शिरोडा किनारी 'पाणचिऱ्या'चे दुर्मीळ दर्शन; सिंधुदुर्ग जिल्ह्याातील पहिलीच नोंद

    23-Nov-2023   
Total Views |
Indian skimmer sindhudurg


मुंबई (अक्षय मांडवकर) -
संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' ( indian skimmer sindhudurg ) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा किनाऱ्यावर दर्शन झाले. ( indian skimmer sindhudurg ) महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद आहे. महाराष्ट्रात पाणचिरा पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ( indian skimmer sindhudurg )
 
 
थंडीची चाहूल लागताच राज्यात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणथळ पक्ष्यांचा समावेश आहे. फ्लेमिंगो, उचाट्या, हळदीकुंकू बदक, वारकरी बदक, थापट्या बदक हे पक्षी खाडी प्रदेशात दिसू लागले आहेत. तर कुरव, पाणटिवळा, तुतारी, टिलवा, चिखल्या या पक्ष्यांच्या विविध प्रजाती किनाऱ्यांवर दिसत आहेत. अशातच 'पाणचिरा' या दुर्मीळ हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडले आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या यंदाच्या 'स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वाॅरियर्स अवाॅर्ड'मधील 'बडिंग नॅच्युरिलिस्ट' या श्रेणीतील विजेते प्रवीण सातोसकर यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे. 'पाणचिरा' पक्ष्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ही पहिलीची नोंद असल्याची माहिती या पक्ष्यावर मध्य भारतात काम करणाऱ्या 'बीएनएचएस'च्या संशोधिका परवीन शेख यांनी दिली. तसेच हा पक्षी पिल्लू अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, जेव्हा या पक्ष्यांचा प्रजननाचा हंगाम नसतो त्यावेळेस हे पक्षी किनारी भागातील पाणथळींवर स्थलांतर करतात. सिंधुदुर्गात आलेला पाणचिरा हा सुरव पक्ष्यांच्या थव्यासोबत आल्याची शक्यता शेख यांनी व्यक्त केली.  
 
 
 
'पाणचिरा' हा पक्ष्याच्या वीण वसाहती या प्रामुख्याने मध्य प्रदेशातील चंबल नदीचे खोरे आणि ओडिशामध्ये आहेत. मात्र, त्याच्या हिवाळी स्थलांतराच्या क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. अगदी तामिळनाडूमधूनही त्यांच्या नोंदी असल्या तरी, त्या एक किंवा दोन पक्ष्यांचा आहेत. त्यामुळे या पक्ष्याच्या हिवाळी स्थलांतराचा विस्तार मोठा असला तरी, संख्येने एक दोन पक्षी स्थलांतरित झालेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या क्वचितच नोंदी होतात. मुंबईनजीकच्या उरण येथील पांजे पाणथळ क्षेत्रामध्ये दोन 'पाणचिरा' पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत. पालघरच्या किनाऱ्यावरुन देखील या पक्ष्याच्या नोंदी असून नाशिकमधील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, अमरावती आणि यवतमाळ येथील पाणथळ प्रदेशातही हा पक्षी दिसल्याच्या मोजक्या नोंदी आहेत.
 
 
बुधवारी शिरोडा किनाऱ्यावर पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो. त्याठिकाणी हा 'पाणचिरा' कुरव पक्ष्यांच्या थव्यामध्ये वावरताना आढळला. छायाचित्र टिपल्यानंतर या पक्ष्याची ओळख पटली. सध्या हिवाळी हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेकडील किनाऱ्यांवर अनेक स्थलांतरित पाणपक्षी दाखल झाले आहेत. - प्रवीण सोतासकर, पक्षी निरीक्षक


'पाणचिरा' विषयी
'पाणचिरा' पक्षी चंबल नदी आणि ओडिशामधील काही भागात वाळूच्या बेटांवर आपली घरटी तयार करतात. साधारण फेब्रुवारीपासून ते या वीण वसाहतीमधील ठिकाणी परतायला सुरुवात करतात. ओडिशामध्ये एप्रिल महिन्यात त्यांची वीण आढळते. आॅगस्टमध्ये ते वीण वसाहती सोडून हिवाळी स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. चंबल येथे टॅग करण्यात आलेले 'पाणचिरा' पक्षी हे गुजरातचा किनारा, उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील गंगेच्या खोऱ्यात आणि आंध्रप्रदेशातील काही ठिकाणी आढळून आले आहेत. जल प्रदूषण आणि वाळू उपसा हे त्यांच्या वीण वसाहतीला असलेले धोके आहेत. यामुळे त्यांची संख्या घटली असून 'आययूसीएन'च्या लाल यादीत त्याला 'संकटग्रस्त' श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.