नोकरभरतीला ब्रेक?

    25-Feb-2024
Total Views | 38
 Nashik Municipal Administration

महापालिकेत होणार्‍या नोकरभरतीसाठी नाशिक पालिका प्रशासनाने ’टीसीएस’ कंपनीशी करार केला आहे. गेल्या महिन्यात मनपाने शासनाकडे नोकरभरतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला असून, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आरोग्य व अग्निशमनच्या प्रस्तावित ५८६ पदांसाठीच्या भरतीला ब्रेक बसण्याची चिन्हे आहे. दरम्यान, लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहणार असल्याने, या सर्व घडामोडींचा फटका नोकरभरतीला बसून थेट पुढच्या वर्षीच भरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. महापालिकेत २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. एकीकडे अपुर्‍यामनुष्यबळामुळे दैनंदिन कामावर प्रचंड ताण पडत असताना, विविध विभागांतील कर्मचारी-अधिकार्‍यांची सेवानिवृत्त होणार्‍यांची संख्या वाढत आहे. यामुळे महापालिकेचाच कणा दिवसेंदिवस वाकत आहे. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष महासभा बोलावत, नोकरभरतीला मंजुरी दिली होती. त्यानंतर प्रशासकीय राजवट आल्यानंतर, भरतीसाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु, मागे चार ते पाच महिने महापालिकेला पूर्णवेळ आयुक्तच नसल्याचे भरतीला याचा फटका बसला. ’टीसीएस’ कंपनीशी करार होऊन वर्ष होत आहे. परंतु, या कंपनीकडे राज्यातील इतर महापालिकांतील भरतीची जबाबदारी असल्याने, मनपातील भरती प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. मंजूर २ हजार, ७०० पदांपैकी आरोग्य व अग्निशमन विभागातील ५८६ पदे प्राधान्य देऊन भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, फेब्रुवारी संपण्यात आला असल्याने, अद्याप नोकरभरतीला चाल मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे भरती प्रक्रिया लोकसभेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘कोरोना’काळात आस्थापना खर्च खाली आल्याने, नोकरभरतीच्या अपेक्षा उंचावल्या. नंतर आस्थापना खर्च चाळीशी पार गेला. परंतु, राज्य शासनाने आरोग्य व अग्निशमन या दोन विभागांसाठी आस्थापनाची अट रद्द केली. सध्या पालिकेत मनुष्यबळाची मोठी आवश्यकता असली, तरी प्रशासनाकडून त्यास चाल देण्याची आवश्यकता आहे. ‘टीसीएस’ कंपनीला नोकरभरतीचे काम दिले आहे. परंतु, या प्रक्रियेला वेग मिळत नसल्याचे चित्र आहे.

हेलिपॅड झाले वाहनतळ!

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘युवा महोत्सवा’च्या उद्घाटनासाठी नाशिकला आले असता, ते हेलिकॉप्टरने पंचवटीतील निलगिरी बाग येथे उतरणार असल्याने, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सात एकरवर भव्य हेलिपॅड तयार करण्यात आले होते. तसेच या परिसरात चकाचक रस्ते तयार करण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी स्थानिक नागरिक निलगिरी बागेतील जागेचा वापर चक्क वाहन पार्किंगसाठी करत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात राजकीय नेत्यांसह अनेक व्हीआयपी लोकांची ये-जा सुरू असते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री विमान अथवा हेलिकॉप्टरला प्राधान्य देतात. शहरात ओझर विमानतळ, पोलीस परेड मैदान, भुजबळ नॉलेज सिटी, ‘संदीप फाऊंडेशन’ या मोजक्या ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था आहे. व्हीआयपी लोक या हेलिपॅडचा वापर करतात. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौर्‍यात लाखो रुपये खर्च करून, तपोवनातील निलगिरी बाग येथे हेलिपॅड बनविण्यात आले. मात्र, मोदींच्या दौर्‍यानंतर या हेलिपॅडचा वापर स्थानिकांकडून वाहने पार्किंगसाठी तसेच क्रिकेट खेळण्यासाठी होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महापालिकेने या ठिकाणी कंपाऊंड करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा पार्किंगसाठी वापर होणार नाही व व्हीआयपी लोकांच्या आगमनावेळी या हेलिपॅड कायमस्वरुपी कामात येऊ शकेल. अन्यथा, हेलिपॅडसाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे. तेही कायमस्वरुपी वापरता येईल, अशा पद्धतीचे आहे. पण, मोदींचा दौरा उरकताच, या हेलिपॅडकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून, स्थानिकांकडून वाहने लावण्यासाठी, या हेलिपॅडचा वापर सुरू आहे. शिकाऊ वाहन चालकांकडून या ठिकाणी वाहने चालवण्यासाठी, हेलिपॅड वापरात आणले जात आहे. एकूणच हेलिपॅडसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया जात असून, हेलिपॅड खराब होण्याची भीती आहे. ते पाहता मनपा बांधकाम विभागाने हेलिपॅड ताब्यात घेत, आजूबाजूला सुरक्षा भिंत अथवा कुंपण घालणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये तीन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून, पर्वणी काळात राजकीयसह प्रतिष्ठित मान्यवर हजेरी लावणार आहे. बहुतांश लोक मुंबईवरून नाशिकला येण्यासाठी, हेलिकॉप्टरला पसंती देतात. ते पाहता निलगिरीबाग येथील हेलिपॅड गरजेचे आहे. मोदींच्या दौर्‍यामुळे तयार हेलिपॅड महापालिकेला मिळाले आहे.

गौरव परदेशी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121