‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे दि. 5 मे रोजी स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक मैफिल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या काव्यस्पर्धेचा या लेखात घेतलेला मागोवा...
'समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या सातव्या ’स्व विजयराव कापरे स्मृती काव्य करडंक मैफिलीचे’ उद्घाटन करताना सदाफुले सर म्हणाले. “मी महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहात असतो. परंतु, समरसता साहित्य परिषदेसारखी शिस्तबद्धता कोठेही दिसून येत नाही. आपली कविता झाली की निघून जाणारे कवी सर्वत्र दिसतात, पण येथे मात्र तीन ते सहा कवींनी एकत्र येऊन काव्य मैफील सजवून शेवटपर्यंत थांबणे. हे या काव्य मैफिलीचे विशेष वैशिष्ट्य आहे. संवेदनांचे आविष्कार घडविणारी ही काव्य करंडक मैफील स्पर्धा ही एक अनोखी स्पर्धा असून सर्व कवींना माझ्या खूप खूप शुभेच्छा,” असे उद्घाटक या नात्याने सदाफुले सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्व. दत्तोपंत म्हसकर न्यासाचे अध्यक्ष मा. प्रदीप पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतातून दत्तोपंत म्हसकरांच्या कार्याची महती सांगून ते पुढे म्हणाले, “सामाजिक कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्या कार्यकर्त्याची देशाला नितांत गरज आहे आणि यासाठी कवींनी समाजाच्या संवेदना टिपून आपल्या रचनेतून समाजमनाचे संवर्धन करावे,“ असे सांगून सर्व संघाना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी ‘समरसता साहित्य परिषदे’चे माजी अध्यक्ष म्हणून मी प्रास्ताविक केले.
“समरसतेचा भाव जागविल्याशिवाय समाजात खरी समता येऊ शकणार नाही. समाजाचे जीवंत, चैतन्ययुक्त रसरसलेले चित्रण साहित्यातून अवतरत असते आणि ते अखंड अवतरत राहावे, हीच समरसतेची आणि ‘समरसता साहित्य परिषदे’ची मूख्य भूमिका आहे,” असे म्हणून मी समरसतेच्या वर्षभरात संपन्न होणार्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले (कार्याध्यक्ष, म.सा.प भोसरी), प्रदीप पवार (अध्यक्ष स्व. दत्तोपंत म्हसकर न्यास) उज्ज्वला केळकर (अध्यक्षा, स.सा.प.पिंचिं शाखा), सुहास घुमरे (प्रांत सदस्य) व्यासपीठावर उपस्थिती होती. . या प्रसंगी शहरातील सर्व ज्येष्ठ कवी, लेखक,साहित्यिक डॉ
. धनंजय भिसे,राज आहेरराव, रजनी आहेरराव, सुभाष चव्हाण, राधाताई वाघमारे, सुरेश कंक, रघुनाथ पाटील, फुलवती जगताप, सविता इंगळे, नंदकुमार मुरडे, वर्षा बालगोपाल, जयवंत भोसले, मिलींद कुलकर्णी, प्रशांत मोरे, आनंदाराव मुळक या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
शोभाताई जोशी, राजेंद्र भागवत, नीलेश शेंबेकर, श्रध्दा चटप,बाळासाहेब सुबंध, सुरेश जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले आणि जयश्री श्रीखंडे यांनी आभार प्रदर्शन करून उद्घाटन सत्राचा समारोप केला.
‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोपातील अध्यक्षीय भाषणात वाकनीस बोलत होते. आपले मुद्दे मांडताना पुढे ते म्हणाले, “कधी कधी सुमार असणार्या कवितासुद्धा चांगल्या सादरीकरणाने उजव्या ठरतात आणि चांगल्या कवितादेखील सादरीकरणातील उणीवांमुळे लोकांपर्यत पोहोचत नाहीत. सादरीकरण कसे करावे, याचेही शिक्षण देणार्या संस्था आहेत. चांगल्या कवींनी ही कला शिकून घ्यावी आणि चांगल्या प्रकारे सादरीकरण व्हावे.” याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मा. सुरेश लुणावत, ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, स्पर्धेचे परीक्षक वर्षा बेडिगेरी कुलकर्णी, दुसरे परीक्षक अनिल आठलेकर आणि राजेंद्र भागवत हे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरेश लुणावत म्हणाले, “कोणीतरी एकचजण स्पर्धा जिंकतो म्हणून इतरांनी नाराज व्हायचे नसते.
