भ्रष्टाचारविरोधी संस्कारासाठी...

    16-May-2023   
Total Views |
shukla

मीरा-भाईंदरमध्ये चंद्रप्रकाश शुक्ला आज जनमान्य व्यक्तिमत्त्व आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रामाणिक समाजासाठी सातत्याने योगदान देणार्‍या चंद्रप्रकाश शुक्ला यांचे विचार कार्य या लेखात मांडले आहेत.

सत्तरचे दशक असावे. त्या संपन्न व्यक्तीचा शेतीतील पाण्याचा मोटरपंप बिघडला. त्यावेळी गावात एक इलेक्ट्रिशियन होता. तो इलेक्ट्रिशियन त्यावेळी दिवसभर काम करून थकून झोपला. पण, गावातल्या मोठ्या घरचे बोलावणे आले म्हणून तो नाईलाजाने गेला. त्याने मोटरपंप दुरूस्ती करायला घेतले आणि कुणीतरी विजेचे कनेक्शन सुरू केले. त्या गरीब इलेक्ट्रिशियने तडफडून सगळ्या गावासमोर प्राण सोडले. गावातले सगळे लहानथोर गोळा झाले. पोलिसांना कळले ‘इन्सपेक्टर’ आला. मृत व्यक्तीच्या पत्नीने आणि मुलांनी आकांत मांडला. ‘माझे सौभाग्य गेले, आता मुलांचे काय होणार, काही तरी करा, मदत मिळवून द्या,’ असे ती म्हणायला लागली. तो ‘इन्सपेक्टर’ त्या महिलेलाच ओरडू लागला. शेवटी त्या गरीब इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला. याबद्दल कुठेही तक्रार नोंद झाली नाही. त्याचा परिवार उघड्यावर आला. गावात चर्चा सुरू झाली. लाच दिली आणि घेतली गेली म्हणून एक कुटुंब उद्ध्वस्त झालं,अन्याय झाला. त्यावेळी इयत्ता आठवीत असलेल्या चंद्रप्रकाश यांच्या मनावर ती घटना कोरली गेली. लाच-भ्रष्टाचार या विरोधात त्यांच्या मनात तीव्र संताप चीड उत्पन्न झाली. हा संताप हा विरोधच पुढे त्यांच्या आयुष्यात एक निर्भिड कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून आधारभूत ठरला.

चंद्रप्रकाश हे मीरा-भाईंदर येथील उद्योजक. परिसरात कुठेही कुणाला सहकार्य मार्गदर्शन हवे असेल, तर लोक हक्काने त्यांच्याकडे येतात. वयाची सत्तरी पार केलेले चंद्रप्रकाश सकारात्मक कार्य आणि विचारांसाठी सदैव सहकार्य करायला तत्पर असतात. पण, त्यातही एकल पालक असलेल्या बालकांच्या हितांसाठी, विधवा माताभगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी ते निडरतेने अग्रेसर असतात. मातृशक्तीचा सन्मान राखणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांचे ठाम मत. कारण, त्यांच्यावर झालेले संस्कार.

जौनपूर, उत्तर प्रदेशातल्या त्या गावातले सर्वच बाबतीत सुस्थापित प्रतिष्ठित शुक्ला यांचे घराणे. मात्र, चंद्रप्रकाश तीन वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांची आजी आणि आई या दोन माऊल्यांनी विस्तृत शेतीउद्योग आणि कुटुंबाला अत्यंत ताकदीने आणि समर्थपणे सांभाळलं. चंद्रप्रकाश यांची आजी तर दहा गावच्या पंचायतींचे नेतृत्व करायची. दहा गावांत काहीही घडले, तर दहा गावचे पंच आजीकडे न्यायनिवाडा करायला यायचे. आजीची न्यायप्रियता आणि आईची कर्तव्यपरायणता, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी तिचे झटणे हे सगळे चंद्रप्रकाश लहानपणापासून पाहत होते. घरी धार्मिक वातावरण होते. इतके की, वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच चंद्रप्रकाश यांना हनुमान चालीसा कंठस्थ झाले.

