वाचू आनंदे...

    20-Apr-2024   
Total Views |
book
 
लिपी उदयास आली आणि माणूस लिहू लागला. कालांतराने मुद्रणकलेचा शोध लागल्याने लेखन-वाचनाचा आवाका प्रचंड वाढला. ज्ञानाचे विकेंद्रीकरण झाले. आज भारतीय भाषांतील साहित्यनिर्मितीत मराठीचा क्रमांक पहिल्या पाचात येतो. येत्या मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जाईल. त्याचे औचित्य साधून आजची वाचन संस्कृती, तिचे बदलते प्रवाह आणि भविष्यातील तिचं रूप जोखण्याचा प्रयत्न करताना वाचनालयाचे संस्थापक, पुस्तक विक्रेते, प्रकाशक आणि मराठी विषय शिकविणारे शिक्षक यांच्या विचारांचा घेतलेला हा कानोसा...
 
वाचनालयांची वेळेची बंधने जाचक, ती वाचकांना सोयीची व्हायला हवीत 
‘पै. फ्रेंड्स लायब्ररी’ गेली ३८ वर्षे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, तिच्या प्रचार-प्रसारासाठी बरेच काम करत असते. आज बरीच वाचनालये वेळेचे बंधन आणि इतर बंधनांमुळे दुर्लक्षित राहिलेली दिसतात. आपण अशी कोणतीही बंधने न ठेवता वाचकांसाठी निरनिराळे उपक्रम राबवतो. हे सर्वच प्रयोग ‘सुपरहिट’ झाले आहेत. पुस्तक आदानप्रदानाचा कार्यक्रम हासुद्धा त्यातीलच एक भाग. लोक आपल्याला त्यांच्याकडची वाचून झालेली पुस्तके आणून देतात. हा साठा मोठा आहे. गेल्यावर्षी डोंबिवलीत एक ३०० मीटरचा रस्ता घेऊन तिथे पुस्तकांची जत्रा भरविली होती. येणार्‍या प्रत्येक वाचकाला एक पुस्तक मोफत घेऊन जायची तिथे परवानगीही असते. गेल्यावर्षी सहा हजारांच्या आसपास पुस्तके या रस्त्यावरून रसिकांनी नेली. एकदा पुस्तकांकडे वाचक वळले की, पुढे त्यांना विकत घेण्याचीही सवय जडते. हा स्वानुभव.
- पुंडलिक पै, संस्थापक, पै. फ्रेंड्स लायब्ररी

वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नाही
माझ्या मुलीची वाचून झालेली गोष्टीची पुस्तके मी शाळेत नेऊ लागले. काही महिने मुलांना गोष्टी वाचून दाखवल्या आणि जेव्हा ती गोष्ट ऐकताना दंगून जात आहेत, असे जाणवले तेव्हा ती गोष्ट अर्ध्यात सोडून देऊ लागले. मग मुले वाचनालयात दिसू लागली. आज मुंबईच्या मध्यात जिथे अनेक प्रलोभने आहेत, अशा भागातल्या माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेतली चाळीत राहणारी मुले पुस्तके वाचताना पाहून त्यांच्या आईवडिलांनाही आनंद होतो. खरं तर मुलांनी पुस्तके वाचावी, यासाठी शिक्षकांनीच प्रयत्न करायला हवे. शिक्षकांनीसुद्धा क्रमिक पुस्तकांबाहेरचे पुस्तकविश्व पाहायला हवे. आज माझ्या शाळेतल्या मुलांप्रमाणेच शिक्षकांनाही वाचनाची गोडी लागली, याचा मला अभिमान वाटतो. कारण, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी ही केवळ मराठी शिक्षकांची जबाबदारी नाही.
- उल्का वर्तक, मराठी भाषेच्या शिक्षिका, ज्ञानेश्वर विद्या मंदिर

पुस्तकांची सोबत,पुस्तकांचाच आधार...
खरंतर पुस्तकांशी माझा संबंध कधीच नव्हता. वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कोलकाता, राजस्थान, पुणे, मुंबई अशा विविध शहरांत नोकरीसाठी वणवण फिरलो. कोलकात्त्यात असताना मातृभाषेची आठवण यायची. अशा परिस्थितीत वाचनाने सोबत केली. पुढे पुढे या पुस्तकांचा आधार इतका वाटला, की म्हटले हेच सौख्य आपण इतरांनाही मिळवून द्यावे. वाचलेली निवडक पुस्तकेच डोक्यात होती. मुंबईत येऊन प्रकाशकांना भेटलो, एक एक वाचक मिळवला. त्याला समजून घेऊन त्याप्रमाणे संबंध जोपासले. प्रत्येक वाचकाची कहाणी वेगळी आहे. आज माझे वाचकांचे १८ ग्रुप्स आहेत. हा संपूर्ण सेटअप ऑनलाईनच आहे. बर्‍यापैकी पैसे आहेत या व्यवसायात हे कळले आणि मग त्यावरच जास्त काम केले. सगळे प्रकाशक मदत करतात. आजपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुस्तके पाठवली. चांगला प्रतिसाद आहे. स्वतःसोबत इतरांना आनंद देता येतो. वाचकाला पुस्तकाचे सार सांगितले की, ते त्यांना घ्यावेसे वाटते. या प्रयत्नांमुळेच पुस्तकांना प्रचंड मागणी आहे.
- विजय, संस्थापक, स्पर्श बुक शॉप

आजची वाचनसंस्कृती समृद्ध आहेच, मात्र...
खरं तर वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी लहान मुलांमध्ये पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे आवश्यक असते. आम्ही त्यासाठी बरेच उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक बालसाहित्यकारांना हाताशी घेऊन मुलांसाठीची पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. विपुल बालसाहित्य निर्माण केले. आजची पिढी अवांतर वाचन करते. मला चिंता वाटते, ती पुढच्या पिढीची. आजवर शाळांना पुस्तके खरेदी करण्यासाठी निधी दिला जात होता. आज तो निधी इतर सामग्रीसाठी वळविण्यात आलेला आहे. वाचनालये नवीन पुस्तके खरेदी करत नाहीत. शाळाही पूर्वीसारखी पुस्तके खरेदी करत नाहीत. हे चित्र कुठेतरी बदलायला हवे. मुले वाचू लागली, तर उद्याचे तरुण आणि परवाचे सुजाण नागरिक समृद्ध वाचक असतील. आजची वाचनसंस्कृती समृद्ध आहेच, मात्र शाळांकडून येणारी पुस्तकांची मागणी वाढली, तर पुढील काळातही चिंता करण्याचे कारण नसेल.
- अशोक मुळे, संस्थापक, डिम्पल पब्लिकेशन

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.