‘ते’ आले आणि त्यांनी जिंकलं!

    दिनांक  26-Sep-2018   


 
 

आशिया चषक स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी कौतुकास्पदच आहे. भारताच्या सलामीवीरांनी सगळ्याच खेळाडूंना सळो की पळो करून सोडले. पण, या सगळ्यात ‘अंडरडॉग’ बनून सगळ्यांवर भारी पडला तो म्हणजे अफगाणिस्तानचा संघ. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मोजक्या अनुभवामुळे इतर सगळ्याच संघांनी अफगाणिस्तान विरुद्धचे सामने म्हणजे सराव सामने आहेत, अशा संभ्रमात खेळण्यास सुरुवात केली. पण सर्वच संघ गाफिल असताना, अफगाणिस्तानच्या संघाने मात्र आपला सर्वोत्तम खेळ खेळत, सगळ्या संघांना धूळ चारली. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानच्या संघाने श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघाला, तर या स्पर्धेतून बाहेरच काढले. त्यानंतर त्यांनी बांगलादेशलाही एकदम ‘काँटे की टक्कर’ देत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगत ठेवला. आशिया चषक स्पर्धेच्या सुरुवातीला कोणी विचारही केला नसेल अशी खेळी या संघाने केली. आतापर्यंत अगदी मोजके आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला असा हा संघ, ना यांच्या मागे कोणता ब्रॅण्ड, ना यांना चांगल्या सुविधा; पण ते काहीही असले तरी त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगाच. भारतासारख्या कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या संघालाही त्यांनी विजय मिळवू दिला नाही, तर सामना बरोबरीत सोडवला. या स्पर्धेत आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांत अफगाणिस्तान संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नेहमी आव्हान दिले. पण, अनुभवाच्या अभावामुळे त्यांच्या विजयात आडकाठी आली. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी तर सगळ्याच फलंदाजांनी आपले हात-पाय गाळले. ‘भारत विरुद्ध अफगाणिस्तान’ या सामन्यात विजयाच्या भुकेने लढला तो केवळ अफगाणिस्तानचा संघ. त्यांच्याकडे अनुभव नसला तरी, त्यांच्या प्रत्येक खेळाडूत या बलाढ्य संघाला हरवायचंच, हेच ध्येय दिसत होतं. भारताविरुद्ध आपले शतक करणारा मोहम्मद शेहजाद असो किंवा आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजींची दांडी गुल करणारा रशीद असो, प्रत्येक खेळाडू हा अंतिम क्षणापर्यंत लढला, आणि अखेर त्यांनी भारताकडून विजयाचा घास खेचून घेतला आणि सामना बरोबरीने सोडवला. अफगाणिस्तानचा हा संघ या स्पर्धेतून बरंच काही शिकला असेल, पण आता त्यांना गरज आहे ती अधिकाधिकसामने खेळायची. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मदतीचीही त्यांना गरज आहे. पण काहीही म्हणा, या आशिया चषक स्पर्धेत ते आले आणि त्यांनी साऱ्या क्रिकेटरसिकांचे मन जिंकले...

 

चार दिवसांचा डाव?

 

कसोटी सामने म्हणजे क्रिकेटचं हृदयचं जणू, असं सर्वच क्रिकेट समीक्षक आणि खेळाडू मानतात. कारण, एखाद्या खेळाडूची वृत्ती ही कसोटी सामन्यांतून कळते. ज्या खेळाडूला कसोटी सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करता आला, तो खेळाडू कोणतेही सामने खेळू शकतो. मात्र, सध्या सुरू असलेल्या २० षटकांच्या सामन्यांमुळे खेळाडू कसोटी सामन्यांकडे पाठ फिरवत असल्यानेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या नियमांमध्ये फेरबदल करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे आता जर कसोटी सामने चार दिवसांपुरते मर्यादित ठेवले, तर नवल वाटू नये. कारण, चार दिवसांच्या खेळामुळे एकतर सामन्यांमधील षटके कमी होतील आणि दुसरे म्हणजे एकूण सामन्यांचे दिवसही कमी होतील. पण, यामुळे कसोटी सामन्यांमधील मजा मात्र निघून जाईल. मर्यादित षटकांच्या सामन्यांचे अधिकाधिक होणारे आयोजन व प्रत्येक देशांतर्गत खेळवण्यात येणाऱ्या २० षटकांच्या स्पर्धा या कसोटी क्रिकेटसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे खेळाडूंचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमांमध्ये फेरविचार करण्याचा निर्णय घेतला असावा. खरंतर असं करायची तशी काहीच गरज नाही. कारण, हल्ली खेळाडू हा कसोटी सामन्यांमध्येही धावा लवकरात लवकर करण्यावर भर देतात. त्यामुळे संयमाच्या या खेळात आता खेळाडूंकडेच संयम उरलेला नाही. पण, यात फक्त खेळाडूंचा दोष आहे, असं म्हणणंही चुकीचं ठरेल. कारण, यात दोष क्रिकेटप्रेमींचाही तेवढाच आहे. भारत हा देश क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या कसोटी सामने बघणार्‍यांची संख्या खूप कमी झाली आहे. मात्र, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांत आजही कसोटी सामने पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मुळात कसोटी खेळाचा कमी होणारा चाहता वर्ग यामुळे प्रायोजकही या सामन्यांकडे दुर्लक्ष करतात. निदान भारतात तरी, सध्या खेळाडूंच्या जोरावर कसोटी सामन्यांना प्रायोजक मिळतात; पण सगळ्या देशांमध्ये ही परिस्थिती नाही. कसोटीतील कामगिरी ही एखाद्या खेळाडूच्या आयुष्यातील अनमोल कामगिरी ठरू शकते. त्यामुळे या सामन्यांच्या दिवसांमध्ये घट झाल्यास या सामन्याच्या मूळ निर्मितीवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे आयसीसी आणि प्रायोजक यांच्यामुळे पाच दिवसांचा खेळ चार दिवसांचा होऊ नये, एवढीच काय ती क्रिकेटप्रेमींची इच्छा...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/