कोण आहे निलेश चव्हाण? वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संबंध काय?

    30-May-2025   
Total Views |
 
Nilesh Chavan
 
मुंबई : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर चर्चेत आलेल्या निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार असून पोलिस त्याच्या मागावर होते. परंतू, हा निलेश चव्हाण नेमका कोण आहे? आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संबंध काय?
 
वैष्णवी हगवणे हिला ९ महिन्यांचे बाळ आहे. मात्र, तिच्या मृत्यूनंतर हे बाळ नेमके कुठे आहे याबद्दल कुणाला काहीही माहिती नव्हते. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिची नणंद करीश्मा हगवणे हिने तिचे बाळ निलेश चव्हाणकडे सोपवले होते. त्यानंतर २० मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागात असलेल्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. परंतू, त्यावेळी निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हुसकावून लावले.
 
कस्पटे कुटुंबियांनी त्याच्याकडे बाळाची मागणी केल्यावर त्याने नकार दिला. त्यानंतर कुटुंबियांनी निलेश चव्हाणविरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याची तक्रार दाखल केली. पुढे एका अज्ञात व्यक्तीने वैष्णवीच्या कुटुंबियांना फोन करून बाणेरच्या हायवेवर बाळ त्यांच्या ताब्यात दिले. पण त्यानंतर निलेश चव्हाण हे नाव चांगलेच चर्चेत आले. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि नणंद करीश्मा या दोघांचा मित्र आहे. निलेशचा बांधकाम व्यवसाय आहे. त्याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाण हा अत्यंत विकृत मानसिकता असणारा व्यक्ती असल्याचे पुढे आले आहे. त्याने स्वत:च्याच पत्नीचे बेडरुममधील आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवलेत. ३ जून २०१८ रोजी निलेश चव्हाणचे लग्न झाले. २०१९ मध्ये त्याच्या पत्नीला बेडरुमच्या सिलींग फॅनला काहीतरी अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिला एक दिवस पुन्हा एकदा बेडरुममधील एसीला छुपा कॅमेरा दिसला. त्याविषयी निलेशला विचारले असता त्याने पुन्हा तिला उडवाउडवीचे उत्तर दिले. पुढे एक दिवस निलेशच्या पत्नीने त्याचे लॅपटॉप चेक केले तर तिला स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केलेले तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ दिसले. एवढेच नाही तर त्याच्या लॅपटॉमध्ये इतर मुलींचेही आक्षेपार्ह व्हिडीओ दिसले. याबद्दल तिने त्याला जाब विचारल्यानंतर निलेशने तिला धमकी दिली. २०१९ मध्ये निलेश चव्हाणवर या प्रकरणी पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. निलेश आणि त्याचे कुटुंबीय सतत त्याच्या पत्नीचा छळ करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
 
निलेश चव्हाणचे हगवणे कुटुंबाशी जवळचे सबंध होते. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात तो अनेकदा सहभागी असायचा. शिवाय निलेश चव्हाण हा करीश्मा हगवणेचा मित्र असून तो कायम आमच्या घरातील भांडणांमध्ये सहभागी असल्याची माहिती वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप हिने दिलीये. एवढेच नाही तर निलेश चव्हाणकडे पिस्तूलाचे लायसन्स असल्याचीही माहिती आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय ज्यात तो कमरेला पिस्तुल खोचून गाण्यावर नाचताना दिसत आहे. अखेर आता निलेश चव्हाणला अटक करण्यात आली असून वैष्णवीच्या मृत्यूशी त्याचा काही संबंध आहे का? हे पोलिस तपासानंतर उघड होणार आहे.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....