सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि निरर्थक वाद

    11-Feb-2023   
Total Views |
Dr. Mohanji Bhagwat


काही दिवसांपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विधानातील शब्दांचा गैरअर्थ काढत निरर्थक वाद उकरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. हे सगळे का होत असेल? सरसंघचालकांच्या विधानाचा समाजात चुकीचा अर्थ फेरणारे हे टोळके कोण आहे? तथागत गौतम बुद्धांनी सांगितले आहे की, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट सत्य समजू नये. त्यानुसार माझ्या समाजजीवनात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि रा. स्व. संघ यांच्या विचारकार्याचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाअंती जे सत्य गवसले, तेच या लेखातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...


समाजात समरसता वृद्धिंगत होण्यासाठी काय करायचे, याचे विचारमंथन सुरू असताना देशभरातले प्रतिनिधी आपआपले वैयक्तिक आणि सांघिक प्रयत्न सांगत होते. बहुतेकांनी मत मांडली की, ”दुर्दैवाने ज्यांना मागासवर्गीय मानले जाते, अशा बांधवांच्या घरी आम्ही चहापानाला जातो, त्यांच्या पंक्तीला जेवायलाही बसतो.” काही मत मांडत होते की, ”आमच्या घरच्या सत्यनारायण किंवा वास्तूपुजेला किंवा धार्मिक कार्यक्रमात आम्ही त्या समाजबांधवाना मानाने बोलावतो.” सगळ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, ” हे सगळे ठीक आहे. पण, तुम्ही जिथे राहता त्या गावात ‘एक गाव, एक मंदिर’, ‘एक पाणवठा, एक स्मशान’ यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जातीयतेची विषमता दूर करण्यासाठी गावातल्या सर्व समाजाचे ‘एक मंदिर, एक पाणवठा आणि एक स्मशान’ असणे आवश्यक आहे. तसे काही प्रयत्न आहेत का? नसतील, तर तसे प्रयत्न करायला हवेत.”


सरसंघचालकांच्या विधानाचा अर्थ किती समर्पक होता, हे गावपातळीवर आजही सामाजिक विषमता अनुभवणार्‍यांना किंवा पाहणार्‍यांना समजेल. त्यांचे जातीय विषमता निर्मूलन करण्याचे विचार ऐकून ’संघ म्हणजे ब्राह्मण वर्चस्वासाठी इतरांना जातीय विषमतेत ठेवणारी व्यवस्था’ असे म्हणणार्‍या सगळ्या खोटारड्या मंडळींचे नाटकी चेहरे आठवले. त्यानंतर या विषयावर याच लोकांशी चर्चा केली की, प्रत्यक्ष सरसंघचालकांनी समरस समाजासाठी जातीय विषमता निर्मूलन आणि प्रत्येकाला समान समरस संधी द्यायचे प्रयत्न करा, असे म्हंटले, तर त्यावर या लोकांनी म्हंटले, ”समोर तुझ्यासारखी ओबीसी समाजाची व्यक्ती आणि इतरही ‘एसएसएसटी’ समाजाचे लोक बसले असणार म्हणूनच ते तसे म्हणाले. ते स्वतः ब्राह्मण आहेत. त्यातून संघवाले. महिला आणि त्यातही ओबीसी, एससी महिलांसंबंधी संधी आणि हक्काचा विषय येईल, तेव्हा ते कसे वागतील ते सांग.”


असे म्हणणार्‍यांच्या दुर्दैवाने तो दिवसही चालून आलाच. बडोद्याला एकास्थळी समरसतेचा विचार आणि कार्य करणार्‍या लोकांचे एकत्रिकरण होते. समारोप सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत करणार होते. तिथे महाराष्ट्रातून आम्ही पाच-सहा महिला आमंत्रित होतो. तिथली व्यवस्था अतिशय सुंदर. मात्र, अर्धा दिवस मावळताना आम्हाला जाणवले की, मुख्य अध्ययन, मार्गदर्शन कक्षात आम्ही जाऊ शकत नव्हतो. तिथल्या नियमानुसार त्या परिसरात महिलांना प्रवेश नव्हता. आमच्यातील एक महिला चुकून त्या दिशेने जात असताना तिला थांबवण्यात आले. कारण म्हणे, त्या स्थळाच्या प्रमुख गुरूजींना महिलांची सावलीही वर्ज्य होती. ते काही प्राचीन धार्मिक स्थळ वगैरे नव्हते तरीही...

