‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाक लष्कराचे मनोबल खच्ची, विश्वासार्हताही रसातळाला – ब्रिगेडियर मुदित महाजन

    20-May-2025   
Total Views |


नवी दिल्ली :  ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानी सैन्याचे केवळ संख्याबळच नव्हे तर मनोबल आणि विश्वासार्हतेच्या बाबतीतही मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूंछ ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मुदित महाजन यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.

ब्रिगेडियर महाजन म्हणाले, पाक सैन्याचे नुकसान केवळ संख्येने नव्हते, तर ते मनोबल आणि आघाडी घेण्याच्या बाबतीतही होते. पाक सैन्याने आज त्यांनी त्यांच्याच राष्ट्रासमोर त्यांची विश्वासार्हता गमावली आहे. शत्रूवर मोठ्या प्रमाणात प्राणघातक आणि गैर-प्राणघातक जीवितहानी झाल्याचे आमच्याकडे इनपुट आहेत. प्रत्येक दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, ते फक्त काही काळासाठी स्थगित असल्याचा पुनरुच्चारही ब्रिगेडियर महाजन यांनी केला.

भारतीय लष्कराच्या पूंछ ब्रिगेडने ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्यवर्ती भूमिका पार पाडल्याचे ब्रिगेडियर महाजन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, पाकच्या विनाकारण केलेल्या आक्रमणाला पूंछ ब्रिगेड तीव्र प्रत्युत्तर देत होती. सैन्याने अतुलनीय अचूकता आणि उद्देशाने हल्ला केला. नऊ महत्त्वाच्या दहशतवादी ठिकाणांपैकी सहा पूंछ, राजौरी आणि अखनूरच्या विरुद्ध बाजुस होते आणि त्या रात्री त्यांना प्रभावीपणे निष्क्रिय करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारतीय लष्कराची हवाई संरक्षण यंत्रणा ठरली ‘ढाल’

पाकिस्तानी सैन्याने नागरी क्षेत्रांना अंदाधुंदपणे लक्ष्य करून वाढवल्याने भारतीय सैन्याने त्यांच्या लष्करी लक्ष्यांवर निर्णायकपणे हल्ला केला. शत्रूने झुंडीच्या ड्रोनचा नवीन धोका निर्माण करताच, लष्कराचे हवाई संरक्षण मजबूत ढाल म्हणून उदयास आले. या यंत्रणेने आपली क्षमता सिद्ध करून प्रत्येक धोक्यास रोखण्यासाठी अत्यंतिक समन्वय दाखवला, असेही ब्रिगेडियर महाजन यांनी यावेळी नमूद केले आहे.