संतांचा मराठी भाषा अभिमान

    दिनांक  01-Jan-2020 22:26:25
|

p8_1  H x W: 0आज मातृभाषेत शिक्षण द्यावे की आंग्लभाषेत द्यावे, यावर वाद होत आहेत. मराठी भाषेबद्दल तावातावानेबोलणारे आंग्लभाषेला प्राधान्य देताना दिसतात. कारण, आंग्लभाषेची आपल्या समाजातील व विविध ज्ञानशास्त्रांतील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मराठी भाषेच्या अभिमानाची आपण कितीही वल्गना केली तरी आंग्लभाषेचा वरचढपणा मान्य केल्या वाचून आपल्याला गत्यंतर नसते. पण पुढील पिढी मराठी भाषेपासूनवंचित राहिली, तर संतसाहित्यातील ज्ञानठेव्याला ती मुकणार हे नक्की! त्याचप्रमाणे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान संस्कृत भाषेतच दिले गेले पाहिजे, असा दुराग्रह एकेकाळी रूढ होता. प्राकृतभाषेत हे ज्ञान सांगणे पाप समजले जाई. अध्यात्म क्षेत्रात तत्कालीन पंडितांचा संस्कृत भाषेविषयीआग्रह असला तरी सर्वच मराठी भाषेत देण्याला प्राधान्य दिले. ज्ञानाचा बुद्धीशी अन्योन्य संबंध असला तरी ज्ञानाला कोणत्या तरी भाषेचा साज चढवावा लागतो. भाषेमुळे ज्ञानाला कोणत्या तरी भाषेचा साज चढवावा लागतो. भाषेमुळे ज्ञानाला ज्ञानपण प्राप्त होते. असे असताना समाजातील सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत जर ज्ञान दिले गेले, तर सर्व निश्चितच समाजाच्या हिताचे ठरणार आहे. ही भूमिका मराठी संतांनी समजून घेऊन दुराग्रही लोकांचा संस्कृत भाषेच्या आग्रहाचा चिवट भ्रम दूर केला. परंपरावादी दुराग्रही लोकांनी त्यावेळी संतांना त्रास दिला, हे सर्वविदित आहे. तो छळ संतांनी आनंदाने सोसला, पण मराठीची कास सोडली नाही.


माझा मराठीचि बोलु कवीतके। अमृतातेही पैजेसी जिंके।असा सार्थ अभिमान प्रकट करून ज्ञानेश्वरांनी गीतेतीलतत्त्वज्ञान मराठीतून सांगितले आणि या मराठीनगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. एकनाथांनी काशीच्या पंडितांच्या विरोध असतानाही मराठीत ग्रंथरचना केली. मराठी भाषेबद्दल बोलताना, ‘संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काये चोरे निर्मिली।’ असा परखड सवाल एकनाथांनी केला. त्यांनी ‘एकनाथी भागवत’, ‘भावार्थ रामायण’ मराठीतूनच लिहिले. ज्यांना परमार्थदृष्टी नाही आणि ‘अध्यात्म’ म्हणजे काय याची कल्पनाही नाही, असे लोक संतानी केलेल्या मराठी भाषेच्या वापरावर असतो. संस्कृतसारखी देवभाषा सोडून मराठीत कशाला लिहायचे, असा त्यांचा प्रश्न असतो. तथापि भाषेत लिहिला मराठीला नावे ठेवणार्‍यांना रामदासांनी सडेतोडपणे मूर्ख ठरवले आहे.


