शिल्पकला नव्हे जीवनकला!

    20-Feb-2023   
Total Views |
Anand Deodhar


निष्ठापूर्वक कलाव्रत जीवनात सातत्याने कार्य करत असणारे पेणचे आनंद देवधर. शिल्पकलेतील त्यांचे आणि त्यांच्या पूर्वजांचे योगदान शब्दातीत. आनंद यांच्या कलाजीवनाचा घेतलेला मागोवा...

पेणमध्ये शिल्पकलेचा वारसा जोपासणारे शिल्पतपस्वी कुटुंब म्हणजे देवधर कुटुंब असे म्हणता येईल. मूळ कोकणातल्या विजयदुर्ग येथील देवधर कुटुंब कामानिमित्त पेणला स्थिरावले. जवळ जवळ चार पिढ्या पेणमध्ये शिल्पकला त्यांनी जोपासली. १९५२ साली उभे राहिलेले प्रभात कलामंदिर आजही पेणमध्ये सर्वच पारंपरिक कलात्मक मूल्ये जपण्याचे काम दिमाखात कार्यरत आहेत. तसेच देवधर कुटुंबीयांच्या शिल्पकलेचे संवर्धन करत देवधर कलादालनही पेणमधले एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हटली पाहिजे. या महत्त्वपूर्ण वारशाचे संवर्धन अतिशय सर्जनशीलतेने करणारे आनंद देवधर. कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला, हा वाद आनंद यांना कधीच पडला नाही. कारण, त्यांच्यासाठी जीवन आणि कला या दोन गोष्टी भिन्न नाहीतच. शिल्पकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीच्या ५० वर्षांत त्यांनी शेकडो महत्त्वाची शिल्पे साकारली.

प्रत्येक शिल्पकृती मागच्या आठवणी हळूवार आणि अतिशय कलात्मकरितीने उलगडणारे त्यांचे आठवणीतील शिल्पकृती हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स स्क्लप्चर अ‍ॅण्ड मॉडेलिंग’ या विषयाचे अध्ययन केले.त्यांचे पिता नारायण ज्यांना सगळे जण राजाभाऊ म्हणत ते स्वत: उत्तम शिल्पकार. शिल्पकलेचे ते पेणमधले तपस्वीच. त्यांच्या तालमीतच आनंद लहानपणापासून वाढलेले.असो. आनंद यांच्या आयुष्याचा एक नियम आहे तो म्हणजे, पूर-पाऊस की आणखी काही होवो, ज्या दिवशी शिल्प पूर्ण करायचे, त्या दिवशी ते व्हायलाच हवे. ठरलेल्या वेळेतच ते शिल्प संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचायला हवे, असे आनंद यांचे कलाव्रत. गेले ५० वर्षे त्यात खंड पडला नाही. ही शिस्त, हा वक्तशीरपणा त्यांच्यात कुठून आला? तर आनंद यांचे पिता नारायण हे रा.स्व.संघाचे स्वयंसेवक आणि आनंद हेसुद्धा बालस्वयंसेवक. संघ प्रचारक ब. ना. भिडे, जनसंघाचे अध्यक्ष बच्छराजजी व्यास, तसेच नानाजी देशमुख हे देवधरांच्या घरी येत असत. समाजाविषयी, देशधर्म आणि संस्कृतीविषयी त्यांची तळमळ, लोककल्याणकारी वृत्ती आणि त्यातही त्यांचा शिस्तप्रियपणा आणि वेळ आणि शब्द पाळणे, हे सगळे आनंद यांनी पाहिलेले. हे सगळे सद्गुण आनंद यांच्यात त्यांच्यामुळेच निर्माण झाले असावेत. या संदर्भात एक घटना पुरेशी बोलकी आहे.

