पादरीच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
02-Oct-2023
Total Views | 144
चेन्नई : तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे एका महिलेने झोपेच्या ४० गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ख्रिश्चन पादरीच्या लैंगिक शोषण आणि छळाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलले. अशी माहिती मिळाली आहे. जगन (३९) असे आरोपी धर्मगुरूचे नाव असून, तो स्थानिक चर्चमध्ये पादरी आहे. प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात असताना त्याचा या महिलेशी संपर्क झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय महिला एका प्रार्थना सभेत गेली होती, जिथे पादरी जगनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी महिलेला बेशुद्ध अवस्थेत तिरुनेलवेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. पीडितेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जगनविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी पादरीने केलेल्या लैंगिक छळाची ही घटना गंभीर असल्याचे सांगितले आहे. सध्या पादरी जगनचा शोध सुरु आहे.