पुरोगामी महाराष्ट्रात जातपातविषमता विरहित समाजासाठी काम करणार्‍या समरसता कार्यकर्ता भगिनींसाठी हे नवीनच होते. यावर सगळ्यांनी चर्चा केली की, ”समरसता, समानता या गोष्टींचे अध्ययन होताना हे असे अनुभव येत असतील, तर योग्य नाहीत. आपले म्हणणे आपण मांडायला हवेत.” त्याच संध्याकाळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तेथे निवासाला आले. सायंकाळी त्या मोठ्या अध्ययन कक्षात सगळ्यांचे एकत्रिकरण होते. मात्र, व्यवस्थापकाच्या नियमावलीप्रमाणे त्या मोठ्या अध्ययन कक्षात महिलांना प्रवेश नव्हता. एकत्रिकरण कार्यक्रम सुरू झाला. अध्ययन शिबिराला आलेल्या भगिनी एकत्रिकरण कार्यक्रमात नव्हत्या. असे का? असा सवाल सरसंघचालकांनी केला असावा. कारण, मार्गदर्शन कक्षातील सर्वांसाठीची बैठक थांबवत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आम्हा सर्व भगिनींचा निवास जिथे होता, तिथल्या बैठक कक्षात आले. त्यांनी सगळ्या भगिनींचे क्षेमकुशल विचारले. डॉ. शामा घोणसे आणि भगिनींनी सांगायला सुरुवात केली की, ”आपला रा .स्व. संघ आणि सगळेच संघस्वयंसेवक बांधव समरसता पूर्ण वर्तन करतात.


मात्र, इथे भगिनी आणि बांधवांसाठी प्रत्येकी वेगळे नियम आहेत आणि त्यामुळे भगिनींना दुय्यम नागरिक असल्यासारखे अनुभव आले. मुख्य अध्ययन कक्षात महिलांना प्रवेश नाही, असा इथला व्यवस्थापकीय नियम आहे.” इतका वेळ शांत स्नेहपूर्ण चेहर्‍याने बसलेल्या सरसंघचालकांच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. पण, क्षणभरच... त्यानंतर तेे म्हणाले, ”मोठा भाऊ म्हणून मी स्वतः क्षमस्व आहे. तुम्ही जो अनुभव घेतला, त्याची आधी कल्पना असती, तर तसे घडू नये, याची काळजी घेतली असती. समरसतेचे अध्ययन समरसता जपणार्‍या स्थळीच व्हायला हवे,” असे म्हणून त्यांनी त्या स्थळाचे जे प्रमुख होते, त्यांना बोलावले. (ते रा. स्व. संघाशी दुरान्वयेही संबंधित नव्हते, हे सांगायलाच हवे) उपस्थित भगिनींशी असे वर्तन का, याबद्दल चर्चा केली. त्यावर त्यांनी सांगितले की, ”काही कारण नाही. पण, पूर्वीपासून असेच आहे का? बदलायचे म्हणून तो नियम आताही सुरू ठेवला.” यावर सरसंघचालकांनी त्यांच्याशी याच विषयावर संवाद (वाद विरहित) साधला. त्याची परिणीती अशी झाली की, त्या स्थळ प्रमुखाने शेवटी मान्य केले की, ”आपल्या शास्त्रात असा भेदभाव कुठेही नाही. खरंच भगिनींनो क्षमा करा जे झाले ते. यापुढे या स्थळी असे कधीच भेदपूर्ण काही होणार नाही.”


 दुसर्‍या दिवशी सगळ्या बंधू आणि भगिनींचा अध्ययन बैठकीचा कक्ष एकच होता. (जिथे काल महिलांना जाण्यास बंदी होती). त्या दुसर्‍या दिवशीचा समारोपामध्ये ज्या गुरूजींना महिलांची सावली चालत नव्हती, तेसुद्धा होते आणि आम्ही सगळ्या भगिनीसुद्धा होतो. काल काय झाले, याचा जराही उल्लेख न करता सरसंघचालकांनी मनोगत व्यक्त केले आणि त्याचा सार होता, ”माणूस म्हणून आपण सारे एक आहोत. ईश्वराचा अंश आपल्या सर्वांमध्ये आहे. या राष्ट्राची प्रगती करायची असेल, तर सर्व प्रकारची विषमता त्यागून समरस आत्मीय एकात्मता समाजात निर्माण करायला हवी.” त्या दिवशी सरसंघचालक मला आभाळापेक्षाही मोठे वाटले. जे मला म्हणत होते की, ”जेव्हा केव्हा महिला आणि ओबीसी महिला म्हणून तुझ्यासोबत भेदभाव केला जाईल, त्या दिवशी तुमचे सरंसघचालक काय करतील, ते बघ आणि सांग.” त्या सर्वांना मी ही घटना सांगितली. यावर त्यापैकी एकानेही प्रतिक्रिया दिली नाही.


