कहान पॅकेजिंगचा आयपीओ ६ सप्टेंबरला खुला
मुंबई : पॉलिमरयुक्त पिशव्यांचे उत्पादक आणि पुरवठादार असलेली कहान पॅकेजिंग कंपनी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी आपला आयपीओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्री योजना (बुधवार) आणणार आहेत. हेम सिक्युरिटीज लि. हे या आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत, तर पूर्वा शेअरजिस्ट्री रजिस्ट्रार आहेत. हा आयपीओ सहा सप्टेंबर रोजी खुली होणार असून, आठ सप्टेंबर रोजी बंद होईल.
बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर या शेअरची नोंदणी करण्याचा प्रस्ताव आहे . कंपनीने प्राथमिक बाजारात आपल्या शेअरची किंमत प्रति शेअर ८० रुपये निश्चित केली आहे. या इश्यूचा आकार ५.७६ कोटी रुपये आहे . प्रत्येक लॉटमध्ये एक लाख २८ हजार रुपये किमतीचे १६०० इक्विटी शेअर आहेत.
कंपनी या इश्यूद्वारे ७,२०,००० इक्विटी शेअर्स जारी करत आहे. कंपनीने रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी दोन कोटी ७२ लाख ६४ हजार रुपये किमतीचे तीन लाख ४० हजार ८०० इक्विटी शेअर्स आरक्षित केले आहेत. एकूण तीन लाख ३९ हजार २०० इक्विटी शेअर्स इतरांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्यात एनआयआय आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यासाठी दोन कोटी ७१ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या शेअरचा समावेश आहे. मार्केट मेकरसाठी, कंपनीने ३२ लाख रुपये किमतीचे ४० हजार इक्विटी शेअर्स आरक्षित केले आहेत.
कंपनी पॉलिमरयुक्त पॅकेजिंग साहित्याची ( पिशव्या , पोती, आदी) उत्पादक आणि पुरवठादार असून, तिची एकूण उत्पादन क्षमता २६०० मेट्रिक टन पॉलिमर फॅब्रिक्सची आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये कृषी कीटकनाशके, सिमेंट, रसायन , खते आणि अन्न उत्पादने उद्योगांना पॅकेजिंग साहित्याचा समावेश आहे. कंपनीचे महाराष्ट्रातील ठाणे येथे दोन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीने आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये विविधता आणण्याची योजना आखली आहे.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कहान पॅकेजिंगने १९.७७ टक्के आरओसीई आणि ८५.२८ टक्के आरओईसह एकूण १,७५१ लाख रुपयांचा महसूल नोंदवला होता.