गरजूंना मदतीचा हात देणारी ‘लक्ष्मीनारायण’ संस्था

    07-Nov-2023   
Total Views |
Article on Lakshminarayan Sanstha

समाजातील गरीब आणि गरजूंना निरपेक्ष भावनेने आर्थिक मदतीचा हात देणार्‍या डोंबिवलीतील ‘श्री लक्ष्मीनारायण’ संस्थेच्या दोन दशकाच्या वाटचालीचा आढावा घेणारा हा लेख...

कॉर्पोरेट क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून काम करणार्‍या माधव जोशी यांनी २००१ साली ‘लक्ष्मीनारायण’ या संस्थेची स्थापना केली. माधव यांची आजी लक्ष्मी आणि आजोबा नारायण यांच्या स्मरणार्थ ही संस्था सुरू केल्याने संस्थेला त्यांचेच ‘लक्ष्मीनारायण’ असे अगदी समर्पक नाव देण्यात आले. १९९१ साली भारतात आर्थिक उदात्तीकराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तू आणि उपकरणे भारतात दाखल होऊन येथील स्थानिक उत्पादनांशी स्पर्धा करू लागले. ‘लायसन्सराज’च्या संरक्षणात वाढलेल्या अनेक भारतीय कंपन्या या स्पर्धेत दुर्दैवाने तग धरु शकल्या नाहीत व त्यापैकी काही कंपन्या बंद पडल्या. डोंबिवलीतील ‘प्रिमीअर’ या ‘पद्मिनी’आणि ‘११८ एनई’सारख्या मोटारी बनविणारा कारखानादेखील बंद पडला. कामगारांनी आंदोलनही पुकारले. सुमारे अडीच हजार कामगार जे प्रत्येकी २० हजार रुपये महिना कमावत होते, ते बेकार होऊन घरी बसले. अनेकांची मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत महिना ४०० रुपये फी देऊन शिकत होती. त्यांची शाळेची फी थकू लागली.

वार्षिक परीक्षेचा निकाल फी थकल्यामुळे शाळांनी रोखून धरला. त्याचवेळी डोंबिवलीमध्ये ‘भारत विकास परिषदे’ची शाखा माधव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या संस्थेकडे पालकांनी शाळेची फी भरण्यासाठी मदत मागितली. पण, ‘भारत विकास परिषदे’च्या काही आर्थिक मर्यादा होत्या. त्यामुळे माधव जोशी यांनी ‘श्री लक्ष्मीनारायण’ संस्था स्थापन केली. त्यावेळी ‘भारत विकास परिषदे’चे खजिनदार सीए कै. माधव बर्वे यांनी अतिशय जलदगतीने या संस्थेची साहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे कार्यालयात नोंदणी करून घेतली आणि आयकर कायद्याच्या विविध कलमांखाली संस्थेची नोंदणी करून घेतली. लगेच माधव आणि सुरेखा जोशी यांनी विविध शाळांमध्ये जाऊन फी थकलेल्या विद्यार्थ्यांची फी भरण्याची तयारी दाखविली. पण, फी भरत असताना त्या त्या शाळेला थकबाकीचा काही हिस्सा कमी करायला लावला. हे काम करीत असताना फी कोणी भरली हे गुप्त ठेवण्याची अटही त्यांनी या शाळांना घातली. अशाप्रकारे शाळांना प्रारंभीची एक-दोन वर्षे फक्त शैक्षणिक मदत किंवा शैक्षणिक पारितोषिके दिली जात होती. पण, कालांतराने वैद्यकीय मदत देण्यास सुरुवात कशी झाली याचा किस्सा ही मनोरंजक असल्याचे जोशी सांगतात.
 
