शंखनाद ते तिसरी घंटा

    10-May-2025
Total Views | 29
शंखनाद ते तिसरी घंटा

युद्धाची जशी तयारी एखादा सैनिक करतो, अगदी त्याच पद्धतीने नाटक उभे राहताना तयारी करावी लागते. प्रत्येक सुक्ष्म गोष्टींचे नियोजन झाल्यावरच पडदा उघडला जातो. युद्धाचेदेखील तसेच असते. नाटकाच्या तिसर्‍या घंटेआधी केल्या जाणार्‍या तयारीचा हा आढावा....



बिगुल वाजला आणि छातीत धडधड वाढली. युद्ध सुरू होणार असून कुठल्याही परिणामाची तयारी आपल्याला करायची आहे, याचे संकेत आपल्याला मिळाले. पूर्वी भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणे शंखनाद करत युद्धाची सुरुवात होत असे. पृथ्वी आणि आकाश एकवटून जाईल असा नाद व्हायचा. मग गर्जना करीत युद्धाला सुरुवात व्हायची.


युद्धात कोण जिंकते किंवा हारते ही नंतरची गोष्ट. मात्र, युद्धाची घोषणा करावी तर ती कधी? युद्धात उतरायचे तर संपूर्ण तयारीनिशीच. याचेही काही मापदंड असतीलच. अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टी ठेवूनच सैन्यबळ युद्धभूमीवर उतरत असेल. युद्ध केली जातात ती जिंकण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी आणि सोक्षमोक्ष लावण्यासाठी. सध्या भारत-पाकिस्तानचे युद्ध सुरू आहे. काय होणार, कसे होणार, किती दिवस चालणार असे आणि अशासारखे अनेक विचार डोक्यात येतात. आपण सर्वसामान्य लोक प्रेक्षक होऊन नको ते तर्क-वितर्क, सल्ले आणि निष्कर्ष काढत बसतो. आपली ’सर्वसामान्य नागरिक’ अशीच भूमिका असते. आजच्या लेखात नाट्यगृहात नाटक सुरू होण्यापूर्वी वाजणारी तिसरी घंटा आणि शंखनाद म्हणजेच बिगुल याचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.


एकदा का तिसरी घंटा वाजली की पोटात गोळा येतो. दीर्घ श्वास घेऊन, सतर्क होऊन, येणार्‍या आव्हानाला तोंड देत तयार राहणे, जीव ओतून काम करणे हे कलाकाराला माहीत असते. मग तो सर्व शक्तिनिशी, अभ्यासपूर्ण सरावाने परिपक्व झालेला अभिनय करीत आपली कला सादर करतो. इथे त्यालाही मने जिंकायची असतात, विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो आणि प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने वेगळ्याच जगात नेण्याचे कुशल कामही करायचे असते. पण, यासाठी लागतो आत्मविश्वास, सराव, तयारी आणि प्रबळ इच्छाशक्ती. मात्र, ज्याने कधी नाटकात काम केलेच नसेल, त्याला मात्र वरील वाक्य फक्त शब्दांची जुळवा-जुळव वाटू शकते. पण, कलाकाराला सगळ्याच बाजूने तयार राहावे लागते. प्रेक्षकांचे प्रेम, त्यांच्या टीका, यश, अपयश पचवण्याचे सामर्थ्य लागते. त्याहीपेक्षा लागतो तो आत्मविश्वास.


