पुण्यात १६ वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

    05-Dec-2023
Total Views | 26
Pune Fire Brigade Saved Child Girl

पुणे :
पुण्यात दि. ०४ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यानजीक असलेल्या दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी केली असता तिथे मोकळ्या परिसरात पाण्याच्या मोठ्या तीन टाक्या बांधल्या असून त्या सद्यस्थितीत रिकाम्या असल्याचे समजले. त्यामधील जवळपास ४० फुट खोल असणाऱ्या मोठ्या टाकीमध्ये वरुन पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आले.

दरम्यान, अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांनी तातडीने स्वतः व जवान अनिकेत गोगावले यांनी सेफ्टी बेल्ट परिधान करत रश्शीच्या शिडीच्या साह्याने जवळपास ४० फुट खोल टाकीमध्ये प्रवेश केला तर इतर जवान वर थांबून साहित्याची देवाणघेवाण करीत होते. शिंदे यांनी मुलगी जखमी अवस्थेत असल्याचे पाहून नियंत्रण कक्षामार्फत रुग्णावाहिका व डॉक्टर यांची मागणी केली व लगेच मुलीला सेफ्टी बेल्ट लावून दलाकडील जाळीमध्ये वर पाठवण्यास सुरवात केली. टाकीच्या वर असलेल्या जवानांनी मुलीला सुरक्षितरित्या टाकीबाहेर घेत रुग्णवाहिकेत ठेवले.

त्याचवेळी उपस्थित डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन देत १०८ या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले. मुलीच्या पायांना व डोक्याला मार लागला असून जखमी अवस्थेत दलाच्या जवानांनी वेळेत तिला बाहेर काढत एकप्रकारे जीवदान देत आपले कर्तव्य बजावले आहे. मुलीचे नाव इनसीया इसाक इडतवाला (वय वर्ष १६) राहणार कोंढवा, बादशाहनगर कोणार्क पुरम येथील रहिवाशी असल्याचे समजले. सदर कामगिरी पुर्ण करण्याचा एक तास अवधी लागला. या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दिपक कचरे व फायरमन मोहन सणस, रवि बारटक्के, अनिकेत गोगावले, संतोष माने, रामराज बागल यांनी सहभाग घेतला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121