‘हमास’ आणि गाझा पट्टीचा अंत?

    15-Oct-2023
Total Views |
Israeli troops have been massing troops along the Gaza border

‘हमास’ पूर्णपणे संपेल असे वाटत नाही. दहशतवादी संघटना नवीन नावे धारण करत पुनःपुन्हा निर्माण होत जातात. ‘हमास’ची एक फळी कदाचित यात नष्ट होऊ शकली, तरी पूर्णपणे हा विचार संपवणे शक्य नाही. मात्र, गाझा पट्टीचा नकाशा बदलू शकतो.

गेल्या आठवड्यात योम किप्पुर युद्धाच्या तारखेच्या आसपास (योम किप्पुरची तारीख ५/६ ऑक्टोबर) म्हणजेच शनिवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘हमास’ने अगदी अकल्पितपणे इस्रायलवर हल्ला चढवला. इस्रायलवर हजारो रॉकेट्सद्वारे हा हल्ला चढवला गेला. तसेच ‘हिजबुल्ला’ या लेबेनॉनमधील दहशतवादी संघटनेनेसुद्धा इस्रायलवर रविवारी उत्तर भागात तीन ठिकाणी डझनभर रॉकेट हल्ले आणि बॉम्ब हल्ले केले. ‘हिजबुल्ला’ने म्हटलेले आहे की, ‘आम्ही पॅलेस्टिनींच्या बरोबर आहोत, हे दाखवण्यासाठी हे हल्ले केलेले आहेत.‘ काही महिन्यांपूर्वी इस्रायलच्या ताब्यात असणार्‍या गोलन हाईट्स येथे ‘हिजबुल्ला’ने काही महिन्यांपूर्वी छावण्या उभारल्या होत्या, त्यामुळे या दोघांमध्ये तणाव होताच.

‘हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये सिमचॅट तोराह हा सण साजरा होत असताना, हा हल्ला केला आहे. १९६७ मध्ये योम किप्पुर युद्धाच्या वेळीची आठवण, यामुळे जागी झाली. ‘हमास’चा हल्ला अतिशय भयंकर होता. सुरुवातीच्या दोन दिवसांतच ६००च्या वर इस्रायली नागरिक ठार झाले. ’हमास’ने अश्कोलोन या ठिकाणचे एक रुग्णालय उद्ध्वस्त केले. इस्रायलने दुसर्‍याच दिवशी रविवारी पहाटे गाझावर हल्ला चढवला आणि ‘हमास’च्या कार्यालयाची इमारत उद्ध्वस्त केली. गाझा पट्टीतील राफाह या शहरात इजिप्तच्या सीमेजवळसुद्धा इस्रायलने हल्ले केले आहेत.

‘हमास’ने अत्यंत भयंकर अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अनेक लहान मुलांची हत्या, मुली-स्त्रियांवर अत्याचार केले. गाझा पट्टीत अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस म्हणून ठेवलेले आहे. यामुळे या युद्धाची क्रूरता जगासमोर आली. सामान्य नागरिकांना असे ओलीस धरणे, ही दहशतवादी कृती आहे.

‘हमास’चा इतिहास

‘हमास’ला इस्रायल नष्ट करायचा आहे आणि तिथे पॅलेस्टाईनची निर्मिती करायची आहे. प्रामुख्याने सुन्नी इस्लामी लोकांची संघटना आहे. त्यांचे आत्मघातकी दहशतवादी मोठ्या प्रमाणात इस्रायलमध्ये विध्वंस घडवत आहेत. ‘पहिला इंतीफदा’ म्हणजेच ‘इस्रायलपासून स्वतंत्र होण्यासाठी पॅलेस्टिनी लोकांचे प्रयत्न.‘ इस्रायलविरोधातील पॅलेस्टिनी जनतेने उठाव केला, तेव्हापासून ‘हमास’चे अस्तित्व जाणवते. याची स्थापना १९८७ मध्ये झाली. हा राजकीय लढा आहे. ‘मुस्लीम ब्रदरहूड’पासून याची निर्मिती झाली.

अहमद यासिन आणि अब्देल अझीझ अल रँतिसी यांनी १९८७ मध्ये ‘हमास’ची स्थापना केली. इजिप्तमधील ‘मुस्लीम ब्रदरहूड’चा भाग म्हणून ही स्थापना केली गेली. त्यांना ‘हमास’ला इस्रायलपासून पेलेस्टाईन मुक्त करायचा आहे. पश्चिम किनारपट्टी आणि गाझा यात इस्लामिक राज्य स्थापन करायचे आहे. इस्रायलने जर १९६७ पूर्वीची सीमा मान्य केली, तरच आम्हाला ते मान्य आहे, अशी भूमिका ‘हमास’ची आहे. यासर अराफत यांच्या फताहशी या ‘हमास’चे वैर आहे. साधारणपणे १९९०च्या आसपास फताहने सशस्त्र संघर्षाचा मार्ग सोडला. नंतर २००४ मध्ये अराफत यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या पोकळीत ‘हमास’ आणखीन मजबूत झाली. त्याचप्रमाणे २००७ मध्ये ‘फताह’सह अंतर्गत संघर्ष होऊन ‘हमास’ने गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवले होते. गाझामध्ये सध्या २० लाख लोकांचे वास्तव्य आहे. गाझा आणि वेस्ट बँक मिळून पॅलेस्टाईन मानले जाते. वेस्ट बँकमध्ये असणारे रामल्लाह, ही पॅलेस्टाईनची राजधानी आहे. महमूद अब्बास हे त्याचे अध्यक्ष आहेत.