कठीण आहे, वाटते तितके सोपे नाही ते आणि म्हणूनच नाट्यकला ही कठीण कला आहे. ज्याला नाट्यकलेबद्दल काहीच माहिती नाही किंवा ज्याने कधीच नाटकात काम केले नसेल, त्याने सल्ले देणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखेच आहे. पण, तरीसुद्धा लोक सल्ले देतात, तिरकस आणि कलाकाराचा विचार न करता त्याचे मनोधैर्य डगमगेल असे प्रश्न विचारतात. जसे की तिसरी घंटा उशीरा का वाजली, प्रयोग कसा झाला ते कसा व्हायला पाहिजे, इथपर्यंत सल्ले देतात. मी तिकीट काढून आलो आहे म्हणजे मला उत्तरे मिळालीच पाहिजे किंवा पाक विरोधात युद्ध करताना किती गोळ्या घेतल्या, आताच का लढायचे आहे, लढावे का लागते आहे, अशी परिस्थिती उद्भवलीच कशी, बिगुल वाजवून सामान्य जनतेकडून कसली तयारी करून घेत आहात? असा सराव करायची गरज काय, इथपर्यंत प्रश्नांचे रतीब लावणार. जसे की आम्ही तिकीट विकत घेतो, टॅक्स भरतो मग खरेतर आम्हालाच विचारून युद्ध घोषित करा, इथपर्यंतच्या प्रतिक्रिया बघायला, ऐकायला मिळतात तेव्हा मात्र वाईट वाटते.


तिसर्‍या घंटेचेसुद्ध तसेच आहे. उशीर होणे चुकीचेच, पण समजा उशीर झालाच पाच-दहा मिनिटे तर ते समजून घेण्याची मनःस्थिती ठेवायला हवी. एकदा का तिसरी घंटा वाजली की, मग कलाकाराच्या हाती काही नसते. प्रयोग हा करावाच लागतो आणि असेही म्हणू या की एकदा का तिसरी घंटा दिली की, सर्व काही रंगमंचावरील कलाकारावरच अवलंबून असते आणि नसतेही. काही देवावरसुद्धा सोपवावे लागते. पण, प्रयोग मात्र करायचा तो मने जिंकण्यासाठी, आनंद देण्यासाठीच. प्रौढ रंगभूमी असो वा बालरंगभूमी हे अलिखित नियम सारखेच.


तिसरी घंटा वाजण्याअगोदर प्रयोगशील घटना घडतात. अगदी युद्धावर एखादा फौजी जशी तयारी करतो तशाच. सगळे विभाग आपापली वाटणी करून दिलेली कामे चोख करतात. त्यात अनेक गोष्टी जसे की, रंगमंच व्यवस्थापन, नेपथ्य लावून घेतात. रंगभूषाकार रंगपेटीतून रंग काढतात. वेशभूषाकार कपडेपट बघणार्‍या दादाकडून कपडे इस्त्री करून घेतात, ध्वनी संयोजक वायरी जुळवून घेतात, प्रकाशयोजनाकार स्पॉट हवे तसे हलवून घेतात, आयोजक, संस्थापक चहा-पाण्याची सोय करतात, तिकीट खिडकीवर दादा तिकीट तपासण्यासाठी उभे राहतात, नटराजाची पूजा मांडली जाते, देवा पुढे प्रसाद, हार, फुले, नारळ ठेवले जातात. नाट्यगृहाची साफसफाई केली जाते, त्याला वातानुकूलित केले जाते. अशी एक नाही तर 100 कामे करावी लागतात. ती ही मर्यादित काळात. लक्ष्य मोठे असते आणि वेळ कमी असतो. बरं कुठली समस्या कधी तोंड वर काढेल, याचा अंदाज बांधावा लागतो आणि समस्येला तोंड देत तयारीत उपाययोजना करावी लागते. आता या सगळ्यात जर थोडा उशीर झाला, तर रसिक प्रेक्षक समजून घेतात. भारतीय प्रेक्षक मायाळू आहेत. प्रेक्षक कलाकारांवर चिडला आहे असे फार कमी वेळेला होते. मग शेवटी कलाकार तयार होतो आपल्या भूमिकेत. तो ती प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करतो. टाळ्यांचा गडगडाट होतो आणि बॅकस्टेजला असलेला प्रत्येक कुशल कामगार, कलाकार सुखावतो. कारण, अपेक्षित परिणाम साधलेला असतो. पण, हे कधी होते? तिसरी घंटा तयारीनिशी वाजवली गेली तर. तिसरी घंटा ही मुख्यतः दिग्दर्शकाला, मुख्य कलाकाराला, आयोजकाला आणि नाटकात ज्याची पहिली एन्ट्री आहे अशा कलाकाराला विचारून वाजवली जाते.


