अन्न व ज्ञान लाभो देवा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |



ते स्याम देव वरूण ते मित्र सूरिभि: सह।

इषं स्वश्च धीमहि॥

(ऋग्वेद-७.६६.९)

 

अन्वयार्थ-

 

(देव) हे दिव्य गुणांनी परिपूर्ण अशा महान परमेश्वरा! (वरुण) हे सर्वजनांकडून वरल्या जाणाऱ्या ईश्वरा! (मित्र) हे सर्व जगाचे कल्याण, रक्षण करणाऱ्या भगवंता! आम्ही सर्व लोक (सूरिभि: सह) तुझ्या प्रिय अशा विद्वान् धर्मात्मा व ज्ञानी सज्जनांसमवेत (ते) तुझे निकटचे, जवळचे (स्याम) होवोत. (च) आणि आम्ही (इषं) अन्न व (स्व:) प्रकाशाला (धीमहि) धारण करोत.

 

विवेचन -

 

मागावे त्यालाच, ज्याच्यामध्ये देण्याचे सामर्थ्य असते. देणारा त्या-त्या गोष्टीने सुसंपन्नही असावयास हवा. पुष्कळ धन-वैभवाने युक्त असा श्रीमंत माणूस जर चेंगट असेल तर तो काय देणार? आणि ज्याला देण्याची इच्छा आहे, पण त्या जवळ काहीच नाही! अशा दीन-दरिद्री माणसाचा काय उपयोग? या दोन्ही प्रकारच्या व्यक्तीपुढे हात पसरणे म्हणजे आपला अपमान करून घेणे होय. तसेच याचकदेखील सुपात्र असावा. पात्रविहीन भिकाऱ्यांना देणे म्हणजे त्या दानाचा एकाप्रकारे अवमान नव्हे का?

 

प्रस्तुत मंत्रात परमेश्वराकरिता देव, वरुण आणि मित्र अशी तीन संबोधने आली आहेत. निरुक्तशास्त्रात या शब्दाची व्युत्पत्ती अतिशय सुंदररीत्या केली आहे. निरुक्त शास्त्रात 'देव' शब्दाची व्याख्या अतिशय समर्पकपणे केलेली आहे, ती अशी 'देवो दानात्, द्योतनात दीपनात् द्युस्थानो भवतीति।' जो सतत साऱ्या जगाला ज्ञान, गुण, धनवैभवाचे दान करतो, जो स्वप्रकाशाने समग्र विश्वाला चमकवतो, असा तो देव! तसेच जो वरुण म्हणजे जगातील सर्व प्राणिसमूहाकडून वरला, स्वीकारला व निवडला जातो असो वरुण! आणि आपल्या स्नेहार्द भावनेने रक्षण करतो, तो 'मित्र' होय. हे सर्व भाव त्या महान ईश्वरामध्ये दडले आहेत. तो सर्वांचा देव वरुण आणि मित्र आहे. अशा भगवंताशी आपले नाते जडले पाहिजे. महर्षी दयानंदांनी 'सत्यार्थ प्रकाश' ग्रंथाच्या पहिल्या समुल्लासातील 'ईश्वर नाम व्याख्या' प्रकरणात या तिन्हींची समर्पक अशी व्याख्या केली आहे. अशा त्या परमेश्वराचे सान्निध्य जो मिळवण्यासाठी धडपडतो, त्याची उपासना करतो, असा भक्त कदापि दु:ख किंवा दारिद्य्राला प्राप्त होत नाही. म्हणून आम्हाला ईश्वरीय शक्तीला साक्षी मानून प्रत्येक कर्म केले पाहिजे. क्षणोक्षणी, पदोपदी त्या परमेश्वराला आपल्या जवळ मानल्यास मनातील भय, शंका दूर होतात आणि आत्मा बलिष्ट होतो. कितीही मोठी संकटे कोसळली, तर त्यांना सहन करण्याची इच्छाशक्ती वाढते. म्हणूनच तर संत नेहमी त्या दिव्य शक्तीला निकटस्थ होऊन अनुभवतात-

 

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती।

चालविसी हाती धरोनिया॥

 

