामाचा दास म्हणवून घेत असत. हे ‘रामदास्य’ कसे असते, त्यासाठी महंतांनी भक्तांनी आचरण ठेवले, हा आजच्या लेखाचा प्रमुख विषय आहे.


सांप्रदायिकांसाठी जी लक्षणे स्वामींनी ठरवून दिली त्यासंबंधी चर्चा स्वामींनी दासबोध ग्रंथात मधून मधून केली आहे. परंतु, सर्व २०लक्षणे एके ठिकाणी मिळावी म्हणून समर्थांनी ‘श्री संप्रदायाची लक्षणे’ हे स्फूट प्रकरण लिहिले आहे. रामोपासना करायची म्हणजे कर्म, ज्ञान आणि उपासना यांचा सुरेख संगम साधला पाहिजे, अशी भूमिका रामदासांनी घेतली आहे. त्या उपासना पद्धतीत त्यांनी राजकारणही समाविष्ट केले आहे. स्वामींनी सांगितलेले प्रपंच विज्ञान हा राजकारणाचा भाग आहे तथापि भागवत संप्रदायातील वारकरी पंथाचे भक्त समर्थ संप्रदायांचा उल्लेख ‘धारकरी’ म्हणून करतात. त्यामुळे वारकरी पंथात समर्थ रामदास स्वामी रचित अभंग म्हणयाची प्रथा नाही, वारकरी हे ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत सर्व संतांचे अभंग गातात. त्यानंतरच्या संतांचे अभंग त्यांच्या कीर्तनात घेण्याची प्रथा वारकरी संप्रदायात नाही, अपवाद फक्त निळोबाराय यांचा आहे. वारकरी भले समर्थ संप्रदायिकांचा उल्लेख ‘धारकरी’ म्हणून करीत, पण समर्थ रामदास भक्तिपंथ मानणारे, आचरणारे होते. भक्तीचे महत्त्व स्वामींनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत ठळकपणे सांगितले आहे. ‘भक्तिचोनि योगे देव। निश्चये पावती मानव। ऐसा आहे अभिप्राव। इथे ग्रंथी॥’ (दासबोध) आणि ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ (मनाचे श्लोक). स्वामी जेव्हा पंढरपूरला गेले होते तेव्हा त्यांना विठोबाच्या जागी रामाचे दर्शन झाले होते, हे सर्वांना माहीत आहे. देवाच्या भक्तीशिवाय मानवी जीवनाला काही अर्थ नाही असे त्यांनी एक अभंगात म्हटले आहे.
आयुष्य हे थोडे फार आटाआटी ।
कठीण शेवटी वृद्धपण ॥
एकलोचि यावे, एकलोचि जावे ।
मध्येचि स्वभावे मायाजाळ । ।
मायाजाळ तुटे तरी देव भेटे ।
दास म्हणे खोटे भक्तिहीण ॥
देवाच्या भक्तीशिवाय मानवीजीवन खोटे आहे, व्यर्थ आहे, असा निष्कर्ष स्वामींनी काढला आहे. परंतु, आपल्या संप्रदायात आलेल्या शिष्यांनी भक्ती करुन अथवा आत्मज्ञान प्राप्त करुन त्यातच तल्लीन व्हावे, असे समर्थांना कधीच वाटले नाही. आपल्याला मुक्ती मिळावी म्हणजे आता काही कर्तव्य उरले नाही, अशी धारणा स्वामींनी त्यांच्या शिष्यांची होऊ दिली नाही. याबाबत समर्थांचे विचार स्पष्ट होते. त्यांच्या मते, आपल्या शिष्यांनी लोकांमध्ये जाऊन मिसळले पाहिजे, त्यांनी लोकांना अज्ञानातून बाहेर काढले पाहिजे, त्यांचे प्रबोधन केले पाहिजे, लोकांना प्रपंच आणि परमार्थ सुखाने करायची प्रेरणा दिली पाहिजे, त्याचबरोबर शिष्यांनी राजकारणही केले पाहिजे, असा स्वामींचा आग्रह होता. असा नेता लोकांना राजी राखतो आपल्या चारित्र्यसंपन्न व्यक्तित्वाने तो लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतो, संप्रदायातील प्रत्येकाला लोकसंग्रह केला पाहिजे, पण तो स्वार्थी हेतूने नसून सात्विक पातळीवर केला पाहिजे. त्यासाठी रामोपासना ही अत्यंत आवश्यक आहे. रामोपासनेद्वारा केलेला लोकसंग्रह हा ईश्वरार्पण बुद्धीने केलेला असल्यामुळे तो समाजकार्यासाठी उपयोगी ठरतो. समर्थांनी नेहमी समाजसापेक्ष दृष्टी ठेवून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली आहे, समर्थांनी आपल्या शिष्यांद्वारा ज्ञानोपासना व निष्कलंक चारित्र्यांचे आदर्श लोकांसमोर ठेवून लोकांना त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा दिली आहे. समाजसेवेचे हे अंग दुर्लक्षित आहे.


