श्रीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी साजरा केला 'योग दिन'; म्हणाले, "जागतिक कल्याणासाठी..."
21-Jun-2024
Total Views | 54
श्रीनगर : "जग आज योगाला जागतिक कल्याणासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून पाहते कारण ते लोकांना भूतकाळाचे ओझे न बाळगता वर्तमानात जगण्यास मदत करते." असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. पंतप्रधान दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात बोलत होते.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, "योगामुळे लोकांना हे समजण्यास मदत झाली आहे की त्यांचे कल्याण त्यांच्या सभोवतालच्या जगाच्या कल्याणाशी निगडीत आहे. ते म्हणाले, “जागतिक कल्याणासाठी जग योगाकडे एक शक्तिशाली माध्यम म्हणून पाहत आहे. योग आपल्याला भूतकाळाच्या ओझ्याशिवाय वर्तमान क्षणात जगण्यास मदत करतो.”
योगचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, "जेव्हा आपले मन शांत राहते, तेव्हा आपण जगावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो. योग समाजात सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग निर्माण करत आहे." योग दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम दल सरोवराच्या काठावर आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि योगाकडे लोकांचे आकर्षणही सातत्याने वाढत आहे.
ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि ध्यानाची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचा बहुमान मिळाला आहे. श्रीनगरमध्ये योगातून मिळालेली शक्ती आम्ही अनुभवत आहोत. काश्मीरच्या भूमीतून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो.
पंतप्रधान म्हणाले की, २०१४ साली त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता आणि भारताच्या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला होता, हा एक विक्रम होता. ते म्हणाले, “तेव्हापासून योग दिन सातत्याने नवनवीन विक्रम करत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला १० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे. आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि योगाकडे लोकांचे आकर्षणही सतत वाढत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये योगाचे आकर्षण निर्माण झाले आहे, ज्या उत्साहाने लोक योगाशी जोडले गेले आहेत, ती जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला एक नवीन बळ देण्याची संधी बनली आहे. त्यांच्या भाषणानंतर पंतप्रधानांनी सामूहिक योगसाधनेमध्ये भाग घेतला. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत योग दिनाचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने आला आणि तो एकमताने मंजूर झाला होता.
२०१५ पासून दरवर्षी योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्यांचे पंतप्रधान नेतृत्व करत आहेत. त्यांनी दिल्ली, चंदीगड, डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि अगदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह विविध प्रतिष्ठित ठिकाणी योग दिन साजरा केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची मुख्य थीम ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ आहे. भारतासह जगभरात २१ जून रोजी योग दिन साजरा केला जातो आणि लोक त्यात उत्साहाने सहभागी होतात.