काही वर्षांपूर्वीच्या या दोन्ही घटना आठवण्याचे कारण की, मागच्या आठवड्यात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विधानाच्या अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न झाला. रोहिदास समाज पंचायत संघाने संतशिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती ६४७वी जयंती साजरी केली. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रमुख मार्गदर्शक होते. सर्वांसाठी ईश्वर असून आपण सगळे एक आहोत, कोणत्याही प्रकारचा भेदाभेद, जातीय विषमताआधारित वर्तवणूक चूक असून, जाती या तत्कालीन पंडितांनी निर्माण केल्या असे ते म्हणाले. ( हे खात्रीपूर्वक सांगू शकते. कारण, त्या कार्यक्रमाला मी पूर्णवेळ उपस्थित होते) मात्र, अनेकांनी दुसर्‍या दिवशी बातमी रंगवली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, ”जाती ईश्वराने बनवल्या नाहीत, तर शास्त्राचा आधार घेत ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या.” त्यानंतर मग काही लोकांनी आवई उठवली की, ”पाहा, प्रत्यक्ष संघही म्हणू लागला की, ब्राह्मण म्हणजे उच्चवर्णीय समाज वाईटच होता आणि त्यांनीच जाती निर्माण करून इतर बहुसंख्य समाजावर जातीय विषमता लादली.” काही लोक म्हणाले, ”सरसंघचालकांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केला.”


अर्थात, या सगळ्या विधानाचा समाचार घेणे आवश्यक वाटतच नाही. कारण, खरे तर सरसंघचालकांनी संपूर्ण मार्गदर्शनामध्ये ’ब्राह्मण’ हा शब्ददेखील उच्चारला नव्हता. मग अशा खोट्या बातम्या का पेरल्या गेल्या असतील? तर महाराष्ट्रात अशी विषवृल्ली आजही अस्तित्वात आहे, जी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मणेतर समाजामध्ये ’मराठा विरूद्ध ओबीसी विरूद्ध अनुसूचित जाती विरूद्ध जमाती’ असा संघर्ष पेटवण्यात धन्यता मानते. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ अशी मानसिकता असलेले हे लोक देश आणि समाजाचे शत्रूच आहेत, तर हे असे लोक समाजात या न त्या मार्गाने मत मांडतात की, ”बघा, भारतीय म्हणून तुम्ही एक नाहीत. हिंदू धर्म म्हणजे केवळ ब्राह्मणवादच! तुम्ही हिंदू नाहीतच,” असे सांगून या लोकांना हिंदू समाजाचे एकतर धर्मांतर तरी करायचे असते किंवा समाजाला विघटित करायचे असते. याच विकृत मानसिकतेच्या लोकांनी सरसंघचालकांच्या विधानाचा अनर्थ केला.


असो. तर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे एक विधानही असेच गाजले. ते म्हणाले होते की, ”भारतीय हिंदूंचा आणि मुसलमानांचा ‘डीएनए’ एकच आहे.” आता ज्यांना इतिहास माहिती आहे किंवा वंशशास्त्र वगैरे माहिती आहे, त्यांना माहितीच आहे की, भारतीय मुसलमान काही बाहेरून आलेला नाही. मात्र, तरीही काहींनी या विधानाबद्दल भयंकर आक्षेप घेतला. आश्चर्य म्हणजे, हेच आक्षेप घेणारे मुठभर लोक त्याआधी म्हणायचे की, ”रा. स्व. संघ मुसलमानांना शत्रू समजतो. त्यांना मारण्यासाठीच्या योजना आखतो.” सरसंघचालकांनी सांस्कृतिक एकतेचा भारत मांडून भारतातील मुस्लीमही हिंदुस्थानी आहेत, असे म्हंटले तरीसुद्धा याच लोकांच्या पोटात गोळा उठतो. का? तर हे कळणे काही ’रॉकेट सायन्स’ नाही. हे समाजविघातक लोक शक्य होईल, त्या मार्गांनी भारतीय संस्कृती संस्कार आणि एकतेवर आघात करतात. समाजगट, पंथांमध्ये भांडणं लावून देश, समाजात अस्वस्थता निर्माण कशी करता येईल, असा विचार करत असतात.


त्या सगळ्यांना रा.स्व.संघ आणि मुख्यत: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आपल्या वाणीतूनच नव्हे, तर कृतीतून सरळ निरूत्तर करतात. सर्व भारतीयांना जातीपातीच्या गटातटातून बाहेर काढण्यासाठी, सर्व भारतीयांना देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी एकत्रित करण्यासाठी, त्याद्वारे या देशाला जगत्गुरू बनवण्याचे अंत:करणपूर्ण प्रयत्न करणार्‍या सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. असे म्हणतात की, अमृत मिळण्यासाठी हलाहलही पचवावे लागतेच. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत याांच्या समरसतापूर्ण समाजरचनेच्या कार्यातही अडथळे आणणारे विषारी विचारांचे विकृत लोक आहेत. मात्र, भारतीय समाजरूपी शिवशंकर या हलाहलाला पचवून जगाच्या कल्याणाचा मार्ग निश्चित करणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.