मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा'. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या कथेने, प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता पुन्हा एकदा भक्ती आणि वक्रतुंड नवा नवस फेडायला निघाले आहेत. २० वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा २ येत असून या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट दिसणार आहे.
सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सुनील तावडे, विजय पाटकर अशी 'नवरा माझा नवसाचा' ची तगडी स्टारकास्ट होती. पहिल्या भागात कंडक्टर लालूच्या भूमिकेत अशोक सराफ होते. आता दुसऱ्या भागात लालूला बढती मिळालेली दिसून येत आहे. म्हणजेच चित्रपटात अशोक सराफ लालू कंडक्टरच्या नाही तर टी.सीच्या भूमिकेत दिसत आहेत.
'नवरा माझा नवसाचा २' चा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून यातील अशोक सराफ यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अशोक सराफ लालू कंडक्टर नव्हे तर टीसी (Ticket Checker) च्या भूमिकेत दिसणार आहेत. लालू कंडक्टरने 'नवरा माझा नवसाचा'मध्ये धमाल आणली होती. आता 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये टीसी बनलेला लालू काय कमाल करतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. दरम्यान, 'नवरा माझा नवसाचा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रदर्शनाची तारीख जाहिर केली जाणार आहे. विशेष म्हणजे या भागात स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव असे नवे कलाकार दिसणार आहेत.