वेद-उपनिषदातील विज्ञानासाठी...

    06-Nov-2023   
Total Views |
article on Kalpana Kshirsagar

वेद-उपनिषदाच्या अभ्यासक आणि तत्वज्ञ पिंपरी-चिंचवडच्या कल्पना प्रकाश क्षीरसागर. ‘एकोहं बहुस्याम’ म्हणत जीवन जगणार्‍या कल्पना क्षीरसागर यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...

आयुष्य किती जगलो, यापेक्षा कसे जगलो, ते कुणासाठी जगलो, याची जी उत्तरं आहेत, त्या उत्तरांमध्ये कल्पना प्रकाश क्षीरसागर यांना 100 पैकी 100 गुण प्राप्त होतील. पश्चिम महाराष्ट्राच्या कुटुंब प्रबोधन गतविधीच्या सहसंयोजिका म्हणून कल्पना क्षीरसागर यांच्यावर जबाबदारी आहे. मातृशक्ती आयामाच्या त्या प्रमुख आहेत. ‘समर्थ वेद’ नावाने त्या वेद-उपनिषद आणि विज्ञान संबंध संदर्भ या विषयाचे त्यांनी निशुल्क ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. देशविदेशातील जिज्ञासू या क्लासेसमध्ये सहभागी होतात.

सावरकर संस्थेच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्यानंतर कोसबाड येथील शिक्षण केंद्राकडे आईच्या मायेने लक्ष देण्यासाठी आणि त्यानुसार कार्य करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यानुसार कोसबाड येथील शिक्षा केंद्रासाठी त्यांनी दहा वर्षे काम केले. अर्थात, त्यांचे पती प्रकाश यांचेही मोलाचे योगदान आहेच. कल्पना यांनी अर्थशास्त्र, हिंदी आणि तत्वज्ञान या तीनही विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. गणित विषय घेऊन ‘बी.एड’ पूर्ण केलेल्या, जागतिक वेद विद्यापीठातून वेदांचा अभ्यास केलेल्या, हस्तमुद्रिकाशास्त्र, कुंडलीशास्त्र आणि अंकशास्त्र या विषयांमध्ये विशारद पदवी मिळालेल्या कल्पना म्हणजे बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलतेचा एक अपूर्व संगमच!

बालक-पालक मानसशास्त्रावरत्यांनी ‘सवंगडी’, ‘बोधकथा’ आणि ‘चिंतन’ ही तीन पुस्तकही लिहिली. कल्पना क्षीरसागर या माहेरच्या कल्पना कुलकर्णी. त्यांचे पिता नारायण कुलकर्णी आणि आई ताराबाई हे दाम्पत्य मुळचे पुण्यातील पेठ पारगावचे. कुलकर्णी कुटुंब संपन्न आणि श्रीमंतच. स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ. नारायण यांना लागोपाठ दोन मुली झाल्या. नातलग नारायण यांना सांगू लागले की, मुलगा होण्यासाठी दुसरे लग्न कर. मात्र, नारायण यांनी हे म्हणणे फेटाळले. पत्नीला घेऊन ते पुणे शहरात दाखल झाले. त्यांनी शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यांना पाच मुलींनंतर एक मुलगा झाला. त्यांची पाचवी कन्या म्हणजे कल्पना. गावी संपत्तीची दात नव्हती. मात्र, इथे शून्यातून सगळे सुरू करायचे होते. गरिबी होती. अशातही नारायण यांच्याकडे अनेक गरीब मुलं विनामूल्य शिकायला यायची. त्यापैकी एका मुलीकडे चप्पलच नसल्याने अनवाणी यायची. नारायण यांनी स्वत:च्या मुलीची चप्पल त्या मुलीला दिली. पत्नीला म्हणाले, ”मी लेकीला सायकलवरून शाळेत सोडतो आणि आणतो.

