‘पीडीपी’चा पराभव

    08-Oct-2024
Total Views | 48
assembly election results


देशात हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले असून, त्यात हरियाणामध्ये भाजपने धक्कातंत्र कायम ठेवत, विजयश्री खेचून आणली, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीने विजय संपादित केला. ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक संपन्न झाली. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीचे महत्त्व होतेच. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला चांगले यश मिळाले असले तरी, मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला मात्र काश्मिरी आवामने सपशेल नाकारले आहे. हा पीडीपीचा गेल्या २५ वर्षांतील दारुण पराभव म्हणावा लागेल. पीडीपीला जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले असून, या विधानसभेच्या निवडणुकीत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीला देखील पराभवाची चव काश्मिरी जनतेने चाखवली. १९९९ साली स्थापन झालेल्या पीडीपीने, २००२ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लगेचच काँग्रेसच्या सहकार्याने सत्तासोपान गाठले. त्यानंतर २०१४ साली सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीने, भाजपबरोबर युती करत २०१८ सालापर्यंत सत्तेची कमान सांभाळली होती. दरम्यान, गेल्या दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. काश्मिरी जनतेने राष्ट्रपती राजवटीच्या काळात इतकी वर्षे केवळ भाषणांमध्ये ऐकलेला विकास आणि शांतता प्रत्यक्षात अनुभवली आणि म्हणूनच यंदा पीडीपीला काश्मिरींनी नाकारले आहे. मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘हिजबुल्ला’चा म्होरक्या नसराल्लाच्या मृत्यूचे भांडवल करीत मेहबूबा मुफ्ती यांनी, चक्क मोर्चे काढण्याची शक्कलदेखील लढवून पाहिली. मात्र, त्यांच्या राजकीय भूमिकेला जम्मू-काश्मीरच्या जनतेने कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. श्रीगुफरा-बिजबेहरा हा पीडीपीचा पारंपरिक मतदारसंघ. या मतदारसंघातून मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हिला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर वीरी याने इल्तिजा मुफ्तींचा ९ हजार, ७७० मतांनी पराभव केला. तेव्हा एकूणच काय, पीडीपीच्या राजकारणाला काश्मिरी जनतेने सुरुंग लावला आहे, हे निश्चित.

‘आप’चा चंचुप्रवेश घातक


दिल्लीकरांना रेवडीवाटपाची सवय लावणार्‍या रेवडीबाज आम आदमी पक्षाला हरियाणाच्या निवडणुकीत मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. हरियाणामध्ये लढवलेल्या ८९ जागांपैकी एकाही जागेवर ‘आप’ला विजय मिळवता आलेला नाही. अरविंद केजरीवाल यांच्या ‘भ्रष्ट राजकारणी’ म्हणून निर्माण झालेल्या प्रतिमेची सर्वात मोठी झळ ‘आप’ला हरियाणामध्ये बसली. लोकसभा निवडणुकीत ‘इंडी’ आघाडीचा घटक असलेल्या ‘आप’ने हरियाणा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला होता. त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाशी फारकात घेतली होती. मद्य घोटाळ्याच्या आरोपात जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद त्यागत ते आतिशी मार्लेना यांच्या गळ्यात मारले. त्यामुळे हरियाणाच्या प्रचारासाठी ते मुक्त होते. हरियाणाच्या बाजूला असलेल्या पंजाब या राज्यामध्ये सध्या ‘आप’चे सरकार असून, त्यांच्या शासनकाळात तेथील सुरक्षा आणि शासनव्यवस्था हा कायमच टीकेचा विषय राहिला आहे. पंजाबबरोबर हरियाणामध्ये सत्ता आल्यास तिकडे मुख्यमंत्री म्हणून बसण्याची स्वप्नेदेखील केजरीवालांना मध्यंतरी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या चर्चांना मूर्त स्वरूप न देण्याची जबाबदारी हरियाणाच्या जनतेने उत्तम निभावली. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची जन्मभूमी असलेल्या हरियाणानेच त्यांच्या रेवडीवाटप संस्कृतीला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे, तर, हरियाणामध्ये जरी मानहानिकारक पराभव झाला असला तरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘आप’ने खाते उघडले असून, चंचूप्रवेश केला आहे. डोडा मतदारसंघात मेहराज मलिक या ‘आप’च्या उमेदवाराने भाजपच्या गजय राणा यांचा ४ हजार, ५३८ मतांनी पराभव केला. बहुपक्षीय लढतीचा मोठा फायदा या मतदारसंघात ‘आप’ला झालेला दिसतो. पंजाब राज्यात आज वाढणार्‍या पाकिस्तानपुरस्कृत अमली पदार्थांच्या वापरावर नियंत्रण आणणे, ‘आप’ला अजूनही जमलेले नाही. तसेच, राज्यात ‘आप’ची सत्ता असतानाच, लोकसभेत खलिस्तानी समर्थक तुरुंगात बसून निवडणूक लढवत खासदार झाला आहे, याकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यामुळे ‘आप’सारख्या पक्षाचा चंचूप्रवेश जम्मू-काश्मीर सारख्या संवेदनशील सीमावर्ती राज्यांमध्ये होणे, ही देशाच्या द़ृष्टीने चिंतेचीच बाब म्हणावी लागेल.


कौस्तुभ वीरकर 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ९ हजार अश्वशक्ती इंजिनाचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ९ हजार अश्वशक्ती इंजिनाचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मे रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाहोद येथे स्थापन झालेल्या रेल्वे उत्पादन युनिटमध्ये उत्पादित केलेल्या पहिल्या ९ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन करतील. पीपीपी मॉडेल अंतर्गत स्थापन झालेला दाहोद येथील रेल्वे कारखाना पुढील १० वर्षांत १,२०० इंजिन तयार करणार आहे, ज्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याची योजना आहे. १०० टक्के मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लवकरच ही लोकोमोटिव्ह इंजिने पूर्णपणे तयार केली जातील...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121