मनकवडा

    26-Aug-2023   
Total Views |
Article On Metaphorical Use Of Moon In Literature

‘चांद्रयान-३’चे यशस्वी लॅण्डिंग झाले आणि संपूर्ण भारतात आनंदकल्लोळ उसळला. कार्यालयांतून, रस्त्यांवरून, सोसायट्यांपासून गावागावांतून, शाळा-महाविद्यालयांतून जल्लोष साजरा होत होता. आपल्या दैनंदिन आयुष्यावर सूर्याप्रमाणेच किंवा काकणभर अधिक प्रभाव असलेला हा आपल्या पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. अशा या चंद्राला आपल्या हिंदू संस्कृतीतही तितकच महत्त्वाचं स्थान आहे. पण, आपल्या भावनिक विचारविश्वालाही तो व्यापून आहे. तेव्हा कालानुरूप वारंवार साहित्यात पडत असलेलं चंद्राचं प्रतिबिंब नक्की काय सांगतं, याचा घेतलेला हा वेध...
 
बाळ रडत असतं, त्याच्या इवल्या शरीराला न झेपणारा टाहो आईला सहन होत नाही. माजघरात कामं उरकताना घामेजल्या पदराने बाळाला घेऊन ती अंगणात येते. चांदोबाची अंगाई गाते. बाळाच्या लुकलुक डोळ्यात चंद्र सामावत नाही. अनिमिष नजरेने ते त्या पूर्ण चंद्र बिंबाकडे पाहत असतं. आईचा मायेचा स्पर्श, आधार, पदराचा गंध कायमस्वरुपी त्या आकाशातल्या चांदोमामाशी जोडला जातो. मामा असतो ना तो, आपला असतो!

इथून त्याच्याशी भावनिक पातळीवर जे घट्ट नातं जुळतं ते कायमचं! रात्रीचे प्रवास करताना आकाशात आपल्यासोबत जो धावत असतो, तो चांदोबा लिहिता- वाचता येऊ लागल्यावर बाल मासिकातून, कॉमिक्स पुस्तकांतून भेटतो. ’चांदोबा’ मासिक वाचलं नसलेले विरळच. महाविद्यालयात तर चंद्र आपल्या सर्वात जवळ असतो. कित्येक कवींनी चंद्राला प्रेयसीची उपमा दिली आहे. महाविद्यालयीन जीवनानंतर जेव्हा संसाराची जबाबदारी येऊ पाहते, तेव्हा भाकरीचा चंद्र आपल्यासमोर दिसू लागतो. इथे अमावस्या येऊन चालणार नसते.
 
हे असे भावनिक बंध दृढ झाल्यानंतर आपण पाहतो, तर आपल्या सामाजिक जीवनालाही तो व्यापून आहे. आपले सणउत्सव, त्यातल्या प्रथा-परंपरा अगदीच काय, दिवस आणि काळ मोजण्याची कालगणनेची पद्धतही चंद्रावर अवलंबून आहे. ख्रिस्तपूर्व काळात कालगणनेसाठी अनेक भूखंडात चंद्राच्या आधारे कालगणना केली गेल्याचे आढळते. व्यापार करताना हे अमूल्य ज्ञानही अरबांनी भारताबाहेर प्रसारित केले. जेव्हा कालगणना आपल्याला ठाऊक नव्हती आणि सूर्याचा अभ्यास जगात कुठेच झाला नव्हता, तेव्हा चंद्राच्या स्थितीवरून कालगणना करायला आपण शिकलो. हिंदू दिनदर्शिका ही चंद्र कालगणनेवर आधारलेली आहे. आजही आपण इंग्रजी कॅलेंडर वापरत असलो, तरी सण आपण चंद्राच्या कक्षेवरूनच ठरवतो. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, नेपाळमध्ये दैनंदिन व्यवहारातही चंद्र कालगणनेवर आधारित पंचांगच वापरले जाते! खगोलशास्त्राचा विचार करताना ज्योतिषशास्त्र जे हिंदू संस्कृतीने जगाला दिले, त्याला विसरून चालणार नाही. ही सर्व शास्त्र तयार करताना चंद्राचा जवळून अभ्यास केला गेला.

तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावास्येला आपल्याकडे सण असतो. चैत्र सुरू झाला की गुढीपाडवा, वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठातली ती वटपौर्णिमा, आषाढात येते ती गुरू पौर्णिमा, आषाढात अमावास्येला दिव्यांची पूजा करतात. दीप अमावस्या असते ती. श्रावणातली ती नारळी पौर्णिमा आणि अमावास्येला पिठोरीची पूजा मांडतात आणि अजूनही बरेच काही...एकूणच काय तर चंद्राचं पूर्ण रूप साजरं करतो आपण!

’चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे’ विंदांची ही ओळ बघा. अंधारातही मार्गदर्शन करणार्‍या या चंद्राची गैरहजेरी त्यांनी कशी मांडली आहे. ‘तोच चंद्रमा नभात’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘चांद मातला’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘चांदणे शिंपीत जाशी,’ अशा अनेक कविता आधुनिक जगातील मधुराभक्ती करणार्‍या कवींनी लिहिल्या. ‘सण आयलाय गो नारळी पुनवेचा’ या कोळीगीतातून चंद्राला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या उत्सवाचे हे गाणे. ग्रेसांनी ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ लिहिलंय. आत्मनिवेदनात ते म्हणतात की, ’‘एका मुसळधार पावसाच्या रात्री परमुलखात, चर्चमध्ये एक हिंस्त्रकरूण टेप ऐकली, तेव्हापासून मनाची एक पाकळी सतत गळते आहे. दुःखाची भरजरी तिरीप डोळ्यावर चालून आली की, वेदनेचे सुलभीकरण करण्यासाठी मी एखादा उखाणा घालतो. तिचा अपभ्रंश करत नाही. तपशिलाला महासिद्धांताचे रूप देण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ नाही. मोडलेल्या प्रार्थनांची वीण उसवणारा एखादा फकीर मला सापडेल.‘’ अशा कोणत्या गूढ अस्तित्वाची ते वाट पाहतायत? हे असे कोणते मनाचे गूढ कप्पे त्यांनी जाहीर केलेत? हेच ते चंद्रमाधवीचे प्रदेश? शांताबाईंचा तोच ‘चंद्रमा’ काव्यसंग्रह किती-किती उदाहरणे देता येतील. नक्षत्र तार्‍यांच्या सहवासात एकट्या चंद्राला पाहून आपण त्या कृष्णाची उपमा देतो. त्याच्या आवर्तनांनी समुद्र उचंबळून येतो. म्हणून त्याची आराधना करतो.

‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ हे अंगाई गीत गद्यलेखक, नाटककार, पटकथाकार म्हणून नावाजलेल्या मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं. चंद्र म्हटलं की, साध्या शब्दांचीही कविता होते. अंगाई चित्रपटासाठी लिहिलेली ही कविता सुमन कल्याणपूर यांच्या मधुर स्वरात गायली गेली. ताई सईने त्यांच्या लहानपणी ही गाणी ऐकली. मी लहान असताना मला गाऊन दाखवली आणि आता त्यांची पिल्लू आजोळी येतात, तेव्हा मी हीच गाणी त्यांना गाऊन जोजवते. हे असे झोपेशी जोडले गेलेले प्रवाह आहेत. आपल्या भावविश्वात ते इतके झिरपून जातात की, आपल्या नकळत पुढच्या पिढीला आपण याच अंगाई गाऊन दाखवतो. बाळ झोपलं की, या चंद्राचं काम संपतं का? तर नाही. आपली इतर कामं आवर्तन बाळ समोरच राहावं, म्हणून आई त्याला अंगणातच झोपाळ्यावर झोपावते. त्याच्याकडे सतत लक्ष असतं तिचं. बाळ झोपेत हसतं, तेव्हा स्वतःशीच हसतं ती म्हणते,
’चांद मोहरे, चांदणे झरे, झोपेतच गाली असा, हसशी का बरे? गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी। उचलुनीया नेती तुला, उंच काय रे ?’

त्याला चंद्राचीच दृष्ट लागू नये. म्हणून आत घेऊन जाते आणि म्हणते, ’सावळा गं रामचन्द्र रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून चन्द्र आभाळी लोपतो.’ मुलं मोठी होतात, अडखळत गाऊ लागतात, तेव्हा

चांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो।
छोट्याशा फुलाशी लपाछपी खेळतो॥
किंवा ‘चंदाराणी चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी’ ही त्यांची आवडती गाणी असतात.

गुलझार हे नाव तसं आपल्या परिचयाचं, तशीच त्यांची ही पंक्तीसुद्धा. ‘मेरा कुछ सामान एक सौ सोलह चाँद की रातें एक तेरे काँधे का तिल.’ वि. स. खांडेकर त्यांच्या ‘ययाती’ कादंबरीत शर्मिष्ठा आणि राजा ययातिच्या शृंगाराचे वर्णन करताना लिहितात की, ’प्रिये, या खिडकीतून हा चंद्र पाहा आपल्या एकांताकडे कसा चोरून पाहतोय. तुझा हा विपुल केशसंभार पडदा म्हणून बाजूने ओढून घे! चंद्र दुष्ट आहे, चंद्र मार्गदर्शक आहे, चंद्राचा आधार आहे. तो वेडा आहे आणि मनामनांना समजून घेणारा, सगळी गुपितं जाणून असलेला मनकवडासुद्धा आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.