अलीकडील काही वर्षांत देशात सर्वाधिक मानव-वाघ संघर्ष हा चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येतो. दि. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात ३१ लोकांचा बळी गेला. जिल्ह्यात २००६ पासून सुरू झालेला मानव-वाघ संघर्ष वर्षागणिक वाढतच गेला. गेल्या सात वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात ३० वाघ आणि १३० मानवी मृत्यू झाले आहेत. २००६ मध्ये केवळ नऊ संघर्षाच्या घटना घडल्या होत्या, त्या वाढून २०१८ मध्ये ९१७ झाल्या. यातील सर्वाधिक ५५ टक्के घटना या ब्रह्मपुरीमध्ये, २५ टक्के चंद्रपूर आणि २० टक्के घटना मध्य चांदा विभागात घडल्या आहेत. केवळ चंद्रपूर शहराजवळ २१ वाघ आहेत. चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० वाघीण, ३७ बछडे आणि ४१ लहान वयस्क वाघ आहेत. यावरूनच वाघांच्या संखेत किती वाढ झाली आहे, हे लक्षात येते.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दशकात वाघांची संख्या वाढली असून, या वर्षाअखेर ही संख्या ३००च्या जवळ असेल, असे वन विभागाचे मत आहे. ही संख्यादेखील मानव-वाघ संघर्ष वाढण्यास कारणीभूत आहे. ताडोबा आणि प्रादेशिक वनक्षेत्र मिळून वाघांची संख्या २०१४ मध्ये १११ होती. जी २०२० साली वाढून २४६ एवढी झाली. पूर्वी ताडोबामधील वाघांची संख्या प्रादेशिक वनक्षेत्रापेक्षा जास्त असायची; परंतु २०१७च्या पुढे यात बदल झाला. आता प्रादेशिक जंगलामधील वाघांची संख्या ताडोबापेक्षा वाढली आहे. २०१७ मध्ये ताडोबात ७५ वाघ, तर प्रादेशिकमध्ये ७७ वाघ होते. २०२० मध्ये ताडोबातून १०६ वाघांची, तर प्रादेशिकमधून १४० वाघांची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून संरक्षित जंगलापेक्षा त्याबाहेरील जंगलात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येते. चंद्रपूरमधील जंगलात, शेतात, कोळसा खाणीत, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये, औद्योगिक आणि ग्रामीण भागात वाघांनी आपले तात्पुरते अधिवास तयार केल्याचे दिसतात.
वन विभागाने जिल्ह्यातील मानव-वाघ संघर्षाच्या निराकरणासाठी विविध प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांना अजूनही पूर्णपणे यश मिळालेले नाही. गावातील लोकांना परिसरातील वाघांच्या अस्तित्वाची माहिती देऊन पूर्वसूचना देणे, त्या परिसरात गस्त वाढविणे, हल्ल्यानंतर वाघांना पिंजरा लावून किंवा बेशुद्ध करून पकडणे, वाघांना पकडून दुसर्या अभयारण्यात सोडणे, वाघांना रेडिओ कॉलर लावणे, शेतकर्यांना सौर कुंपण पुरविणे इ. अनेक योजना राबविल्या जात आहे. ’डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने’अंतर्गत स्थानिक जनतेचे जंगलावरील अवलंबन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाघाच्या हल्ल्यामध्ये मानवी मृत्यू झाल्यास, नुकसान भरपाई म्हणून पूर्वी देण्यात येणारी आठ लाख रुपयांची रक्कम आता २० लाख करण्यात आली आहे. व्यक्ती अपंग झाल्यास पाच लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास १ लाख, २५ हजार रुपये दिले जातात.
चंद्रपुरातील मानव-वाघ संघर्षावर दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात वाघांचे सर्वाधिक हल्ले हे लोक जेव्हा विविध कारणांसाठी जंगलात जातात, त्यावेळी घडतात. त्यासाठी लोकांचा जंगालातील हस्तक्षेप कमी करणे गरजेचे आहे. वाघांच्या भ्रमणमार्गात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे देखील मानव-वाघ संघर्ष वाढला आहे. चंद्रपुरातील ग्रामीण भागातील लोक बांबू, मोहफुले, बिडीपत्ता आणि अनेक वनोपजाकरिता जंगलावर अवलंबून आहेत. तसेच बकर्या, गुरे-ढोरे चारण्यासाठी देखील गुराखी जंगलात जातात. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त मानवी मृत्यू हे गुराख्यांचे झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मानव-वाघ संघर्ष हा ब्रह्मपुरी विभागात आहे. कारण, हा वाघांचा भ्रमणमार्ग असून, इथेच गावांची संख्या जास्त आहे.
म्हणून शासनाने बफर क्षेत्र किंवा प्रादेशिक जंगलात संघर्ष असलेल्या गावांचे पुनर्वसन केले पाहिजे. बहुतेक वेळा वाघाच्या हल्ल्यातील मानवी मृत्यू हे जंगलात झाले असले, तरी काही घटना या अगदी गावाजवळ घडल्या आहेत. त्यासाठी जंगलालगत असलेल्या गावांना आणि शेतींना सौर कुंपण लावणे हा त्यावरील एक पर्याय आहे. गावाजवळ आणि उघड्या वनात मोहाची, फळांची आणि तेंदूपत्ता झाडांची लागवड केल्यास जंगलात जाणे टाळता येईल आणि वाघांचे हल्ल्याची शक्यताही कमी होईल. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करावयाचे असेल, तर ग्रामीण भागातील लोकांचा विकास करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्यांचे जंगलावरील अवलंबन कमी होईल. लोकसहभाग, लोकशिक्षण, जनजागरण आणि वन-वन्यजीव संरक्षणात जोपर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य असत नाही, तोपर्यंत त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करता येत नाही.
सुरेश चोपणे
वन्यजीवतज्ज्ञ , चंद्रपुर