बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत असतानाच, आता ट्रीपल सीट फिरणार्यांची दुचाकी थेट पोलीस ठाण्यात जमा केली जाणार आहे. या बाबतची अंमलबजावणी आयुक्तालयाच्या विचाराधीन असून, यामुळे कारवाईचे स्वरूप अधिक कठोर करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरात बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूककोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेने काही दिवसांपासून प्रबोधनासह बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि साहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी वाहतूक शाखेतील पथकांना नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’सह इतर कलमांन्वये कठोर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा आगमी वर्षात अधिक प्रमाणात करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ट्रीपल सीट फिरणार्यांवर कठोर कारवाई अंतर्गत त्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत. यापूर्वीही देखील अशा स्वरुपाची धडक कारवाई पोलिसांनी केली होती. त्यावेळी बेशिस्त चालकांना शिस्त लागली होती. शहरात मागील दहा दिवसांत २ हजार, २४४ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दंड करण्यात आला आहे. यासह ६१३ चालक राँग साईड, तर २१५ दुचाकींवरील प्रवासी ट्रीपल सीट असल्याने कारवाई करण्यात आली. कारवाईअंतर्गत शहरातील बेशिस्त वाहन चालकांना १६ लाख, २९ हजार, २०० रुपयांचा दंड ठोठावला. तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी हेल्मेट सक्ती केली होती. त्यानंतरचे आयुक्त दीपक पाण्डेय यांनीदेखील शहरात हेल्मेट सक्तीच्या नव्या अध्यायात असहकाराची मात्रा वाढविली. हेल्मेट सक्ती करूनही, अनेक चालक हेल्मेट वापरत नसल्याने, पाण्डेय यांनी सक्ती आणखी कडक केली. शहरातील कुठल्याही शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट चालकाला ‘नो एन्ट्री’ असेल, यासाठीचीबअधिसूचना पाण्डेय यांनी काढली. त्यानंतर वर्षभर ’हेल्मेट ड्राईव्ह’ जोरात चालला. पाण्डेय यांची बदली झाल्यानंतर हेल्मेट कारवाईसह बेशिस्त वाहनचालकांना मुभाच मिळाल्याचे दिसते. मात्र आगामी वर्षात वाहतुकीचे नियम अधिक कडक होणार असल्याने कारवाईचा बडगा अटळ आहे.
‘आरोग्यवर्धिनी’ला विरोध कशासाठी
सर्वसामान्य तसेच कामगार-कर्मचारी वर्गाला सक्षम व उत्तम आरोग्यसेवा मिळावे, या हेतूने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक शहरात ’आरोग्यवर्धिनी’ केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी निश्चित केलेल्या जागा मिळविण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभाग आणि आरोग्य वैद्यकीय विभागाला अनेक अडथळे निर्माण होत असून, ही अडथळ्यांची शर्यत पार करणे, तारेवरची कसरत ठरत आहे. पूर्व विभागात १३ ठिकाणी ’आरोग्यवर्धिनी’ केंद्रांसाठी विविध कामे करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, १३ पैकी सात कामांचे कार्यादेश प्राप्त झाले आहेत. सहा कामे निविदा प्रक्रियेत आहेत. त्यापैकी प्रभाग क्र. १६ मधील तीन ठिकाणी शहरी ’आरोग्यवर्धिनी’ केंद्रांचे काम प्रगतीत असून, प्रभाग क्र. १५, २३ व ३० मधील कथडा समाज मंदिर, तिग्रानिया रोडवरील मनपाचे सभागृह, साईनाथ नगर अक्षदा मंगल कार्यालयामागील बंद व्यायामशाळा येथे नागरिकांनी केंद्र उभारण्यास विरोध दर्शविला आहे. याप्रकारे मनपाच्या उर्वरित पाचही विभागांतील संबंधित ठिकाणी नागरिकांकडून आरोग्य केंद्रांना विरोध केला जात असल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे तर या केंद्रांमुळे नागरिकांना आपापल्या परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे, असे असतानादेखील होणार्या विरोधामागील कारणे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेच्या धर्तीवर शहरी भागातील वैद्यकीय सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने नाशिक शहरात १०६ ’आरोग्यवर्धिनी’ केंद्र साकारण्यात येत असून, चुंचाळे येथे एका केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांत एकाही नवीन केंद्राची भर पडलेली नाही. या प्रत्येक ’आरोग्यवर्धिनी’ केंद्रात एक ’एमबीबीएस’ डॉक्टर, एक परिचारिका, एक बहुउद्देशीय सेवक तसेच एका साहाय्यकाची नियुक्ती केली जाणार आहे. ’आरोग्यवर्धिनी’ केंद्रांसाठी महापालिकेच्या मालमत्तांमधील ठिकाणे निश्चित करण्यात येऊन, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन, कामे हाती घेण्यात आहे. मात्र, त्यास अडथळे निर्माण होत आहे. जानेवारी अखेरपर्यंत आणखी २० ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्र सुरू करण्याचा मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचा प्रयत्न आहे.
गौरव परदेशी