वेगवान विकासाचे ‘बुलेट युग’

    23-Jan-2024   
Total Views |
 Bullet Era
 
 
भाजप सरकारच्या काळात विकासाचा मुद्दा केवळ जाहीरनाम्यांपुरता मर्यादित न राहता, तो प्रत्यक्ष जमिनीवरही साकारलेला दिसतो. विशेषकरुन दळणवळणाच्या क्षेत्रात २०१४ पासून झालेली आमूलाग्र क्रांती सर्वस्वी लक्षणीयच. जलद प्रवासासाठी हायस्पीड बुलेट ट्रेन हादेखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गाचे वेगवान बांधकाम सुरु असून, देशातील इतरही शहरांमध्ये असेच ‘बुलेट युग’ आगामी काही वर्षांत अवतरलेले दिसेल. त्याचाच या लेखात घेतलेला सविस्तर आढावा.
 
राज्यात सत्तांतर झाल्यावर अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट गाड्यांकरिता राज्य सरकारच्या आवश्यक सर्व मंजुर्‍या व लागणारी सर्व भूखंड तातडीने संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या प्रकल्पासाठी भूखंड मिळविण्यासाठी खीळ बसली होती, हे इथे लक्षात घ्यायला हवे.
खरं तर कुठल्याही प्रकल्पासाठी पुढील तीन घटक अत्यंत महत्त्वाचे - भूखंड, निधी आणि तंत्रज्ञान. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सरकारने आता १०० टक्के भूसंपादन पूर्ण केले आहे. दि. ८ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दादरा-नगर हवेली येथील १ लाख ३८ हजार ९४९ हेक्टर जागा या प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आली आहे. आवश्यक अशा जमिनीचा ताबा मिळाल्याने महाराष्ट्र, गुजरात व दादरा-नगर हवेलीमध्ये बुलेट ट्रेनची कामे वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना एकूण २ हजार, २४८ कोटी रुपयांचा मोबदलाही सरकारतर्फे देण्यात आला.
 
केंद्र सरकारने देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारण्यासाठी, प्रकल्पाची आखणी व अंमलबजावणी करणे, याकरिता फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड’ (NHRCL) कंपनीची स्थापना केली. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अंदाजे खर्च आता एक लाख आठ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद या प्रवासासाठी आता किमान तीन हजार रुपये मोजावे लागण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. ८८ हजार कोटी रुपये जपानकडून कर्ज; दहा हजार कोटी केंद्र सरकारकडून आणि प्रत्येकी पाच हजार कोटी महाराष्ट्र व गुजरात राज्यांकडून यासाठी निधी मिळणार आहे.
 
गुजरातमधील या मार्गाचा वापी ते अहमदाबाद हा ३५० किमीचा टप्पा २०२७ किंवा २०२८ मध्ये सेवेत येणे अपेक्षित आहे. एकूण ५०८ किमी लांबीच्या कॉरिडोरमध्ये वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार व बोईसर ही स्थानके महाराष्ट्रात आणि वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, बडोदे, आनंद, अहमदाबाद व साबरमती अशी गुजरातमध्ये एकूण १२ स्थानके असतील. राज्यातील स्थानके परंपरेला साजेशी असतील. म्हणजे बीकेसी स्थानकात सागरी लाटा; ठाणे नदीच्या लाटा; विरारमध्ये पर्वतरांगांची झुळूक; बोईसर मासेमारीच्या जाळ्यात अशी नटविली जाणार आहेत.
 
बुलेट ट्रेन ५०८ किमी कॉरिडोरमध्ये व्हायाडक्ट ४६५ किमी; ३ रोलिंग स्टॉक डेपो; २८ स्टिल ब्रिजेस (यात दोन किमी वैतरणा नदीवर पूल); नऊ टनेल (यात सात किमी सागराखालून मार्ग काढला जाईल, देशात असे काम प्रथमच). या प्रकल्पामध्ये ४० मी लांब व ९७० टनाचे गर्डर्स, ब्रिज गॅन्ट्री, ट्रान्स्पोर्टर वापरणार; एकूण सिमेंट १.६ घनमी; स्टिल १७ लाख मेट्रिक टन लागणार आहे. तसेच गुजरातमधील भागातील वापी-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाकरिताचे कंत्राट नक्की झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ३२० किमी वेगाने धावणार आहे. सध्या ट्रेन पूर्ण प्रवासाला सहा तास घेते, तो प्रवास २ तास ५८ मिनिटांत होणार आहे.
 