रस्त्यावर तिला चप्पल घालणेगरजेचे नाही. वाटले तर पुढच्या पगाराला तिला चप्पल घेऊ.” या घरची दिवाळीसाजरी व्हायची, तर दिवाळी आली की ते मुलांना म्हणायचे, ”दिवाळी आली मुलांनो, मी तुम्हाला तात्यारावांच्या छान छान गोष्टी सांगणार आहे.” तात्याराव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. लहानपणी नारायण नाशिकला शिकायला होते. त्यावेळी स्वा. सावरकरांचे त्यांना सान्निध्य लाभले होते.अशा संस्कारक्षम समाजशील पालकांची कन्या कल्पना. आठवीला असतानापासून त्या शिकवणी घ्यायच्या. प्राध्यापक बनायचे अशी त्यांची इच्छा. त्या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला असताना रा. स्व. संघाचे प्रचारकप्रकाश क्षीरसागर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 70 साल होते. त्या अहमदनगरला आल्या. पुढे आणीबाणीमध्ये देशहिताचे काम केल्यानंतर क्षीरसागर कुटुंब लोणावळ्याला आले. तिथे आ. दामुअण्णा दाते, बाबाराव भिडे यांच्यासारख्या तपस्वी संघ स्वयंसेवकांचे मार्गदर्शन, आशीर्वाद कल्पना यांना लाभले.

पुढे दोन दशक प्राध्यापक म्हणून नोकरी करताना कल्पना रेल्वेने दीड तासांचा प्रवास करत. रेल्वेच्या डब्यात फेरीवाले मुलं येत. या सवार्थाने गरीब मुलांना अक्षरज्ञान, अंकज्ञान आणि संस्कार देण्यासाठी कल्पना यांनी महिला डब्यातच प्रवासादरम्यान वर्ग सुरू केला. या मुलांना शिक्षणासाठी सर्वार्थाने मदत केली. गेल्या 20 वर्षांत अशाप्रकारे 250 पेक्षा जास्त मुलमुलींना त्यांनी शिक्षणासाठी प्रेरित केले. नवरात्रीमध्ये प्रवासात महिला सहप्रवासीसोबत महिषासूरमर्दिनी स्तोत्रम म्हणायची सुरुवात त्यांनी केली. त्यातूनच मग धार्मिक कथा पुराण वगैरेंवर काहींनी विज्ञानाचा प्रश्न उपस्थितकेला. दरम्यान, अनेक तथाकथित पुरोगामी असेच प्रश्न उपस्थित करत होते. वेद- उपनिषदांवरील या प्रश्नांचे विज्ञान आधार देत स्पष्टीकरण करता यायला हवे, असे कल्पना यांना वाटले. त्यातूनच मग त्यांनी वेद-उपनिषदांचा अभ्यास सुरू केला.

आज वेद-उपनिषदांवर अत्यंत विज्ञानतर्कसुसंगत पुराव्यासकट बोलणार्‍या व्याख्यात्या समुपदेशक म्हणून कल्पना क्षीरसागर ओळखल्या जातात. त्यांना त्यांच्या विचारकार्यासाठी अनेक नामांकित सन्मान प्राप्त झाले. मात्र, देश समाजकल्याण जागृती हा धर्मच आहे, असे कल्पना यांचे म्हणणे. त्या म्हणतात की, ”रा. स्व. संघाचे विचारकार्य हे माझे प्रेरणास्थान आहेत. ‘एकोहं बहुस्याम’ म्हणजे मी एक आहे, त्या एकाची अनेक रूपे होवोत, हा माझ्यासाठी जीवनमंत्र आहे. सद्विचार, सद्प्रवृत्ती आज अनेक रूपात परावर्तित होण्यासाठी मी सतत विचारकार्य सुरू ठेवणार.” खरेच विश्वाचा गाडा सुरळीत सुरू आहे. कारण, समाजकार्य आणि देशकल्याणासाठी स्वतःला बीज म्हणून रूजवून घेणार्‍या कल्पना प्रकाश क्षीरसागर यांच्यासारखी माणसं आजही या जगात आहेत.

योगिता साळवी



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.