टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिली धमकी

    06-May-2024
Total Views |
World Cup
 
वॉशिंगटन डी.सी : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये दि. १ जून २०२४ पासून सुरू होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषकावर दहशतवादी धोका निर्माण झाला आहे. विश्वचषक स्पर्धेला लागलेला हा दहशतवादी धोका पाकिस्तानकडून आला आहे. या धोक्याबाबत जारी करण्यात आलेल्या सुरक्षा सतर्कतेमध्ये असे म्हटले आहे की, “प्रो-इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) मीडियाने अफगाणिस्तान-पाकिस्तान-आधारित इसिस खोरासान या दहशतवादी संघटनेने दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे.
 
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरून टी-२० विश्वचषकाबाबत हे धोके निर्माण झाले आहेत. हा परिसर दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनला असून आजही मोठ्या प्रमाणात दहशतवादी येथे आहेत. टी-२० विश्वचषकाला लक्ष्य करण्याबाबत चिंता वाढली आहे. येथे उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांनी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दुसरीकडे, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डामध्ये समाविष्ट असलेल्या कॅरेबियन देशांनी या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रमुख जॉनी ग्रेव्हज यांनी या प्रकरणी मीडियाला सांगितले की, "आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आयसीसी टी-२० विश्वचषकातील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आमच्याकडे एक मोठी आणि मजबूत सुरक्षा योजना आहे." कॅरेबियन देशांच्या सुरक्षा यंत्रणांनीही याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे.
 
उल्लेखनीय आहे की, दि. १ जून ते २९ जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. अमेरिकेतही यासाठी नवीन स्टेडियम तयार केले जात आहेत. दुसरीकडे, वेस्ट इंडिजमध्ये समाविष्ट असलेल्या देशांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात येत आहे. अमेरिकेत प्रथमच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121