मुंबई: बांगलादेश बँकेने तीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा जारी केल्या आहेत. नवीन नोटा केंद्रीय बँकेच्या मुख्यालयातून जारी केल्या जातील आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून त्या वितरित केल्या जातील. वास्तविक बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर युनूस सरकारकडून अल्पसंख्याक हिंदूंवर आणि बौद्धांवर अतोनात अत्याचार झाले. त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले; देवीदेवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या गेल्या. तेव्हा इस्लामिक कट्टरपंथींविरोधात चकार शब्दही सरकारच्या तोंडून निघाला नाही. हिंदूंच्या वेदना तेव्हा सरकारला दिसल्या नाहीत आणि आता चलनी नोटांवर हिंदू, बौद्ध मंदिराच्या प्रतिमा दाखवत अल्पसंख्याकांप्रति सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, सरकारने नवीन चलनी नोटा जारी करायला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. या नोटांवर माजी पंतप्रधान आणि राष्ट्राचे संस्थापक शेख मुजिबुर रहमान यांचा फोटो नसेल, तर हिंदू आणि बौद्ध मंदिराच्या प्रतिमा दाखवण्यात आल्याचे दिसत आहे. बांगलादेश लष्कराचे युनूस सरकारवर दबावतंत्र सुरू असताना येथील अल्पसंख्याकांना साद घालण्याचा हा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न यातून उद्भवतो.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशने रविवार, दि. 1 जून रोजीपासून नवीन चलनी नोटा जारी करायला सुरुवात केली आहे. देशातील राजकीय अस्थिरतेनंतर, बांगलादेश बँकेने गेल्या वर्षी नवीन नोटा जारी करण्याच्या दिशेने काम करणार असल्याची घोषणा केली होती. एका वृत्तसंस्थेशी बोलताना बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी सांगितले की, नवीन चलन बांगलादेशच्या निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवण्यावर केंद्रित असून कोणताही मानवी फोटो नसेल.
यापूर्वीही चलनात बदल
बांगलादेशने आपले चलन बदलण्याची ही पहिली वेळ नाही. 1972 मध्ये पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्यानंतर देशाने आपले चलन बदलले होते. त्या नोटांवर नव्याने स्थापन झालेल्या देशाचा नकाशा छापण्यात आला होता. त्यानंतरच्या नोटांवर अवामी लीगचे नेते शेख मुजिबुर रहमान यांचा फोटो छापण्यात आला होता.