६०चे दशक असावे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कन्नमवार हे त्यावेळी पाटबंधारेमंत्री होते. त्यांचा पेणला दौरा होता. या दौर्‍यामध्ये देवधरांच्या प्रभात कलामंदिरला त्यांना भेट द्यायची होती. पेण त्यावेळी आजच्या इतके दळणवळण आणि इतर सुविधांनी विकसित नव्हते. गावात मंत्री येणार म्हणून सगळेच उत्साहात होते. मात्र, नारायण यांनी मंत्र्यांच्या आगमनाची सूचना देणार्‍या व्यक्तीस सांगितले की, मंत्रिमहोदय येणार त्यादिवशी दुपारी रा. स्व. संघाची अलिबागला नियोजित बैठक आहे. ११ वाजेपर्यंतच मी कलादानलनात आहे. त्याआधी जर मंत्रिमहोदय येत असतील तर नक्कीच त्यांची भेट होईल. मंत्रिमहोदयांनी ११ वाजण्यापूर्वी कलादालनाला भेट देणार, असा निरोप पाठवला. मात्र, मंत्री कन्नमवार दिलेल्या वेळेपेक्षा उशिराने कलादालनात आले. पण नारायण ठरलेल्या वेळेनुसार ११ वाजता रा. स्व. संघाच्या बैठकीस निघून गेले होते. मग मंत्री कन्नमवार यांना कलादालनाची माहिती देणे, कलादालनातील शिल्प दाखवणे हे सगळे काम शाळेत जाणार्‍या आनंद यांनी केले होते. दिलेली वेळ आणि शब्द कोणत्याही परिस्थितीत बदलायचे नाहीत, हे आनंद यांच्यावरचे संस्कार यातूनही झाले असावेत.

येणार्‍या प्रत्येक सुखदु:खात समान वृत्ती ठेवावी, हे बाळकडू मिळावे, अशीही एक घटना घडली. गणेशोत्सवासाठी प्रभात कलामंदिराने २५० गणेशमूर्ती बनवल्या. पुढील महिन्यात त्यांची विक्रीही होणार होती, पण एका रात्री कोणीतरी माथेफिरूने कलामंदिरामध्ये घुसून त्या सगळ्याच मूर्ती फोाडल्या. दुसर्‍या दिवशी ते भयंकर दृश्य सगळ्या देवधर कुटुंबीयांनी पाहिले. त्यावेळी नारायण यांनी आनंद आणि त्यांचा भाऊ सदानंद यांना इतकेच सांगितले की, जे झाले ते झाले. वेळ वाया न घालवता पुन्हा नियोजित वेळेआधी मूर्ती बनायला हव्यात. झालेल्या गोष्टीचा संताप, दु:ख वगैरे न करता फिरून पुन्हा देवधर कुटुंबीय आणि त्यांच्या कलामंदिरातील कर्मचारी कामाला लागले. जणू काही झालेच नाही असे. या अशा वृत्तीमुळे आनंद हेसुद्धा आयुष्यातील सगळेच प्रसंग अत्यंत संयमाने जगले. आनंद यांची कलानिष्ठा वादातीत आहे. बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचे शिल्प त्यांनी बनवले. ते त्यांना फडके कुटुंबीयांना भेट द्यायचे होते. शिल्प पूर्ण झाले.

फडके कुटुंबीयांनाही ते आवडले. मात्र, आनंद यांनी पुन्हा त्या शिल्पाकडे पाहिले आणि त्यांना वाटले काही तरी कमी आहे. त्यांनी फडकेंच्या कुटुंबीयांना सांगितले, “मला या शिल्पात काहीतरी कमी वाटते. ती कमी पूर्ण करूनच मी ते शिल्प तुम्हाला देईन.” त्यानंतर दोन वर्षं ते शिल्पाचा विचार करत राहिले आणि अखेर त्यांना वाटले की, या शिल्पात कपाळाचा भाग वास्तववादी नव्हता वाटत. त्यांनी पुन्हा त्या शिल्पावर काम केले आणि दोन वर्षांनी ते शिल्प पूर्ण झाले. असे हे कलासक्त ध्येयवेडे आनंद देवधर. कलेसाठी चिंतन करणारा आणि कलासमृद्धीमध्येच स्वसमृद्धीचा आनंद मानणारे आनंद देवधर.शिल्पकलेच्या उपासनेसोबतच आनंद देवधर आणि कुटुंबीयांनी ८०च्या दशकात पेणमध्ये रायगड जिल्हा सांस्कृतिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कलाविषयक कार्यक्रमांचे आयोजनही केले. हेतू हाच की, मुंबई-पुणेसारख्या शहरामधील कलाविषयक कार्यक्रम पेणवासीयांना पेणमध्येच ऐकायला, पाहायला मिळावेत. आजही आनंद सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिल्पकृतींच्या दुनियेत नवनवीन कृती तयार करत असतात. शिल्पनिर्मितीचे त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. शिल्पकलेतील तपस्वी आनंद देवधर त्यांच्या कलानिर्मितीतून नेहमीच अस्तित्वात असतील यात शंका नाही.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.