कलादालन...

    15-Mar-2024   
Total Views |
J.J. College Art Gallery


कला हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या मध्यवर्ती भागात कलाकारांना कलासंस्कार देणारे एक महाविद्यालय म्हणून मुंबईतील जेजे महाविद्यालयाची ख्याती आहे. दरवर्षी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीच्या कला अभिव्यक्तीचा घेतलेला वेध..

मागे एका मुलाखतीत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत म्हणाले होते की, ‘कलेला समीक्षकाची गरज नसते.’ खरंच, बर्‍याचदा आपण विचार न करता आपल्या अनुभवाची परिमाणं वापरून एखाद्या कलाकृतीला चांगलं-वाईट असे लेबल लावू पाहतो. म्हणूनच ‘समीक्षा’ या शब्दाचीच चिकित्सा करावी वाटते. कलाकृती परिपूर्ण असते? ती परिपूर्ण असावी? परिपूर्णता म्हणजे काय? चित्र, शिल्प स्थिर दिसतात. पण, त्यांचा संपर्क जेव्हा आपल्याशी होतो, तेव्हा सुरुवात होते एका प्रवासाची! जाणून घेण्याची. नेणिवेची.सर जे. जे. कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वार्षिक कलाप्रदर्शन सध्या भरले आहे. कलेचे अनेक प्रकार यात पाहायला मिळतात. चित्र, शिल्प, मुद्राचित्र, वस्तूची छोटी प्रतिकृती (मिनिएचर्स) अशा अनेक कलाकृती विविध माध्यमातून साकारल्या आहेत. दगड, काँक्रीट, लोह, कागद, माती आणि धातू अशा सर्व घटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे, सभोवताली घडत असलेल्या घटनांचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीवर जाणवतो. या वर्षीच्या प्रदर्शनात प्रकर्षाने दिसलेल्या कलाकृतींमध्ये ‘जी २०’, प्रभू श्रीराम अशा चित्रांचा आणि शिल्पांचा प्रामुख्याने समावेश होता. यापैकी काही शिल्प कालसापेक्ष होती, अर्थात पुढील काही वर्षांत त्यातले कलामूल्य तेच राहिले तरी ती कलाकृती केव्हाच संपलेली असेल.

 कलाकृतीतील कालनिरपेक्षता आपल्याला ओळखता येते का? काही शिल्पेही कालनिरपेक्ष असतात. कोणत्याही बिंदूपासून त्यांच्या जाणून घेण्याचा प्रवास कायम सुरू राहतो. आता हे नागलिंगाचं चित्रशिल्प पाहा, चित्र चालना देते आणि एक विचार प्रसवला जातो. आपल्यातच लपून बसलेल्या एका तत्वाचा शोध. दुसर्‍या एका चित्रात उमा महेश्वराची शिरविरहित मूर्ती आहे. आपला चेहरा आपली ओळख असतो. पण, प्रतीकांची तेथे कमी नाही. एक रामायणातल्या चित्राचे शिल्प आहे. हे शिल्प चित्रांइतकं सुंदर आहे, असे म्हणता येईल. चित्र पाहतां त्याची रंगसंगती पाहावी आणि शिल्प पाहतां त्याची घडवणूक, वेगवेगळ्या मितीतून ते पाहावं, पण या शिल्पाची रचना अशी आहे की, हे चित्रासारखं दिसावे. शिल्प पाहताना प्रकाशझोताचा त्यातला सहभाग मोलाचा असतो. महाविद्यालयाने प्रकाशयोजनेसाठी विद्यार्थ्यांना उत्तम साहाय्य केल्याचे दिसते.सोबतच मुद्राचित्रांचे प्रदर्शनही उत्तम होते. दगडावर कोरून त्याचा छाप घेऊन किंवा धातूच्या पाट्यावर कोरून त्याला अ‍ॅॅसिडमध्ये बुडवून त्यानंतर त्यात रंग घालून मुद्राचित्रे घेतली होती.

 ‘बडोदा स्कुल ऑफ आर्ट’ किंवा परदेशातील प्रदर्शन पद्धतीची छाया मुंबईतही पडू लागल्याचे या प्रदर्शनातील प्रोजेक्टर व काही शिल्पांवरून जाणवते. या प्रदर्शनात चित्र कसे पाहावे, हे शिकता आले. चित्राच्या तळाशी कलाकाराचे नाव दिनांक यासोबत माध्यम लिहिलेले असते. परंतु एका बाजूला ’रि’ अशी इंग्रजी अक्षरे असतात किंवा दोन/चार, एक/चार अशा सांख्यिक खुणा असतात. याचा अर्थ नेमका काय? तर मुद्राचित्र म्हणजे पारंपरिक छाप पद्धती. त्या एकापेक्षा जास्त घेता येतात. कलाकार त्याच्या तीन किंवा चार कॉपी घेतात. त्यातली पहिली असते ती ’आर्टिस्ट प्रूफ.’ यापैकी प्रदर्शनात लावलेली कोणती ते या संख्येच्या आधारे सांगितलेले असते. तरीही एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने खटकली. एखाद्या दालनात केवळ चित्रप्रदर्शन असावे किंवा केवळ शिल्प प्रदर्शन. चित्र पाहताना शिल्पांकडे दुर्लक्ष होऊ शकते किंवा शिल्प पाहताना पाठी असलेल्या चित्रांचा अडसर वाटू शकतो. तसेच कलाकृतींची गर्दी झाल्यासारखी वाटली. प्रदर्शन पाहायला रसिकही मोठ्या प्रमाणावर आले होते. परंतु, याच्याहीपेक्षा कलाकृतींची जास्त गर्दी झाली होती असे वाटते. प्रदर्शन संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू असते आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. प्रत्येक दिवशी नवी मेजवानी आणि बुद्धीला नवी पर्वणी. १३ तारखेला संध्याकाळी विदुषी श्रुती सडोलीकर यांच्या रागसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या शिष्यांसोबत त्यांनी संध्याकाळी सुरमैफील रंगवली. यमन रागाने सुरुवात करून नंतर धानी व इतर गीत प्रकार घेऊन ठुमरीने संगीत संध्येची सांगता केली. असे हे कलासंपन्न जेजेचे कलादालन...



मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.