मुंबई, भारतभूमीवर गायीला माता म्हणून पूजले जाते. ऋषींच्या आश्रमात, संतांच्या वचनात आणि हिंदू घराघरांत गायीस पूज्यस्थान दिले गेले. त्यामुळे गोमातेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दरवर्षी दि. २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा शुक्रवार, दि. १३ जून रोजी करण्यात आली.
देशी गायींना "कामधेनू" म्हणून संबोधले जाते, कारण त्यांच्या दुधाची उपयुक्तता, शेण आणि गोमूत्र यांचे औषधी व शेतीसाठी असलेले महत्त्व अतुलनीय आहे. राज्यात मराठवाड्यात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी आणि विदर्भात गवळाऊ अशा विविध देशी जातीच्या गायी आढळतात. मात्र, संकरित गायींच्या तुलनेत कमी उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता यांमुळे देशी गायींची संख्या सातत्याने घटत आहे. यावर उपाय म्हणून उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण करण्यासाठी त्यांची उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या विशेष दिनानिमित्त देशी गायी आणि त्यांच्या उत्पादनांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात चित्रपट, प्रदर्शने, शिबिरे आणि स्पर्धा यांसारखे उपक्रम आयोजित केले जातील. हे कार्यक्रम पशुसंवर्धन आयुक्त आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जाणार असून, त्यासाठी लागणारा खर्च गोसेवा आयोगाच्या निधीतून भागवला जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध होऊन शेती-संस्कृतीत गायींचे स्थान अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.
‘राज्यमाते’चा दर्जा
महाराष्ट्रातील देशी गायींच्या संख्येत सातत्याने होणारी घट रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डेन्मार्क आणि अमेरिकेतील विदेशी संकरित गायींच्या तुलनेत देशी गायींची उत्पादन आणि प्रजननक्षमता कमी होत गेली, परिणामी आपली ‘गोमाता’ उपेक्षित राहिली. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी देशी गायींना ‘राज्यमाता’ म्हणून सन्मानित केले आणि आता दरवर्षी २२ जुलै हा ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ अर्थात ‘गोमाता दिन’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
गाईचे दूध नव्हे, अमृत!
गाय हा हिंदू अस्मितेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदू आहे. आणि या विचारसरणीला शासनमान्यता मिळणे, ही हिंदू जनमानसासाठी अभिमानाची बाब आहे. देशी गाय ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याची ग्वाही असलेली जीवसृष्टी आहे. तिच्या दुधात ए-२ प्रकारचा प्रथिनयुक्त अमृततुल्य घटक, तर गोमूत्र, शेण यांत औषधी मूल्य आहेत. आधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे, की देशी गाईचे दुध मधुमेह, कर्करोग आणि मानसिक ताणावर प्रभावी आहे.
गोमांस तस्करीच्या अलिकडील घटना
- नागपूर (डिसेंबर २०२४) : नागपूर पोलिसांनी गोवंश तस्करीच्या रॅकेटवर कारवाई करताना ११ गोवंशांना तस्करांच्या तावडीतून सोडवले. पंचपावली पोलिसांनी मोहम्मद इम्रान कुरेशी आणि मोहम्मद रियाज शेख कुरेशी यांच्या निवासस्थानी ही कारवाई केली. हे तस्कर गोंदियातील पशुबाजारातून गोवंश खरेदी करून नागपूर, हैदराबाद आणि तेलंगणातील कत्तलखान्यांमध्ये पाठवत होते. सुटका केलेल्या गोवंशांना गोशाळेत पाठवण्यात आले.
- धुळे (जून २०२५) : धुळे जिल्ह्यात हिंदू संघटनांच्या सतर्कतेमुळे बकरी ईदपूर्वी ७ गोवंशांना कत्तलखान्यापासून वाचवण्यात आले. स्थानिक पोलिसांनी तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर गो-रक्षक आणि तस्करांमध्ये तणाव निर्माण झाला.
- नांदेड (जून २०२५) : नांदेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करताना १४ जनावरे जप्त केली. यामध्ये ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. जप्त केलेली जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली.
- रायगड (जून २०२५) : कर्जत येथील नेरळशेजारील गावात गो-रक्षकांनी तस्करांपासून ८० गोवंशांना वाचवले. हे गोवंश बकरी ईदच्या दिवशी कत्तलसाठी मुंबईत नेण्यात येत होते. स्थानिक गो-रक्षकांनी शर्तीचे प्रयत्न करून ही कारवाई यशस्वी केली.
कायदा काय सांगतो?
२०१५ मध्ये महाराष्ट्रात गोमांस विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालणारा कायदा लागू झाल्यापासून गो-तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. या कायद्यान्वये गाय, बैल आणि वासरांच्या कत्तलीवर बंदी आहे. गो-तस्कर हे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बांगलादेशच्या सीमेपर्यंत गोवंश अवैधरित्या पाठवतात. नागपूर, गोंदिया आणि भंडारा ही तस्करीची प्रमुख केंद्रे आहेत.