९ ऑगस्ट रोजी जगामध्ये 'वर्ल्ड इंडिजिनस डे' म्हणजेच जागतिक मूलनिवासी दिन साजरा केला जातो. काही वर्षांपासून भारतातही हा आदिवासी दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे, पण त्यामागे दडलेला क्रूर इतिहास बहुतांश लोकांना माहीत नाहीये, आणि या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही राष्ट्रविरोधी शक्ती फक्त तुम्हीच मूलनिवासी आहात, आदिवासी आहात, उर्वरित भारतीय वेगळे आहेत, असा भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा करण्यासाठी त्यांना प्रेरित करत आहेत.
अशावेळी महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष होत आहे ते म्हणजे भारतामध्ये आदिवासी म्हणजेच जनजाती समाजाची गौरव गाथा खूप वेगळी आहे. बाकीच्या जगापासून वेगळी आहे. फार प्राचीन काळापासून भारतीयांना आणि साऱ्या जगाला माहीत आहे की सर्वच भारतीय आदिवासी आहेत, आदि निवासी आहेत, मूलनिवासी आहेत. येथे कोणीही बाहेरून आलेले नाही.
भारतातील जनजाती समाजाने जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण - संरक्षण करून जगापुढे एक आदर्श मांडला आहे. आजच्या प्रदूषणाच्या काळात त्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत आहे. जनजाती समाजाकडे असलेले वनौषधींचे ज्ञान असामान्य आहे, त्याचा अभ्यास आणि जतन, संवर्धन होणे आवश्यक आहे. जनजाती समाज निसर्गपूजक आहे. जंगलात राहाताना त्यांनी तेथील निसर्गाशी सुंदर नाते जपले आहे. यामध्ये स्वसंरक्षणासाठी लागणारे कसब आणि धाडस त्यांच्याजवळ आहे. ते धाडसी योद्धा सुद्धा आहेत. याचा प्रत्यय भारतामध्ये अनेक वेळा जेव्हा परकीय सत्तांनी आक्रमण केले त्यावेळेला आलेला आहे. भारताच्या स्वतंत्रता संग्रामात अनेक जनजाती वीरांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. त्या नावांची यादी न संपणारी आहे. हा प्रेरणादायी इतिहास सर्वांना परिचित व्हावा, भारतात आणि बाहेर जगाला कळावा म्हणून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात या क्रांतिवीरांचा परिचय मोठ्या प्रमाणावर सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा अगणित क्रांतिवीरांपैकी एक म्हणजे 'भगवान बिरसा मुंडा' ज्यांना आपुलकीने व आदराने 'धरती के आबा' असे सुद्धा संबोधले जाते.त्यांचा जन्मदिवस १५ नोव्हेंबर, हा जनजाती गौरव दिवस साजरा करण्याचे म्हणूनच ठरविण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा हे फक्त योद्धा नव्हते तर उत्तम समाज कार्यकर्ता पण होते. धार्मिक नेता होते. त्या काळात एकदा चेचक म्हणजेच प्लेगची साथ आली होती, त्यावेळी घाबरून गेलेल्या समाजाला त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व या संदर्भातील धार्मिक प्रथा कोणत्या योग्य आहेत कोणत्या अयोग्य आहेत, ते समाजाला समजावून सांगितले त्यांना याबाबत जागृत केले. त्यानंतर त्यांना जेव्हा आनंद पांडे या त्यांच्या गुरूंचा सहवास लाभला तेव्हा त्यांना खूप काही शिकायला मिळाले ते ज्ञान त्यांनी ' बिरसाईयत 'पंथ स्थापन करून आपल्या समाजापर्यंत पोहोचवले आणि जनजागृतीचे खूप महत्त्वाचे काम केले तर दुसरीकडे इंग्रजां तर्फे होणाऱ्या अन्यायाविरोधात समाजाला जागरूक करून 'उलगुलान ' ( क्रांती ) ची घोषणा केली व इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास आपल्या समाजाला समर्थ बनवले. स्वतंत्रता संग्रामातील एक महत्त्वाचा लढा म्हणून याचे महत्त्व खूप आहे. हा इतिहास सर्वच भारतीयांसाठी तसेच जनजाती समाजासाठी खूप अभिमानाचाआहे, गर्वाचा आहे, म्हणून आपण या दिवशी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करायला सुरुवात केली.
९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो पण त्या मागचा क्रूर इतिहास भारतीय जनजाती समाजाला साजेसा नाहीये.