येक म्हणती मर्‍हाटे काये ।

हे तो भल्यांसि ऐको नये ।

ती मूर्ख नेणती सोये। अर्थान्वयाची ॥


भल्या
(चांगल्या) माणसांनी मराठीतील ग्रंथ ऐकू नये असे म्हणणार्‍यांना समर्थांनी ‘मूर्ख’ असे संबोधून फटकारले आहे. समर्थ पुढे सांगतात, लोखंडाच्या पेटीत रत्ने साठवून ती पेटी या मूर्खांना दिली, तर हे कमनशिबी पेटी लोखंडाची म्हणून टाकून देतील. त्याप्रमाणे हे पंडित मराठी भाषेबद्दल बोलत असतात. मराठी भाषेत जो अर्थ भरलेला आहे, मराठीतून वेदान्ताचे सिद्धांत सांगितलेले आहेत. ते यांना समजत नाहीत. म्हणून हे मंदबुद्धीचे विद्वान मराठीचा त्याग करतात.

आहाच सापडता धन। त्याग करणे मूर्खपण।

द्रव्य घ्यावे सांठवण। पाहोचि नये॥


फारसे प्रयत्न न करता सहजगत्या जर द्रव्य सापडले तर ते कशात साठवले आहे
, याचा विचार न करता ते द्रव्य घ्यावे. तसे केले नाही तर तो मूर्खपणा ठरेल. समर्थ पुढे म्हणतात, “समजा परिस आपल्या अंगणात पडलेला आहे किंवा इच्छिलेली वस्तू देणार्‍या ‘चिंतामणी’सारखे रत्न रस्त्यात पडलेले दिसले, म्हणून कोणी त्याला टाकून देत नाही. त्याप्रमाणे अद्वैत आत्मज्ञान मराठी भाषेत समजायला सोपे असेल तर ते कशाला टाकून घ्यायचे? ते घेण्यात शहाणपणा आहे. ते ज्ञान अवश्य घ्यावे.


तैसे प्राकृती अद्वैत। सुगम आणी सुप्रचित ।

अधात्म लाभे अकस्मात। तरी अवश्य घ्यावें॥


वेदान्तज्ञान संस्कृतातून मिळो अथवा मराठीतून मिळो
, ते कळण्यासाठी सत्समागम पाहिजे. सत्समागमामुळे शास्त्रार्थ सहजपणे हाताशी येतो. भाषेला महत्त्व देण्याचे फारसे कारण नाही. अशारीतीने सांगितलेले मराठीचे गोडवे संस्कृतपे्रमी पंडितांना आवडणार नाहीत. म्हणून अशा विद्वानांसाठी समर्थांनी दशक ७, समास १ मध्ये भाषाभेदाबाबत एक संस्कृत श्लोक उद्धृत केला आहे.


भाषाभेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः।

पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते॥


भाषेभाषेत भेद असले तरी अर्थ एकच असतो
, जसे खाण्याची एक वस्तू भिन्न भिन्न आकाराच्या भांड्यात ठेवली, म्हणून तिच्या चवीत काही फरक पडणार नाही. भाषा बदलली म्हणून काही अर्थाची हानी होत नाही. मराठीत ग्रंथरचना झाली म्हणून संस्कृतमध्ये केवढा अर्थ भरलेला आहे हे लक्षात येते. संस्कृतमध्ये गुप्तपणे वास करणारे अर्थ ते ग्रंथ मराठीतून आले म्हणून समजले.


प्राकृताकरिता। संस्कृताची सार्थकता।

येर्‍हवी त्या गुप्तार्था । कोण जाणे॥


शेवटी समर्थ सांगतात
, अर्थ हे सार आहे. भाषा असार आहे. पण माणूस केवळ अभिमानाने असले वाद वाढवतो. अहंकाराचे असे हे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी संस्कृत भाषेचा अहंकार हा एक आहे. असल्या या अहंकाराने मोक्षाचीवाट अडवून धरली आहे. समर्थांनी खूप वाङ्मय निमिर्ती केली, पण सर्व ग्रंथ मराठीतूनच लिहिले. रामदासांच्या काळी गद्याचे माध्यम रूढ व लोकप्रिय नव्हते. तसे असते तर त्यांचे ओजस्वी भाषेतील मराठीचा अभिमान सांगणारे निबंध वाचायला सर्वांना आवडेल असते.

- सुरेश जाखडी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.