त्याचे काय आहे की, अस्तित्व टिकवायचे तर दिल्ली, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, निजामशाही, मराठी, महाराष्ट्र अशा विषयांवर आज बोललेच पाहिजे. त्यामुळेच मी बोललो की ३५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर दिल्लीहून संकट आले होते. औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, निजामशाही हे ते संकट होते. तेव्हा मराठी आणि महाराष्ट्राचे म्हणून आपण त्यांच्याशी लढलो. काय म्हणता, आमच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही दिल्लीतच असतात? शुीी...आमच्या लोकांबाबत एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. काय म्हणता, ते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मुंबई आणि महाराष्ट्र म्हणजे आम्ही नाही? काय म्हणता आता तरी आम्ही होश वर यावे? ‘शोले’ चित्रपटातील असरानीसारखे‘आधे इधर जाओ आधे उधर जाओ’ म्हणता म्हणता आमच्यासोबत कुणीच उरले नाही. असू देत. तरीसुद्धा आम्ही म्हणजे महाराष्ट्र आम्ही म्हणजे मराठी! काय म्हणता, शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे आणि ते ४० आमदार पण मराठी असून महाराष्ट्राचे आहेत. काय म्हणता, आम्ही सत्तेत येऊन महाराष्ट्राचा विकास न करता आणि उर्दू भवन बांधण्याचा घाट घातला, हज हाऊस प्रत्येक जिल्ह्यात बांधण्याचा संकल्प केला, मुघल गार्डन, टिपू सुलतान क्रीडा संकुल बांधण्याचा घाट आम्हीच घातला? त्यावेळी मुंबईत मनसुख हिरेन, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन यांच्याबाबत आणि इतरही खूप काही भयंकर घडले? आमचे अनेक मंत्री तुरुंगात होते? आमच्याच कारकिर्दीमध्ये मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला? असू दे. तरीही आमचे साहेब भारतावर राज्य करतील आणि त्यांचा माणूस म्हणून मी इथे महाराष्ट्रात राज्य करेन. काय म्हणता, दिल्लीतून कोण राज्य करणार वांद्य्राचे साहेब की बारामतीचे साहेब? हे काय विचारणे झाले? आमचे वांद्य्राच्या साहेबांचे मार्गदर्शन तर पुतीन, बायडन झालेच, तर ‘हू’ संस्थाही घेते, असे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व फक्त भारतासाठी बांधून का ठेवायचे? काय म्हणता, मग बारामतीचे साहेब देशावर राज्य करतील? छे, त्यांनी राष्ट्रपती बनावे, असे मागे लोक म्हणत होते. तुमच्या लोकांचे ना ‘काखेत कळसा गावाला वळसा’ आहे. अरे माझ्याकडे पाहा ना रे. माझ्यात काय कमी आहे? एकदा तरी म्हणा की, मी अखिल भारतीय नेता आहे! अरे हसता काय???
राजा की बेटी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरले - महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळेच! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर असे होर्डिंग्ज लागले आणि त्यासोबतच खाली एक विशेष वाक्य लिहिले आहे ते म्हणजे - नाद नाय करायचा! पण, कोणी आणि कुणाचा नाद नाय करायचा, हे काही त्या बॅनरवर तपशीलवार किंवा सांकेतिक भाषेत लिहिलेले नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणातले जाणकार ‘बिटविन द लाईन्स’ वाचण्यात हुशार आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे आणि ‘नाद नाय करायचा’ या दोन वाक्यांमधले ‘बिटविन द लाईन्स’ वाचलेच हो! तर या अभ्यासकांचे म्हणणे आहे की, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांचेही असेच होर्डिंग्ज बॅनर लागले होते. त्यात त्यांना ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ घोषित करण्यात आले होते. आता ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून या दोघांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना बॅनरबाजी करायला लावली होती की, कार्यकर्त्यांनी स्वतःच्या इच्छेने ती बॅनरबाजी केली होती, हा एक गहन आणि उत्तर माहिती असलेलाही प्रश्न. कारण, कार्यकर्ता त्यांच्या साहेबांच्या पुढे कधीही जात नाही, हे उघड सत्य आहे. पण, हे सगळे म्हणजे एका म्हणीसारखे आहे की, ‘बाजारात तुरी आणि नवरा बायकोला मारी.’ कारण, पक्षातील नेत्यांच्यामुळे एनकेनप्रकारे लाभ झालेलेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकार्यांच्या आवडीवर राज्याचा मुख्यमंत्री काय, आमदारही कोणी होऊ शकत नाही. त्यासाठी काही प्रक्रिया आहेत. मुख्य म्हणजे, जनाधार हवा. पण, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या भावी मुख्यमंत्री बॅनरबाजीचा खेळ सुरू आहे. आता काही लोकांचे म्हणणे आहे की, सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनणार. नेत्याची कन्या, त्यात एकरात कोटींची उलाढाल करणारी, वांगी पिकवण्याचेही कसब. त्यातच दिल्ली संसदेमध्ये इतर महिला खासदारांशी उत्तम आणि सुंदर साड्यांबाबत चर्चा करण्याची सवय! अहो, इतकेच काय आहे की नाही सोनिया गांधींचे पुत्र राहुल गांधी यांच्या तोडीस तोड व्यक्तिमत्त्व? राहुल जर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, तर मग सुळेबाई का नकोत? अर्थात, सुप्रिया सुळे यांचे भवितव्य जनताच ठरवेल. आता मात्र महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या जनतेने ठरवले की, ‘राजा का बेटा ही राजा नही बनेगा! राजा की बेटी ही राजकुमारी नही बनेगी!!’
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.