ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका नीला वसंत उपाध्ये कालवश

    08-Oct-2024
Total Views | 92

neela upadhye  
 
 
मुंबई : महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील पहिल्या महिला पत्रकार व पुर्णवेळ बातमीदारी करणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार तथा ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक नीला वसंत उपाध्ये यांचे ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १०.२० वाजता मुंबईत चेंबूर येथे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
नीला उपाध्ये यांनी माध्यम क्षेत्रात महिला म्हणून नवी क्रांती घडवून आणली. नीला उपाध्ये या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह आणि उपाध्यक्ष होत्या. त्याशिवाय पत्रकारितेसोबतच साहित्य, समीक्षक, ललित, स्त्रीवादी लेखिका म्हणूनही त्यांची ख्याती होती.
 
नीला उपाध्ये यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनची पदवी व मुंबई विद्यापीठातून एम.ए पुर्ण केले होते. १९७० पासून ३६ वर्ष नीला उपाध्ये यांनी दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले होते. २००५ साली नियत वयोमानानुसार त्या माध्यम क्षेत्रातून निवृत्त झाल्या. नीला उपाध्ये या मराठी पत्रकारितेतील पहिल्या पुर्णवेळ काम करणाऱ्या महिला वार्ताहार होत्या. 
 
तसेच, मुंबई विद्यापीठ-गरवारे आणि पनवेलच्या ठाकूर महाविद्यालयातील मराठी पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १९९७ पासून त्या समन्वयक आणि अध्यापिका होत्या. याशिवाय, ४९ वर्ष महाराष्ट्र टाइम्स, मुंबई तरुण भारत, मुंबई सकाळ, ललित, स्त्री, माहेर, फेमिका, दामिनी आदि अनेक नियतकालिकांतून विपूर वैचारिक, ललित तसेच, राजकीय स्तंभलेखन देखील त्यांनी केले आहे. पत्रकारितेसाठी त्यांना ‘डहाणूकर’, ‘अप्पा पेंडसे’, ‘प्रभाकर पाध्ये’, ‘गुर्जर’, ‘भारत विकास परिषद’, ‘वुमन ऑफ दि इयर’, ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ आदी पुरस्कार मिळाले आहेत.
 
बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत शताब्दीनिमित्त नागरी सत्काराचा मान लाभलेल्या आणि महाराष्ट्र विधानसभा सुवर्णमहोत्सवानिमित्त विधीमंडळाकडून सन्मानित त्या एकमेव महिला पत्रकार आहेत. ‘सत्यजित : रुपेरी पडद्याचा कवी’, ‘शब्दवती शांताबाई’, ‘संशोधक य. दि. फडके’, ‘युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर’,‘मी वसंतकलिका’,‘पत्रकार दि. वि. गोखले : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ यांसारखी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या त्या माजी उपाध्यक्ष होत्या. नॅशनल बुक ट्रस्टच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य होत्या. पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार समितीच्या तसेच दिल्लीच्या राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण निधी समितीच्याही त्या माजी सदस्य होत्या. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121