मुंबई:आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्यावतीने मुंबईकरांसाठी योग केंद्राबाबत माहिती पुरवणारी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांनी ८९९९२२८९९९ या क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधल्यास नजीकच्या परिसरातील शिव योग केंद्रांबाबत अद्ययावत व सविस्तर माहिती मिळेल.
ग्रँट रोड स्थित गोकुळदास तेजपाल सभागृहात आयोजित विशेष योगसत्रात महापालिका उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, योगेश देसाई, शिल्पा शिव योग शाळेच्या शिल्पा चारणिया आदींच्या उपस्थितीत या व्हॉट्सएप चॅटबॉट सेवेचे लोकार्पण करण्यात आले. योग सत्रात अधिकारी आणि नागरिकांनी सहभागी होत विविध योगासने केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने १०६ शिव योग केंद्रांमार्फत सोमवार-बुधवार-शुक्रवार आणि मंगळवार-गुरुवार-शनिवार अशा सत्रांमध्ये योग सेवा प्रदान केली जाते. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सर्व घटकांसाठी ही सुविधा आहे. मुंबईच्या सर्व प्रभागांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, उद्याने आणि सामुदायिक स्थळांवर सकाळी व सायंकाळी नियमित योग सत्रे घेतली जातात.
असा करा व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर
चॅटबॉटद्वारे महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात संचालित शिव योग केंद्राची माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये योग सत्रांची वेळ, स्थळ आदी माहिती मराठी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईकरांना त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील शिव योग केंद्राची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मोबाईलमधील लोकेशन ऑन करून ८९९९२२८९९९ या क्रमांवर संदेश पाठविल्यास त्यांना विविध पर्याय उपलब्ध होतात. त्यातील ‘आरोग्य सेवा’ हा पर्याय निवडल्यानंतर पुढील संदेशात व्हॉट्सॲप चॅटबॉटकडून ‘शिव योग केंद्र’असा पर्याय दिला जातो. त्यापुढे जावून, लोकेशन शेअर करून ’शिव योग केंद्र' असा पर्याय निवडल्यास आपल्या नजीकच्या शिव योग केंद्रांची यादी, त्यांचा संपूर्ण पत्ता, तेथील योग शिक्षकाचे नाव आणि संपर्क क्रमांक या चॅटबॉटकडून पुरविण्यात येतो.