पुढे जिंकण्यासाठी तयारीस लागायचे असते.” दोन्ही परीक्षकांनी आपल्या मनोगतातून कवींच्या सादरीकरणातील गुणदोष सोदाहरण दाखवून दिले.याप्रसंगी उद्योजक अभय पोकर्णा, मीनाताई पोकर्णा, हास्यकवी आनंदराव मुळुक यांचा सन्मान करण्यात आला.यावर्षीचा स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक सांगलीच्या चारुता या संघाने जिंकला. इ.स. 2014च्या एका मासिक बैठकीमध्ये एक नवीन कल्पना डोक्यात आली आली. बैठकीतील सर्वांनीच ती उचलून धरली आणि त्वरित नावदेखील सुचविले गेले... ‘काव्य करंडक मैफील!’ आणि बैठकीतील सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय पक्का झाला. आणि 2014 पासून या काव्य करंडक मैफिलीस रंग येत गेला. मग नुसती मैफील म्हणजे मजा ती काय.. जर तिला स्पर्धेचे स्वरुप दिले, तरच एक वेगळा रंग भरला जाईल आणि अनेक संघाना भाग घेता येईल, असे ठरविण्यात आले. स्पर्धेचे स्वरुप, नियमावली, एका संघात कवींचा कमीतकमी व जास्तीतजास्त किती सहभाग असावा, बक्षीसांचे स्वरुप वगैरे वगैरे काही ठोकताळे ठरविण्यात आले आणि 2014च्या नोव्हेंबर महिन्यात पहिली काव्य करंडक मैफील स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली होती. सर्वांचे श्रम फळास आले होते आणि आमच्या या कार्याचा सर्वात जास्त आनंद आमचे मार्गदर्शक समरसतेचे पाईक विजयराव कापरे यांना झाला होता. कारण, त्यांनीच परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने वेगळे काहीतरी करावे, असे सुचविले होते. आम्हा सर्वांना त्यांचा खूप मोठा आधार होता. संजीवनीताई तोफखाने, रमेशजी वाकनीस, शोभाताई जोशी, सुहासजी घुमरे आम्ही सारे झटून काम करीत होतो. आणि दुसर्या स्पर्धेच्या काही दिवस आधी आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयराव आम्हाला सोडून गेले. सर्वांनाच खूप दुःख झाले होते. स्पर्धा तर तोंडावर आली होती. दु:ख करीत बसण्याची ती वेळ नव्हती. सारेजण तयारीस लागले... आणि स्पर्धेचे नवीन नाव ठरले, ‘स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक स्पर्धा’ सर्वजण जोमाने कामास लागले. निवेदने पाठविली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून स्पधेला प्रतिसाद मिळू लागला. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्टातून नोंदणी येऊ लागली आणि दुसर्याच स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे आठ संघानी स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. तेव्हापासून ‘समरसता साहित्य परिषदे’मार्फत घेण्यात येणारी स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक मैफील स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस आली.
महाराष्ट्रातील कवी या स्पर्धेला येण्यासाठी धडपडू लागला. कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सात (निवेदकासह) एवढे कवी एका संघात असतात. प्रत्येक संघाला 25 मिनिटांची वेळ दिलेली असते. व्यासपीठावर येऊन संघ स्थानापन्न झाल्यानंतर संघ सूत्रधाराला बेल दिल्यानंतर सुरुवात करावयाची असते. 23 मिनिटे झाल्यानंतर पुन्हा एकदा बेल देऊन दोन मिनिटे राहिली आहेत, यासाठी सावध केले जाते. प्रत्येक संघाने वेळेतच सुरू करून वेळेतच स्पर्धा संपवायची असते. यासाठीदेखील मार्क असतात. आजपर्यत दहा वर्षांत शेकडो कवींनी आणि संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवून एक वेगळा ठसा उमटविला आहे. आदर्श निर्माण केला आहे.