असो, तर त्यांना लहानपणापासून मोठे सरकारी अधिकारी बनायचे होते. का? तर त्या अधिकारात ते गरजूंना खरी मदत मिळवून देता येईल म्हणून अशातच महाविद्यालयाच्या प्रथम वर्षालाच त्यांचा संपर्क रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांशी झाला. चंद्रप्रकाश रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. भारतीय संस्कृती, धर्म आणि देशभक्ती आणि निखळ माणुसकी यावर आधारित तिथले विचार प्रभाव त्यांच्यावर पडला. प्रामाणिक सरकारी अधिकारी बनायचा निर्धार आणखी पक्का झाला. पुढे त्यांना मुंबईत पोस्टामध्ये नोकरी लागली. मुंबईत नातेवाईकांच्या घरी राहून त्यांनी नोकरी करता करता पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि ‘बी.एड’चे शिक्षणही घेतले. याचमुळे त्यांना ‘ओएनजीसी’मध्ये नोकरी लागली. इथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

‘ओएनजीसी’च्या एका प्रकल्पामध्ये ‘मॅनेजर एचआर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांच्या सर्वोच्च अधिकार्‍यांनी चंद्रप्रकाश यांना सांगितले की, खासगीकंत्राटदार मनमानी करतात, त्यामुळे ‘ओएनजीसी’चे नुकसान तर होतेच. पण, या प्रकल्पाच्या परिसरातले सामाजिक आणि कायदेशीर वातावरण असुरक्षित होते आहे. १९९० सालाच्या अखेरीस त्या प्रकल्पामध्ये तीन हजार कंत्राटी कामगार होते. कंत्राटदाराला प्रत्येक कामगारामागे प्रतिदिनी विशेष भत्ता आणि १८० रुपये मिळत असत. पण, कंत्राटदार त्या कामगारांना केवळ ६५ रुपये पगार देत असे, अगदी १५ वर्षे हे सुखेनैव सुरू होते. चंद्रप्रकाश यांना हे लक्षात आले. त्यांनी कंत्राटदाराची तक्रार साक्षी-पुराव्यांसकट वरिष्ठांकडे केली. कंत्राटदार आणि बाकीच्यांचे हिंतसंबंध गुंतले असल्याने चंद्रप्रकाश यांना खूप संघर्ष करावा लागला.

शेवटी निर्णय झाला की, या तीन हजार कामगारांचे बँकेत खाते उघडण्यात येईल आणि कंत्राटदार त्यामध्ये प्रत्येकाचा पगार वर्ग करेल. याचवेळी काही कंत्राटदारांना त्यांनी काळ्या यादीत टाकले. सगळे कंत्राटदार चंद्रप्रकाश यांना लाच देण्यासाठी सरसावले. पण, चंद्रप्रकाश यांनी निर्णय बदलला नाही. त्यावेळी ‘ओएनजीसी’च्या जागेवर काही समाजकंटक अतिक्रमण करत. तिथे त्यांनी नशेचा अड्डाच बनवला होता. चंद्रप्रकाश यांनी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी जंग जंग पछाडले. सगळे बेकायदेशीर धंदे कायदेशीररित्या बंद केले. चवताळलेल्या समाजकंटकांनी चंद्रप्रकाश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे ‘ओएनजीसी’कडून चंद्रप्रकाश यांना सशस्त्र अंगरक्षक दिले गेले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनाने मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती केली. या सगळ्या काळात गावी आणि मुंबईतही चंद्रप्रकाश जातपात, भाषा, प्रांत न पाहता गरजूंना मार्गदर्शन आणि सहकार्य करत राहिले. भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट करण्यासाठी तरुणाईने पुढे यायला हवे, यासाठी ते काम करतात. ते म्हणतात, “देशाच्या प्रगतीसाठी भ्रष्टाचारविरोधी संस्कार समाजात रूजवणे गरजेचे आहे.” म्हणूनच चंद्रप्रकाश यांचे कार्य आणि विचार खरेच समाजासाठी महत्त्वाचे आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.