मग दहशतवादी हल्ला करणार्‍या पाकिस्तानवर आपण दुसर्‍या मिनिटाला हल्ला का नाही केला? 14 दिवस का लावले, असा प्रश्न तुम्ही विचारणार नाही. कारण, आवेगात येऊन कुठलीच गोष्ट करायची नसते. तिन्ही सैन्यबलांची तयारी झाली आहे की नाही, इंटेलिजन्सनी पुरेशी माहिती दिली आहे की नाही, वैश्विक पातळीवर आपल्या मित्र देशांना आपल्या पुढील कारवाईची माहिती दिली आहे की नाही, हे बघूनच शंखनाद करावा लागतो. रामदास स्वामी म्हणतात, ‘तसे अभ्यासोनी प्रकटावे’ आणि सराव? तो तर फार महत्त्वाचा. त्याच्याकरिता लागते तालिम, प्रयास. दिग्दर्शकाला लागतो आपल्या कलाकारांवर अखंड विश्वास, कलाकाराला लागते ती कलेवर श्रद्धा. निष्ठेने, प्रामाणिकपणे झोकून देऊन काम करण्याचा संकल्प. बालकलाकारांना मी हे जेव्हा समजावून सांगते, तेव्हा त्यांना वेगळ्याच प्रकारचा उत्साह असतो, ते यासाठी तयार असतात. पण, बालमित्रांनो तयारी महत्त्वाची. फौजीला आयुष्यात एकदा तरी युद्धभूमीवर जाऊन मातृभूमीसाठी आपले जीवन पणाला लावण्याची इच्छा असते. तसेच नटाला रंगभूमीवर जाऊन कधी नाट्यकला सादर करतो, असे झालेले असते. सध्या मी उन्हाळी बालनाट्य शिबीर घेते आहे आणि माझ्या असे लक्षात आले आहे की, पुढच्या पिढीला अभिमान आहे भारतीय असण्याचा. नाट्यखेळात युद्ध करणारे बालकलाकार मला दिसत आहेत. मात्र, काल-परवा अचानक दिवे गेले आणि अंधार झाला, मुले घाबरली. मला म्हणाली, रॅडी, आपल्यावर तर पडणार नाही ना मिसाईल? मुलेच ती! जसे आपल्यासाठी आपल्या जीवनात युद्धाचा प्रसंग पहिल्यांदाच येतो आहे आणि आपण ही नव्याने जाणून घेतो आहोत, तसेच ते तर अगदी कोवळ्या वयात अनुभव घेत आहेत. आयुष्य एक लढाई आहे, युद्ध आहे. ते लढले पाहिजे आणि जिंकलेही पाहिजे आणि आताच! नाहीतर हे युद्ध आपण भावी पिढीसाठी लढायला ठेवून जाऊ.


युद्धभूमी जोवर सीमेवर आहे, तोवर चांगली आहे. गृहयुद्ध सुरू झाले, तर ते कॅन्सरसारखे पसरते. त्यामुळे वेळीच पावले उचललेली बरी. रंगभूमीत ही भगवा आणि लाल रंग तरळताना दिसतो आहे. हा बदल आहे आणि या बदलाचे स्वागतच आहे. कारण, तिसरी घंटा ही भूमीपुत्रांजवळ असलेली बरी, कारण काळ खुणावतो आहे. शंखनाद झाला आहे. तिसरी घंटा झाली आहे. आम्ही तयार आहोत. आजचे बालकलाकार सृजनशील आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना सक्षम करू या. सर्व क्षेत्रात देव, देश आणि धर्माचे रंग भरू या! जय हिंद!


रानी राधिका देशपांडे
7767931123
अग्रलेख
जरुर वाचा
टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार! परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी

टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार! परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे केली कारवाईची मागणी

(Eggs Thrown At ISKCON Rath Yatra In Toronto Canada) कॅनडाच्या टोरंटोमध्ये काढलेल्या इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्या महिलेने केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघडकीस झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध व्यक्त करत कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121