समर्थ रामदासांनी जी २० लक्षणे संप्रदायासाठी सांगितली आहेत, ती तंतोतंत पाळणारा शिष्य हा नक्कीच अष्टावधानी असला पाहिजे. संप्रदायासाठी या कसोट्या सांगून विद्वान, ज्ञानोपासक, ग्रंथ अभ्यासाबरोबर ग्रंथनिर्मिती करणारे, गायन, ताल, नृत्य इ. कला अवगत असणारे, कलाकार निरिच्छ, चारित्र्यसंपन्न, निराभिमानी, अशाच शिष्यांची जुळावाजुळव समर्थांनी केली आहे. हे शिष्य राजकारणही जाणणारे होते. प्रपंच विज्ञानाचे अभ्यासक होते. समाजधारणेचे, संस्कृती रक्षणाचे हे कार्य करताना ते रामाचे कार्य आहे, मी रामाचा सेवक आहे. या भावनेतून करायचे आहे. यासाठी ‘रामोपासना’ ही अट त्यांनी शेवटी ठेवली आहे. ‘रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाट न्यावी’ असे समर्थांचे ध्येय होते. यासाठी शिष्यांनी रामोपासना सोडता येत नसे. रामदास्य एकदा अंगीकारल्यावर ते प्रशंसनीय कसे करता येईल, याचा विचार केला पाहिजे. यासाठी समर्थांनी तरीच ‘श्लाघ्यवाणे। रामदास्य।’ या नावाचे एक स्फुट लिहिले आहे. त्यातून सांप्रदायिकांना एक प्रकारे अर्थगर्भ शब्दसमुच्चय समर्थांनी दिला आहे. हे स्फुट केवळ सहा कडव्यांचे असले, तरी रामदासी संप्रदायासाठी ते चिंतनीय व मननीय आहे, यात शंका नाही. त्या स्फुटाच्या प्रत्येक कडव्यात ‘तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य’ हे पालुपद आहे. त्यामुळे त्यातील पहिली ओळ देऊन त्यातील अर्थगर्भता शोधण्याचा प्रयत्न केल्यास रामदासी संप्रदाय यशस्वी करण्यासाठी शिष्यांच्या अंगी कोणते गुण प्रकर्षाने असावेत, याचा उलगडा होतो ते स्फुट असे आहे.
काया वाचा मने। यथार्थ रामी मिळणे ।
तरीच श्लाघ्यवाणे। रामदास्य ॥१॥
पहिल्याच कडव्यात समर्थांनी सांगून टाकले की, रामाचे दास्य करायचे मग आपण काया, वाचा, मनाने, रामरुपाशी मिळून गेले पाहिजे. रामी मिळणे म्हणजे रामाच्या अंगी असेल्या गुणांशी एकरुप होऊन गेले पाहिजे. राम म्हणजे मूर्तिमंत सत्य नैतिकतेचा आणि सदाचाराचा आदर्श, संकटांचा डोंगर कोसळला तरी वचन पाळणारा आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ आणि ही कौटुंबिक नाती ओलांडून एक आदर्श राज्यकर्ता. जगातील सारे आदर्श ज्याच्या ठिकाणी एकवटले आहेत असा संन्यस्त राजा, वैभवशाही विरक्त अशा रामाशी मिळून जाणारा रामदासी महंत समर्थांना हवा होता.

(अपूर्ण)

- सुरेश जाखडी
७७३८७७८३२२
svjakhadi@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121