बदलापूर : रेल्वे फलाटावर भोंडला, गरबा खेळण्याबरोबरच फलाटावरच फुलांची आणि रांगोळ्यांची आकर्षक सजावट फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेले लोकलचे डब्बे, आरत्या आणि भजनाच्या सुरांच्या तालात एकमेकांना मिठाई देऊन लोकलने प्रवास करणाऱ्या रोजच्या प्रवाश्यानी दसरा संमेलन आनंदात साजरे केले.
रेल्वे प्रवासी सहकारी संस्थेच्या वतीने आज विजयादशमीच्या आदल्या दिवशी विजयादशमी साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष रमेश महाजन आणि यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी रेल्वे स्थानकात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा , मोटरमन आणि गार्ड तसेच स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. विजयादशमीला सार्वजनिक सुटी असल्याने दरवर्षाप्रमाणे विजयादशमीच्या आदल्या दिवशी संमेलन साजरे केले गेले. आज सकाळपासूनच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यानी लोकलला फुलांची सजावट करून मिठाई वाटून आनंद साजरा केला. महिला प्रवाश्यांनी फलाटावर भोंडला, गरबा खेळून वातावरण उत्साही केले. आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलपासून १० वाजेपर्यंत फ्लॅट एक आणि दोन वर संमेलन साजरे करण्यात आले.
रेल्वे वर्षभर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना कामावर आणि पुन्हा घरी घेऊन येणाऱ्या लोकलबाबत असलेला आदरभाव व्यक्त व्हावा या उद्देशाने गेल्या सुमारे २० वर्षांपासून संस्थेमार्फत विजयादशमीला संमेलन साजरे केले जाते , रेल्वेमार्फत प्रवाश्यांना सेवा देणाऱ्या मोटरमन गार्ड, आरपीएफ जवान, पोलीस, सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त झालेल्या प्रवाश्यांचा देखील सन्मान केला जातो अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महाजन यांनी दिली.