राज्यात आणखी दोन बुलेट ट्रेन - मुंबई-नाशिक मार्गे नागपूर ७४० किमी आणि मुंबई-पुणे मार्गे हैदराबाद ७११ किमी देखील प्रस्तावित आहे.
मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या ५०८ किमी कामामधल्या वापी ते अहमदाबाद मार्गाकरिता ३५२ किमी काम (३४८ किमी गुजरातमध्ये आणि चार किमी दादरा-नगर हवेलीमध्ये) करण्याच्या कंत्राटाकरिता कंत्राटदार ‘इरकॉन इन्टरनॅशनल लिमि.’ यांच्याबरोबर करार झाल्याने दि. २१ जानेवारी, २०२२ रोजी त्यांनी कंत्राटावर सह्या केल्या. बुलेट ट्रेनचे हे ३५२ किमीचे काम जलदगतीने सुरू झाले आहे व हे काम पूर्ण व्हायला २०२७ साल उजाडणार आहे.
 
कामाचे स्वरूप
रेल्वे ट्रॅक प्ररचित करणे, प्ररचित केलेला ट्रॅक पुरविणे, प्रस्तावित जागेवर ट्रॅक बांधणे व संबंधित कामे करणे व त्यानंतर त्यांची यशस्वी ट्रॅकवर चाचणी करून ते जागेवर अंतिम करणे. या कामात भारनियमन करणारे रेल्वे ट्रॅक जसे जपानमध्ये वेगाने जाणार्‍या रेल्वे गाड्यांकरिता बांधले आहेत (शिंकनसेन) तसे ट्रॅक प्रस्तावित मार्गाकरिता बांधणे. असे ट्रॅक भारतात प्रथमच बांधण्यात येणार आहेत.
 
याकरिता सल्लागार ‘जपान रेल्वे ट्रॅक कन्सलटन्ट लिमि.’ यांनी ते सविस्तर पद्धतीने प्ररचित आणि रेखांकित केलेले आहेत. ही ट्रॅकची कामे सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. त्यात सल्लागारांनी ट्रॅकचे मुख्य व महत्त्वाचे अंगभूत घटक, ट्रॅकस्लॅब रचना आणि वेगाने जाणार्‍या रेल्वेचे सततचे पडणारे जोर सहन करण्यासाठी ट्रॅकवर वेल्डेड कामे दर्शविली आहेत.
 
राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात
पहिला टप्पा (सी-१)
‘एनएचआरसीएल’ने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भुयारी टर्मिनससाठी दुसर्‍यांदा निविदा मागविल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘एनएचआरसीएल’ने प्रथम निविदा मागविल्या होत्या. परंतु, बीकेसीच्या प्रस्तावित जागेत कोरोना केंद्र असल्याने प्रस्तावित जागेचा ताबा ‘एनएचआरसीएल’ला त्यावेळी मिळू शकला नव्हता.
या प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुलातील टर्मिनस स्थानकाच्या बांधकामाला आरंभ झाला आहे. रस्ते सपाटीपासून ३२ मी. खोल खोदकाम करून स्थानकाची बांधणी करण्यात येणार आहे. या स्थानकाच्या प्रकल्पाकरिता ‘एनएचआरसीएल’ने बीकेसीमधील ४.८५ हेक्टर्स जमीन बांधकामासाठी कंत्राटदाराकडे सुपुर्द केली आहे. जमिनीची तांत्रिक तपासणी व माती परिक्षणाची कामेदेखील पूर्ण झाली आहेत.
 
कामाचे स्वरुप - बीकेसीमध्ये मुंबई स्थानकाच्या आराखड्याप्रमाणे ४.८५ हेक्टर्स जागेत भुयारी स्थानक टर्मिनसची निर्मिती करणे.
कंत्राटदार - ‘मेधा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर’आणि ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन’ (संयुक्तपणे) यांची बांधकामासाठी मार्च २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण अंदाजे खर्च रु. ३६८०.९७ कोटी. कालमर्यादा - काम सुरू झाल्यानंतर ५४ महिने.
बांधकामाची पद्धत - ‘बॉटम अप’ या पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. जमिनीच्या पातळीपासून खोल खोदकाम करून लगोलग त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ३२ मी. खोल खोदकामासाठी १८ लाख घनमी माती काढण्याचे नियोजन करावे लागणार आहे. खोदकाम करत असताना माती कोसळण्याच्या घटना घडू नयेत, म्हणून सुरक्षिततेकरिता मदत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत १७ ते २१ मी. खोलीपर्यंत एकूण ३३८२ सेकंट पाईल्स बसविण्यात येणार आहेत. दर २.५ ते ३.५ मी.पर्यंत अँकर्स आणि वॉलर्स बसविल्यामुळे सेकंट पाईल्सना बळकटी येणार आहे. प्रथमच्या टप्प्यात ५५९ कामकरी व पर्यवेक्षक रात्रंदिवस काम करणार आहेत. पुढील कामात या कामावर सहा हजार श्रमिकांची गरज निर्माण होणार आहे.
 