फार पूर्वीपासून भारताचे वैभवशाली विश्व जगाला ज्ञात होते. पण ते भारतापर्यंत पोहोचले नव्हते. विशेषतः युरोपियन देशांना भारताचा शोध घेण्याचे विशेष महत्त्व वाटत होते. व्यापारांना व्यापारासाठी, नवीन वसाहती बनविण्यासाठी आणि चर्चला धर्मप्रचारासाठी नवनवीन ठिकाणांचा, देशांचा शोध लावणे आवश्यक वाटत होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर चर्च तर्फे आर्थिक मदत मिळत होती .१४९२ मध्ये भारताचा शोध घ्यायला निघालेला कोलंबस हा साहसी दर्यावर्दी अमेरिकेला पोहोचला. त्याला वाटले आपल्याला भारत देशाचा शोध लागला आहे, असे समजून तेथे राहणाऱ्या लोकांना तो रेड इंडियन संबोधू लागला. एकदा या देशाचा शोध लागल्यावर अनेक युरोपियन व्यापारी आपापले सैन्य घेऊन तेथे पोहोचले. यामध्ये सर्वात मोठी संख्या होती ती इंग्रजांची. या सर्वांमध्ये आणि तेथील स्थानिक लोकांमध्ये अनेक वर्ष संघर्ष होत राहिला. शेवटची मोठी लढाई नऊ ऑगस्ट रोजी इंग्रज आणि स्थानिक लोकांमध्ये झाली. इंग्रजांकडे आधुनिक शस्त्र होती पण स्थानिक लोकांकडे मात्र परंपरागत वापरण्यात येणारी जुन्या प्रकारची शस्त्रे होती, त्यामुळे शेवटी त्यांचा पराभव झाला. ते खूप धीराने, हिमतीने लढले, पण त्यांना हे युद्ध जिंकता आले नाही आणि त्यानंतर त्यांचे खूप हाल झाले. खूप लोक मारले गेले,उरलेले थोडे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात वसती करून राहिले. ते अमेरिकेतील मूलनिवासी होते, पण आज त्यांना त्यांच्या देशात दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागविले जाते. या गोष्टीचा आणि आपल्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा त्यांना खूप अपमान वाटतो. १९९२ मध्ये कोलंबसने अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवले, त्याला पाचशे वर्ष झाली म्हणून अमेरिकेने मोठा सोहळा साजरा करायचे ठरविले होते. या गोष्टीला या मूलनिवासी समाजाने प्रचंड विरोध केला आणि 'गो कोलंबस गो' अशा घोषणा देत आपला राग व्यक्त केला . हे वृत्त साऱ्या जगभर पसरले आणि मूलनिवासींची व्यथा जगातील लोकांपर्यंत पोहोचू लागली, तेव्हा मूलनिवासींना शांत करण्यासाठी अमेरिकेने ९ ऑगस्ट हा 'मूलनिवासी जागतिक दिन' म्हणून जाहीर केला. पण दरवर्षी या दिवशी हे मूलनिवासी लोक आपला प्रखर विरोध नोंदवतात. त्यांच्यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस खूप दुःखाचा, अपमानाचा त्यांना वाटतो.
हा इतिहास जाणून घेतल्यानंतर भारतीय जनजाती समाजाला अमेरिकेतील मूलनिवासी समाजाची नाराजी आणि दुःख जाणून घेतल्यावर तो दिवस सण म्हणून साजरा करणे योग्य वाटणार नाही.
भारतीय जनजाती समाजाला स्वतःची अशी प्राचीन, सुंदर संस्कृती आहे. अनेक सणवार आहेत. अनेक संत महात्मे आपल्या देशात होऊन गेले आहेत. अनेक क्रांतिवीर, समाज सुधारक, जनजाती समाजात होऊन गेले, त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ त्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तेव्हा, किंवा एखाद्या युद्धाची तारीख असेल, ज्यामध्ये त्यांच्या विजयाची गौरव गाथा असेल ,असा एखादा दिवस 'जनजाती गौरव दिवस' म्हणून साजरा करणं जास्ती योग्य वाटेल , या विचारातून १५ नोव्हेंबर रोजी 'जनजाती गौरव दिवस' साजरा करायला सुरुवात झाली.
मोहिनी प्रभाकर पाटणकर
जनजाती कल्याण आश्रम कार्यकर्ती
८३८००६५२०९