पालकमंत्र्यांच्या दौऱ्याआधी ‘चोरी’ लपवण्याची घाई

- कंत्राटदारांचा प्रताप; ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे काँक्रिटीकरण

    21-May-2025
Total Views |
पालकमंत्र्यांच्या दौऱ्याआधी ‘चोरी’ लपवण्याची घाई

मुंबई, एक चोरी लपवण्यासाठी हजारवेळा खोटे बोलावे लागते, असे म्हणतात. मुंबईत बुधवार, दि. २१ मे रोजी असाच एक प्रकार समोर आला. उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी अचानक रस्त्यांचा पाहणी दौरा काढल्याने कंत्राटदारांना घाम फुटला. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी त्यांनी गेल्या ६ महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्यावर भल्यापहाटे काँक्रिटीकरण केले. मात्र, हा प्रकार निदर्शनास शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कामचुकार कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश दिले.

पालकमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा पाहणी दौरा केला. ‘एन वॉर्ड’मधील घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी करताना निदर्शनास आले की, गेली ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रार केली. या वेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर उपस्थित होते. ही सर्व परिस्थिती आणि नागरिकांचा रोष शेलार यांनी त्यांच्या लक्षात आणून दिला. तसेच तातडीने या सर्व बाबतीत सुधारणा करा, अशा सूचना केल्या. घाटकोपर पश्चिम ते विक्रोळी पार्क साईट रस्त्याची पाहणी करताना निदर्शनास आले की, येथील रस्त्यावर काही तासांपूर्वीच सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक त्रासले असून, त्यांनी कंत्राटदारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘एस’ वॉर्डमधील भांडूप पश्चिम येथील अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांच्या कामांची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. या ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रिटीकरण झाले आहे. शिवाय रस्त्याची समपातळी (लेव्हल) देखील योग्यरितीने केलेली नाही. स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ही बाब महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून देत आशिष शेलार यांनी तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या दौऱ्यात आमदार पराग शाह, मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक नील सोमैया, प्रकाश गंगाधरे, भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गल्लोगल्ली फिरणार – आशिष शेलार

याबाबत माध्यमांशी बोलताना, पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले की, मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत आमची जबाबदारी म्हणून आम्ही प्रत्येक गल्लोगल्ली फिरू, आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करुन घेऊ. आम्ही प्रशासनाला सांगितले आहे की, नवीन रस्ते उघडू नका. एक बाजू पूर्ण झाली असेल, तर दुसऱ्या बाजूची लेव्हल समपातळीवर करून रस्ता राहादारीस योग्य बनवा. जागरूक प्रतिनिधी म्हणून भाजप रस्त्यावर आपल्या प्रतिनिधींना घेऊन कामाला लागली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.