सैनिकांसाठी एक क्षण ‘संतोषा’चा...

    09-Aug-2023   
Total Views |
Article On Artist Santosh Dashrath Parab

भारतीय स्वातंत्र्य दिन आणि ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात जाऊन जवानांचे मनोरंजन करणारे, सांस्कृतिक चळवळ राबविणार्‍या संतोष परब यांच्याविषयी...

संतोष दशरथ परब यांचा जन्म मुंबईचा. परब यांची आई गिरणी कामगार म्हणून काम करायची. तसेच, त्यांचे वडील ‘बॉम्बे गॅस कंपनी’त मशीन ड्रायव्हर होते. परब यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अहिल्या शिक्षण केंद्र, काळाचौकी येथे झाले. त्याचदरम्यान, गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि परब यांच्या आईची व वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे परब यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर परब यांनी उदरनिर्वाहासाठी छत्र्यांवर नावे टाकणे, खारी-बटर विकणे, राख्या विकणे, मखर बनविणे, अशी कामे करायला सुरुवात केली. दरम्यान, पारशीवाडी मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या कलाविभागात ते सामील झाले. तिथे एकांकिका, प्रायोगिक नाटकात काम करायला सुरुवात केली. कामगार विभागातील भजन, कीर्तन, प्रवचन, शाहिरी, लावणी या कला प्रकारांमुळे संतोष परब कला क्षेत्राकडे वळले, असे म्हणायला हरकत नाही. मुळात परब यांना लहानपणापासून खो-खो खेळाची प्रचंड आवड. त्याचबरोबर वक्तृत्व, निबंध, अभिनय, नृत्य अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांच्या शाळेच्या माध्यमातून सहभाग घेऊन यश प्राप्त केले.
 
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाची कवाडे जरी परब यांच्यासाठी बंद झाली असली, तरी अनौपचारिक शिक्षण घेणे, त्यांनी कधीच सोडले नाही. त्यामुळेच संतोष यांनी गिरिराज यांच्या ‘विद्या थिएटर’मध्ये आणि शाहीर अमर शेख यांच्या कलापथकातून नृत्य करायला सुरुवात केली. विजय कदम यांच्या ‘खुमखुमी’ या कार्यक्रमात निवेदक, नर्तक, व्यवस्थापक अशा भूमिकाही संतोष यांनी बजावल्या. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव आणि प्रकाश परब यांनी शाहीर साबळेंच्या ’महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात परब यांना नृत्य करण्यासाठी नेले. त्या कार्यक्रमाचे ४५० प्रयोग करण्याचे भाग्य ही परब यांना लाभले. त्यावेळी एकलव्याप्रमाणे शाहीर साबळेंच्या सान्निध्यात राहून संतोष अनेक गोष्टी शिकले आणि त्यामुळेच सुगतदास उथळे, बाळ पंडित, अजय पंडित, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, विजय कदम, शाहीर शेख जैनू चांद यांसारख्या असंख्य लोककलांवतांनी परब यांना कलेचं बाळकडू पाजलं.

यानंतर शाहीर साबळेंच्या कामातून प्रेरणा घेत संतोष परब यांनी ’महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेची भव्य वास्तू मुंबईत डौलाने उभी आहे. ‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेची सुरुवात मूळची १९८९ची, पण संस्थेची अधिकृत सुरुवात २००० साली झाली. त्यानंतर या संस्थेतर्फे परब यांनी ‘लोकरंग महोत्सव’ सुरू केला. ‘लोकरंग महोत्सव’ म्हणजे मराठी लोककलांचा उत्सव. त्यावेळी खिशात अवघे ६५ रुपये असणार्‍या परब यांनी साडे चार लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन हा पहिल्या वर्षाचा महोत्सव यशस्वी केला. मात्र, या ‘लोकरंग महोत्सवा’च्या सातत्यामुळे आणि मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे परब यांनी संस्थेवरील सर्व कर्ज काही वर्षांतच फेडलं आणि उत्तम व्यवस्थापक म्हणून नाव कमावलं.

विशेष म्हणजे, या संस्थेचा एकही विश्वस्त गेल्या २३ वर्षांत बदललेला नाही. कारण, परब यांची आपल्या वरिष्ठांप्रती असणारी आपुलकी. त्यानंतर परब यांनी ‘नमन नटवरा’ ही निर्मिती संस्था आणि ‘मुक्ता इव्हेंट अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि’ ही कंपनी ही सुरू केली. त्या संस्थेच्या निर्मितीत परब यांची पत्नी सायली परब आणि मुलगी कोमल दळवी तसेत मुलगा समर्थ परब यांचा सिंहाचा वाट असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

आपल्या व्यस्त व्यवसायातून वेळ काढून संतोष परब हे दरवर्षी भारतीय सैनिकांच्या मनोरंजानासाठी व्यावसायिक कलावंतांना घेऊन भारताच्या सीमावर्ती भागांना भेट देतात आणि तिथे सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य सादर करतात. दरम्यान, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे एकाच समूहासह सलग सहा, सलग सात आणि सलग आठ प्रयोग सादर करण्याचे तीन विश्वविक्रम संतोष परब यांच्या नावावर आहेत. फक्त आर्थिक अडचणीमुळे या प्रयोगांची नोंद अधिकृतपणे ‘रेकॉर्डबूक’मध्ये होऊ शकली नाही. पण, माध्यम संस्थांनी परब यांच्या कामाची दखल घेतली. त्यामुळे ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या श्लोकाप्रमाणे कोणताही गाजावाजा न करता, संतोष परब अविरत काम करत आहेत. त्या कामात त्यांना अनेक समाजधुरिणांनीही मदतीचा हात दिला.

मराठी वाद्यवृंद कलावंत, तंत्रज्ञ एकजुटीने एकत्र येत नाहीत. त्यामुळे आवश्यक सुविधांपासून वाद्यवृंद रंगकर्मी वंचित राहतात. त्यामुळे एक मजबूत संघटनात्मक बांधणी व्हावी, अशी इच्छा परब यांनी व्यक्त केली. तसेच, येत्या दोन वर्षांत संस्थेला २५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे महाबळेश्वरसारख्या रम्य ठिकाणी एका एकरमध्ये ‘महाराष्ट्र कला आणि संस्कृती संग्रहालय’ संस्थेच्या माध्यामातून उभारण्यात येणार आहेत. त्या संग्रहालयातून जुनी नाटके, चित्रपट , लोककला, अध्ययन यांचे जतन करण्याचा परब यांचा मानस आहे. तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!

सुप्रिम मस्कर 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.