...तर शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
06-Feb-2025
Total Views | 181
नांदेड : शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध असल्यास तिथल्या लोकांशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. काही भागातून अगदीच विरोध असल्यास आम्ही त्याची दिशा बदलू. परंतू, लोकांवर हा प्रकल्प लादणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे शिवसेनेकडून आभार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालासुद्धा अनेक लोकांचा विरोध केला. हा विकासाचा महामार्ग असून आज त्याचा मोठा फायदा होतो आहे. त्यावेळी सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला. परंतू, नंतर त्यांना या रस्त्याचे महत्व कळल्यावर त्यांनी स्वत:हून आपल्या जमिनी दिल्या. शक्तीपीठ महामार्गसुद्धा जबरदस्तीने आम्ही लोकांवर लादणार नाही. शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी विरोध असल्यास तिथल्या लोकांशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. काही भागातून अगदीच विरोध असल्यास आम्ही त्याची दिशादेखील बदलू. परंतू, आम्ही लोकांवर हा प्रकल्प लादणार नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही कुठलाही प्रकल्प लोकांच्या संमतीशिवाय करणार नाही. रस्त्यांची कनेक्टिविटी महत्वाची आहे. आतापर्यंत अनेक बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. विकास आणि लोककल्याणकारी योजनांची सांगड घातल्याने आम्हाला एवढा मोठा विजय मिळाला. त्यामुळे हे सरकार जनतेच्या मनाविरुद्ध नसून सर्वसामान्यांचे सरकार आहे."
लाडकी बहिण योजना बंद होणार नाही
"लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना बंद होणार, अशा प्रकारच्या अनेक बातम्या सुरु आहेत. परंतू, आम्ही सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी ज्या योजना सुरु केल्या त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी नाराज नाही तर देवेंद्रजींच्या पाठीशी
"मी नाराज नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री झाल्यावर ते उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मला पूर्ण साथ दिली. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे."
१५-२० वर्षे लुटारू कोण होते?
उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "१५-२० वर्षे लुटारू कोण होते? मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून कुणी लुटले? आज आम्ही सरकारमध्ये आल्यावर सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून सगळे रस्ते काँक्रीटचे करतो आहोत. त्यासाठी ७३ ते ७४ हजार कोटींचे बजेट देण्यात आले आहे. यामध्ये ४३ हजार कोटींची कामे आहेत. पूर्वी २५ टक्के भांडवली खर्च व्हायचा, आता तो ५८ टक्के आहे. मग हे पैसे कुठे जात होते? दरवर्षी खड्ड्यांची दुरुस्ती आणि रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात १५ ते २० वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये वाया घालवले. याला जबाबदार कोण? मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी आणि मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीत भाष्य करू नये. आता मुंबईचा विकास होत असून ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासात घातले पाहिजे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई करण्यासाठी आम्ही पावले उचलले असल्याने पोटदुखी झाली आहे," अशी टीकाही त्यांनी केली.