तेरा मेरा क्या रिश्ता?

    18-Oct-2023   
Total Views |
Pope Francis Warns of Humanitarian Catastrophe in Gaza

जिथे ‘इस्लाम खतरे मे हैं’ किंवा ‘इस्लाम के शान मे’ असे शब्द आले, तिथे जगभरातले मुस्लीम एकत्र येतात, हा अनुभव आहेच. इस्रायल-पॅलेस्टाईन संदर्भातही तेच. ‘हमास’सारख्या दहशतवाद्यांना कोणता आला आहे धर्म? असे म्हणावे तर ते ‘हमास’चे दहशतवादी ज्या पॅलेस्टाईनचे नाव घेत आले, त्या पॅलेस्टाईनसाठी जगभरातले त्यांचे कौमवाले ‘तेरा मेरा क्या रिश्ता ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणत त्यांच्या-त्यांच्या देशात आंदोलन करत आहेत. मात्र, एकही मुस्लीम देश गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांसाठी त्यांच्या सीमा खुली करत नाही.

इजिप्तनंतर जॉर्डननेही शरणार्थींसाठी सीमा उघडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनचे समर्थन करत काही लोक तर चक्क ‘हमास’चेही समर्थन करू लागले. उत्तर प्रदेशात असे काही दिसताच, योगी सरकारने ‘हमास’ समर्थकांविरोधात आघाडी उघडली. पाश्चात्य देशांनीही दहशतवादाचे समर्थन करणार्‍यांविरोधात कडक पाऊल उचलणार, असे सूतोवाच केले. अमेरिकेतल्या ट्रम्प यांनी सत्तेत आल्यावर ‘हमास’ला समर्थन करणार्‍यांना देशात प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले.

या पार्श्वभूमीवर रोमन कॅथलिक चर्चच्या पोप फ्रान्सिस यांनी गाझा पट्टीत राहणार्‍यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे म्हणे. इस्रायलचे १ हजार, ३०० नागरिकांचा जो क्रूर नरसंहार झाला, त्याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी काळजी दाखवली का, असा प्रश्न इस्रायलने केला आहे, असो. इस्रायल आणि पॅलेस्टाईन तसेच ‘हमास’बाबत पाश्चिमात्य देशांनी आणि भारतानेही ठोस भूमिका घेतली. ‘हमास’च्या दहशतवादाचा निषेध, विरोध करत इस्रायलला समर्थन दिले. दुसरीकडे सौदी अरेबिया, पाकिस्तान, इजिप्त, जॉर्डन वगैरे देशांनी थेट ‘हमास’ला समर्थन जरी दिले नाही, तरीसुद्धा गाझा पट्टीबाबत त्यांना चिंता वाटते.

इराणसारख्या मुस्लीम देशाने ‘हमास’ला समर्थन दिले. पॅलेस्टाईनचे समर्थन करणारा इराणसारखा देश आणि जगभरातले कट्टरतावादी जेव्हा म्हणतात की, गाझा पॅलेस्टाईनचाच भूभाग आहे. इस्रायल त्यावर अतिक्रमण करत असतो. तेव्हा इराणमधला पारशी गेला कुठे, याचा विचारही ते करत नाहीत. नव्हे पारशी समाजाचा देश म्हणजे पूर्वाश्रमीचा इराण. त्या इराणमध्ये तिथे आता औषधालाही पारशी संस्कृती नाही. कधीकाळी तिथे पारशी राहत होते, याच्या पुसटशीही खुणा तिथे आता नाहीत.

या अनुषंगाने इस्रालयवर ‘हमास’चा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर जे काही घडले, त्यानंतर जगभरात समाजमाध्यमांवर काय प्रतिक्रिया उमटल्या? त्या पाहिल्या तर वाटते की, खरेच माणसांमध्येही हिंस्र आणि विवेकहीन राक्षस जीवंत आहेत. ‘हमास’च्या दहशतवाद्यांचा इस्रायलवरचा हल्ला पाहून समाजमाध्यमांवर अनेकांनी आनंद व्यक्त केला. इस्रायलचे नामोनिशाण मिटणार, यावर एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. ‘हमास’ने बंधक बनवून परेड केलेली, ती नग्न मृत मुलगी, शीर कापलेले ते ४० बालक आणि बलात्कार करून मारून टाकलेल्या त्या बालिका, त्या वृद्ध स्त्रिया यांबाबत कुणीही चकार शब्दाने काही बोलले नाही. ना त्यांना खेद वाटला, ना खंत. जणू असे अत्याचार करणे, हे अतिशय पुण्य कर्म होते आणि ते ‘हमास’वाल्यांनी केले, अशीच त्यांची भूमिका. पॅलेस्टाईनवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर मात्र हेच लोक मानवतावादावर बोलू लागले. तशा रिल्स पोस्ट करू लागले.

पॅलेस्टाईनचे लोक कसे धर्माभिमानी आहेत आणि धर्मासाठी मरण्यासाठीच ते जन्माला येतात. त्यांच्या माता कशा धन्य आहेत. तेच खरे मुस्लीम आहेत. एवढेच नाही तर रामंदिराला तोडून पुन्हा बाबरी उभारण्याची विखारी गरळ ओकणारे रिल्सही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या रिल्स, हे संदेश लहानवयातील मुलांना धर्माच्या नावाने मृत्यूसाठी, हिंसेसाठी, युद्धासाठी उद्युक्त करतात. त्यातली एक सर्वाधिक लाईक असलेल्या व्हिडिओमध्ये एक पॅलेस्टाईन युवक तोंडाला मास्क लावून इस्रायलविरोधात हिंसक कृत्य करण्याच्या तयारीत असतो.

तेव्हा त्याची आई येते आणि त्याचा मास्क काढते. ‘तू चांगले कृत्य करतोस तोंड लपवू नकोस,’ असे ती सांगते. मग त्यावर संदेश लिहून येतो की, ’धन्य आहे ती पॅलेस्टाईनची माता, जी मुलाला धर्मासाठी, मरण्यासाठी तयार करते.’ खरे तर हल्ल्यात मरणारे, जखमी नागरिक जर निष्पाप असतील, तर मग ते इस्रायलचे असू देत की पॅलेस्टाईनचे तो मानवतेला कलंक आहे, अशा या हिंसेचे समर्थन करणारे, त्या-या देशाचेच नव्हे, तर मानवतेचेही गुन्हेगार आहेत. या आयामात मग ‘तेरा मेरा क्या रिश्ता?’ या गोष्टीला स्थान नाहीच!

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.