बीकेसीमधील मुंबई बुलेट स्थानक तीन मजली टर्मिनसचे स्वरुप - पहिला मजला - तिकीट यंत्रणा व उपहार गृहे; दुसरा मजला -बुलेट ट्रेन टर्मिनसमध्ये ये-जा करणार्‍या प्रवाशांसाठी मेट्रोमार्गाने जाण्या येण्याकरिता सोय; तिसरा मजला - एकूण सहा फलाट - अहमदाबाद मार्गाला (२), चेन्नई मार्गाला (२) आणि नागपूर मार्गाला (२). फलाटांची लांबी ४२५ मी; १६ डब्यांची बुलेट ट्रेन असेल. फलाटांची खोली जमिनीपासून- २५ मी. या मजल्यावर प्रवाशांकरिता मनोरंजन आणि अन्य सुविधा राहणार.
इतर स्वरुप - प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही; प्रवासी उद्घोषणा यंत्रणा; प्रतीक्षालय; तिकीट खिडक्या; नर्सरी आणि अन्य सुविधा असणार; नैसर्गिक प्रकाश थेट फलाटांवर राहील, असा आराखडा असणार; टर्मिनल प्रवेशासाठी एमटीएनएल इमारतीच्या दिशेने प्रवेशगेट प्रस्तावित.
 
दुसरा टप्पा (सी-२)
मुंबई बुलेट बीकेसी स्थानक ते शिळफाटा बुलेट मार्गिका, ठाणे खाडीखाली दुहेरी भुयारी बुलेट मार्गिका, या कामासाठी ‘अ‍ॅफकॉन्स’ला करारबद्ध केले जाणार आहे. एकूण अंदाजे खर्च रु. ६३९२ कोटी. कालमर्यादा - काम सुरू झाल्यानंतर ६० महिने.
कामाचे स्वरुप - टनेल काम १३.१ मी व्यासाचे व दुहेरी ट्रॅकचे २०.३७ कि.मी लांब व बीकेसी स्थानकापासून शीळफाट्यापर्यंत आणि यापैकी सात किमी समुद्राखाली असणार. टनेलचे काम तीन वेगवेगळ्या बोअरिंग मशीनने व शेवटचे ४.९६ किमी ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने करणार. टनेलची खोली २५ ते ४० मी. इतकी असेल.
 
तिसरा टप्पा (सी-३)
महाराष्ट्र सीमेवरील १३५ किमी बुलेट मार्गिका शीळफाटा ते झरोली व ठाणे डेपोसह ठाणे, विरार, बोयसर स्थानकांची उभारणी केली जाईल. या टप्प्यात १२४ किमी व्हायाडक्ट व ब्रिजेस; सहा बोगदे; ३६ नद्या वा इतर अडचणी ओलांडणे (यात १२ स्टिल ब्रिजेसचा समावेश);
 
देशात आणखी सात बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित आहेत. ते पुढीलप्रमाणे.
मुंबई-नागपूर (७४० किमी); दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी); दिल्ली-अमृतसर (४५९ किमी); मुंबई-हैदराबाद (७११ किमी); चेन्नाई-म्हैसूर (४३५ किमी); वाराणसी-हावडा (७६० किमी); दिल्ली-वाराणसी (९४२ किमी)
चीनमधील बुलेट ट्रेन नेटवर्क
सध्या ४२ हजार किमी बुलेट ट्रेनचे (कडठ) नेटवर्क अस्तित्वात आहे व त्यात २०२५ सालापर्यंत भर पडून ते नेटवर्क ५० हजार किमी बनण्याची शक्यता आहे. तेव्हा ते जगातील सर्वांत मोठे बुलेट ट्रेनचे नेटवर्क असेल.
सध्या आपले बुलेट ट्रेनचे प्रस्तावित नेटवर्क ५ हजार, ४४१ किमी आहे. ते पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षे जातील. त्यानंतरच आपल्या देशात बुलेट ट्रेनचे युग अवतरणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.