२००३च्या दरम्यानची गोष्ट. सुरत येथे चहाची गाडी चालविणार्‍या मराठी माणसाच्या लहान मुलाला कर्करोगाचे निदान झाले. त्याला उपचारासाठी मुंबईतील वाडिया रुग्णालयात भरती केले होते. त्या मराठी माणसाने उपचारासाठी अनेक ‘धर्मदाय’संस्थांकडे मदत मागितली. पण, ते महाराष्ट्रात राहत नसल्याने त्यांना ‘धर्मदाय’ संस्थांनी मदत देण्यास नकार दिला. त्यांचे एक परिचित मारवाडी गृहस्थ डोंबिवलीत राहत होते ते माधव जोशी यांच्याकडे आले. त्यांनी जोशी यांना सर्व माहिती दिली. त्यानंतर जोशी यांचे कार्यालयीन सहकारी अनंत ढगे यांनी रुग्णालयात जाऊन सर्व शहानिशा केली. ‘श्री लक्ष्मीनारायण’ संस्थेने त्या लहान मुलाला आर्थिक मदत केली आणि तिथूनच वैद्यकीय आर्थिक मदतीचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात ही काम करण्यास सुरुवात केली.

माधव जोशी यांचे जन्मगाव पालगड. साने गुरूजी यांचे जन्मगाव असलेल्या पालगडमध्ये वैद्यकीय सुविधांचा अभाव. एक्सरे काढण्यासाठीही तालुक्याच्या गावी जायला लागायचे. अनेकदा संपूर्ण दिवस घालवून ही काम व्हायचे नाही. ज्येष्ठ नागरिकांना तालुक्याला नेणेही अनेकांना शक्य होत नव्हते. मग जोशी यांच्या संस्थेने गावकर्‍यांच्या सोयीसाठी पालगड येथील डॉ. शंतनू करंदीकर यांच्याशी संपर्क साधला आणि एक पोर्टेबल एक्सरे मशीन घेऊन दिले.

माधव जोशी आणि कुटुंबाने वेळोवेळी दिलेल्या देणग्यांच्या व्याजातून ही मदत केली जाते. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या कुटुंबाबाहेरच्या देणग्या घेणे टाळले आहे. ‘कोविड’ काळात अन्नधान्य पाकिटांचे वाटप करण्यासाठी आणि वॉटर कप स्पर्धेतील गावांना मदत करण्यासाठी इतर संस्थांच्या वतीने देणग्या स्वीकारून त्या त्यांना पूर्णपणे दिल्या. संस्थेकडे कर्मचारी नसल्याने थेट सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मनुष्यबळ नाही. त्यामुळे ही संस्था इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून काम करण्याला प्राधान्य देते.