परमेश्वराचे सान्निध्य मिळवावयाचे झाल्यास ज्ञानी व विद्वानांची गरज असते. म्हणून मंत्रात 'सूरिभि: सह।' असा उल्लेख आला आहे. अज्ञानी व निर्बुद्ध लोक स्वत:ही सन्मानपूर्वक जगत नाहीत आणि दुसऱ्यांनाही जगू देत नाहीत. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा तरी कोण करणार? जगाला सत्याचा व ईश्वराचा मार्ग ते काय म्हणून दाखविणार? म्हणूनच नेहमी संत व विद्वान मंडळींची संगत अत्यावश्यक आहे. नेहमी सूरीजनांचे सान्निध्य लाभणे इष्ट असते. आचार्य भर्तृहरी सत्संगाचे महत्त्व विशद करताना म्हणतात - 'सत्संगति: कथय किं न करोति पुंसाम्।' म्हणजेच सांग मित्रा! सज्जनांची संगती ही मानवाचे कोणते कल्याण साधत नाही? 'सत्संगति' म्हणजेच पवित्र तीर्थ होय. 'सत्संगति परमा गति:।' सत्संगामुळे मनुष्य उत्तम गतीला प्राप्त होतो. महापुरुषांचे सान्निध्य प्राप्त करीत देवाकडे काय मागावे? याचे दिग्दर्शन मंत्रात केले आहे. त्या महान ईश्वराकडे अन्न व ज्ञान या दोन गोष्टींना धारण करविण्याची अर्चना केली आहे. 'अन्न' ही प्राणिसमूहाची आद्य गरज! जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी मुखात पडते ते मातेचे दुग्धरुपी अन्न! जसा-जसा तो मोठा होत जातो, तसे-तसे अन्नाचे स्वरूप बदलते. ते मिळविण्यासाठी त्याची सतत धडपड सुरू होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो अन्न व धन मिळवितो. पण हे अन्न त्याला ज्ञानाशिवाय भक्षता येत नाही. आज विविध प्रकारच्या स्वादिष्ट अन्न पदार्थांचे भांडार उपलब्ध असूनही दुर्दैवाने त्याला आस्वादण्याचे किंवा आहारविधीचे ज्ञानच नाही. यामुळे ते सर्व अन्न विषासमान बनते. म्हणून अन्नासोबतच त्याच्या सेवनाचे ज्ञानदेखील हवे.

 

परमेश्वराची व्यवस्था किती सूक्ष्म व परिपूर्ण आहे, पाहा! प्रत्येकाला जगण्याचे साधन म्हणून 'अन्न' तर दिले, पण त्याच्यासोबतच ते कोणत्या प्रकारचे, किती, कसे आणि केव्हा खावे, याची जाणीवही करून दिली आहे. त्या महान विश्वविधात्या भगवंताची ही नियमांची सीमारेषा ज्याने ओलांडली, तो मात्र रोगग्रस्त होऊन 'शरीर'रूपी भवनाला लवकरच उद्ध्वस्त करू शकतो. अन्नाविना जगणे शक्यच नाही. अन्न नसेल, तर ज्ञानही नाही. पोटात भुकेची आग असेल, तर मानव शांत कसा होणार? म्हणून अन्नाखेरिज भक्ती, अध्यात्म आणि मोक्ष वगैरे गोष्टी व्यर्थ असतात. याचकरिता गृहस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्या नववर वधूंना सप्तपदींत पहिले पाऊल 'इषे एकपदी भव।' म्हणजेच अन्नप्राप्तीकरिता आणि त्याचे रक्षण व संवर्धन करण्याकरिता उचलण्याचा संकेत मिळतो. उपाशीपोटी अमृततुल्य ज्ञानाचा उपदेश काहीच कामाचा नाही. यास्तव जन्म व जगण्याचे मुख्य साधन असलेल्या अन्नाची याचना भक्त करतो. दुसरी याचना आहे ती 'स्व:'ची! स्व म्हणजे प्रकाश! ज्ञानाचा प्रकाश! आत्मज्ञानाचा उजेड! अंधाराचे जगणे पशुवत मानले जाते! प्रकाशात जगणारा माणूस निर्भयी बनतो. अज्ञानाचे सारे भ्रमजाल नाहीसे होते. अन्नाचा संबंध शरीराशी तर ज्ञानप्रकाशाचा संबंध आत्म्याशी. योगेश्वर श्रीकृष्णांनी यासाठीच तर ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे -

 

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते!

 

ज्ञानप्रकाशाने इहलोकाबरोबरच परलोकाचे कल्याण साधते. याचकरिता ऋषिमुनी कामना करतात - "तमसो मा ज्योतिर्गमय।" हे ईश्वरा! आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे ने.

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@