संस्थेची मुख्य उद्दिष्टे

गरीब व गरजू व्यक्तींना मदत करणे.
वृद्ध व दिव्यांग किंवा मागास वर्गातील व्यक्ती किंवा त्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना मदत करणे.
गरजू, गरीब, पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, गणवेश, शिष्यवृत्ती पुरविणे.
पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था सुरू करणे किंवा या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना मदत करणे.
शिक्षणाचा लाभ समाजातील खालच्या वर्गापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी ग्रंथालये किंवा शैक्षणिक वर्ग सुरू करणे.
विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे. त्यांना क्रीडा साहित्य पुरविणे आणि या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना आर्थिक मदत करणे.
लोकांचा सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक विकास साधण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे.
संस्थेने गेल्या दशकभरात केलेले कार्य
पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये (जनकल्याण समिती, चतुरंग प्रतिष्ठान आणि ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून) मदत. ‘कोविड-१९’च्या काळात (भारत विकास परिषद रघुलीलाच्या माध्यमातून) अन्न आणि किराणा पाकिटांची मदत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला ‘कोविड’ उपकरणांची मदत.
चिपळूण जवळील वहाळ येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग चालविणार्‍या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ला तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय चालविणार्‍या आणि शहापूर तालुक्यातील विहीगाव येथे ग्रामीण उन्नतीचे उपक्रम राबविणार्‍या विवेकानंद सेवा मंडळाला मदत.
गरजू व्यक्तींना वैद्यकीय साहाय्य केले जाते. ‘आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट’ला सवलतीच्या दरात डायलिसिस करण्यासाठी ५० हजार रुपयांची वार्षिक देणगी दिली जाते.
ज्येष्ठ नागरिकांना मदत
प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे. पाण्याचे संवर्धन, शून्य कचरा मोहीम, ‘ऊर्जा फाऊंडेशन’, ‘पर्यावरण दक्षता मंच’, ‘भारत विकास परिषद’ यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण यासंबंधी कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.
बालरंगभूमीसाठी काम करणार्‍या अनेक संस्थांना (श्री कला संस्कार, वेध अ‍ॅक्टिंग अकादमी) आर्थिक प्रोत्साहन. श्री कला बरोबर कार्यक्रमाचे संयुक्तपणे आयोजन
मोफत किंवा सवलतीच्या दरात सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या संस्थांना मदत
दिव्यांगासाठी काम करणार्‍या संस्थांना (भरारी अस्थीव्यंग, प्रगती अंध विद्यालय दिलासा) मदत.
कॅन्सरवर उपचार घेत मुलांना पालकांसह राहण्याची मोफत सोय करण्यासाठी केंद्रे चालविणार्‍या ‘अ‍ॅक्सेस लाईफ’ या संस्थेला मदत.
शबरी सेवा समिती, भगीरथ प्रतिष्ठान-झाराप सिंधुदुर्ग, महामानव बाबा आमटे-श्रीगोंदे या ग्रामीण उन्नतीसाठी काम करणार्‍या संस्थांना मदत.
कुष्ठरोग आणि वनवासींच्या उत्थानासाठी काम करणार्‍या ‘आनंदवन’ आणि ‘हेमलकसा’सारख्या संस्थांना मदत
‘स्वरूपिणी’ (मंथन व्यवहारमाला), ‘भारत विकास परिषद’ यांसारख्या संस्थांना सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक, बालसंगोपन या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यास मदत.
सामाजिक किंवा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची पुस्तके (परम मित्र प्रकाशनने प्रकाशित केलेले शिवाजी महाराजांचे इंग्रजी चरित्र, रामदास गाथा, वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रसाठी व्यास क्रिएशन्स, संगीत विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्यास मदत.
वैद्यकीय विषयांवरील मुलाखती, व्याख्यानांचे आयोजन.
महिला लेखिका व सामाजिक कार्यकर्त्यांना २५ हजार रु.चा ‘शांता परांजपे स्मृती पुरस्कार’ दिला आहे. हा पुरस्कार मागील तीन वर्षांपासून दिला जात आहे.
लहान मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धेचे संयुक्तिक आयोजन. या स्पर्धेत दरवर्षी १४०० विद्यार्थी सहभागी होतात.
ज. द. महाजन, इंदुमती महाजन आणि सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाच वर्ष आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
नागालॅण्डमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविण्यासाठी ‘अभ्युदय प्रतिष्ठान’ डोंबिवलीला प्रोत्साहन.
ईशान्य पूर्व ‘सीमा विकास प्रतिष्ठान’मधील शाळांना मदत.
भारतीय शिक्षा समितीच्या माध्यमातून जम्मूतील शाळांना मदत.
पालवी पंढरपूर, ‘एचआयव्हीग्रस्तां’च्या मुलांना मदत.
टिटवाळा येथे गरीब मुलींसाठी परिवर्तन वसतिगृहास मदत.
डोंबिवलीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि महानगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेला मदत.
पूरग्रस्त नरसोबाची वाडीतील दोन मुलांचा खर्च उचलला.
पालगड (दापोली, रत्नागिरी) या गावी पोर्टेबल एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिले.
या संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे धार्मिक अथवा राजकीय कार्यासाठी मदत दिली जात नाही.
 
संस्थेच्या विश्वस्त मंडळांत माधव जोशी यांच्यासोबत सुरेखा जोशी, अभय जोशी, अमेय जोशी, पूर्णा जोशी, शुभा जोशी, सीए जयंत फलके, शैलेश निपुणगे यांचा समावेश आहे. संस्थेच्या कार्यात अनेकांचे सहकार्य मिळत असते. हिशेब तपासनीस, सीए श्रीराम बाळ आणि सीए सलील खरे हे दोघे संस्थेची हिशेब तपासणी (ऑडिट) गेली २२ वर्षे विनामूल्य करीत आहेत. ठाण्यातील अनेक संस्थांशी संबंधित असलेले आणि ‘गर्जे मराठी’चे संचालक सीए संजीव ब्रह्मे यांचेदेखील बहुमोल मार्गदर्शन मिळते. अशा या संस्थेला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.

(अधिक माहितीसाठी संपर्क - माधव जोशी, संस्थापक-अध्यक्ष, ‘श्री लक्ष्मीनारायण’ संस्था, मोबाईल क्र. - ९२२३४०९१२३)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.