‘हमास’ने हा हल्ला चढवून २०२०ला झालेल्या अब्राहमिक अकॉर्डला पण धक्का लावण्याचे काम केले आहे. या अब्राहमिक अकॉर्डप्रमाणे युएई आणि बहारीन या देशांनी इस्रायलमध्ये आपले दूतावास सुरू केले. तसेच पर्यटन, व्यापार आणि सुरक्षा या क्षेत्रांत सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली. यामुळे ‘हमास’ने त्या सहकार्याला धक्का लावला आहे. इस्लामिक राष्ट्रांनी पेलेस्टाईनला पाठिंबा दिला पाहिजे आणि इस्रायलशी कोणतेही सहकार्य करू नये, असे ‘हमास’ला वाटते.

महंमद दैफ हा ‘हमास’च्या लष्करी विभागाचा इज्ज अल दिन अल कासीम ब्रिग्रेडचा प्रमुख आहे. त्याने म्हटले आहे की, १६ वर्षांपासून गाझावर जे इस्रायलचे नियंत्रण आहे, त्याविरोधात ‘ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म’ राबवले जात आहे. ‘हमास‘ची स्थापना १९८७ला ‘पहिल्या इंतीफदा’ नंतर झाली. ‘इंतीफदा’ म्हणजे ‘इस्रायलविरोधातील पॅलेस्टाईनच्या लोकांचा उठाव.’ त्यावेळी हा २० वर्षांचा असावा. त्याला इस्रायलने पकडले होते. त्याचे प्रशिक्षण याह्या अय्याश (टोपणनाव इंजिनिअर) या बॉम्ब बनवणार्‍या व्यक्तीच्या हाताखाली झालेले होते. याला १९९६ मध्ये इस्रायलने ठार मारलेले होते. तो कट्टर इस्रायल विरोधक आहे.

काही अभ्यासकांच्या मते, हे युद्ध म्हणजे ‘तिसरा इंतीफदा’ म्हणता येईल. इस्रायलच्या गाझा आणि वेस्ट बँक यातील अस्तित्वाच्या विरोधात होणारे उठाव म्हणजेच ‘इंतीफदा’ होत. पहिला १९८७ ते १९९३ आणि दुसरा २००० ते २००५ पर्यंत चालला. पॅलेस्टिनी युवक इस्रायलच्या विरोधात, हा उठाव करत असल्याचा इतिहास आहे. ‘दुसर्‍या इंतीफदा’नंतर सुद्धा ‘हमास,’ ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ यांच्या कारवाया चालूच आहेत.

पॅलेस्टाईनच्या ‘मुस्लीम ब्रदरहूड’मधूनच या अनेक संघटना स्थापन झाल्या. ‘फताह’पेक्षा ‘हमास’ने नेहमीच जास्त आक्रमक भूमिका घेतली. ‘हमास’च्या इज्ज अल दिन अल कासीम बिग्रेडने सातत्याने इस्रायलवर १९९० पासून आत्मघातकी हल्ले चालवलेले होते. बॉम्ब हल्ले, इस्रायली नागरिकांना लक्ष्य करणे, ओलीस धरणे, शस्त्रास्त्र वापरून हल्ले हे नित्याचे आहेच. ‘हमास’ने पहिला आत्मघातकी दहशतवादी हल्ला एप्रिल १९९३ला वेस्ट बँकच्या मेहोला जंक्शन येथे चढवला होता.

आता तर २००६ मध्ये ‘हमास’ने पॅलेस्टाईनमध्ये निवडणूकांमध्ये काही जागा जिंकल्या. तेथील कायदेमंडळात त्यांचा प्रभाव ‘फताह’पेक्षा वाढवला, तरीही त्यांनी दहशतवादी कारवाया चालूच ठेवल्या. अमेरिकेने ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. जून २००८ मध्ये ‘हमास’ आणि इस्रायल यांच्यात करार झाल्याप्रमाणे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली. पण, ‘हमास’च्या दहशतवादी कारवाया चालू होत्या. मग २००८च्या डिसेंबरमध्ये इस्रायलने लष्करी कारवाई करत गाझा पट्टीमधील ‘हमास’ला धडा शिकवला. दि. १८ जानेवारी २००९ला इस्रायलने एकतर्फी शस्त्रबंदी घोषित केली.

‘हमास’ आणि ‘फताह’ यांनी २०११ मध्ये अंतिम सरकार स्थापन केले. एप्रिल २०१४ ला ‘हमास’ आणि ‘फताह’ यांनी एकत्रितपणे प्रभाव चालू ठेवला. एकूणच आतापर्यंत ‘हमास’ने कधीही शस्त्रास्त्र वापरावर बंदी घातलेली नाही. या सगळ्या इतिहासाला अभ्यासले, तर ‘हमास’ची ही आताची कारवाई इस्रायलसह असणार्‍या संबंधांना कायमचे बिघडवणारी ठरणार, यात शंका नाही. ज्या पद्धतीने बेसावध असणार्‍या इस्रायली नागरिकांवर हल्ले करत, त्यांचे अपहरण करत युद्धाला सुरुवात केली गेली, ते मानवतेला काळिमा फासणारे आहे. इस्रायली नागरिकांना युद्ध नवे नाहे. ज्यू असण्याची किंमत त्यांनी इतिहासात मोजलेली आहे आणि त्यासाठी ते सदैव सावधसुद्धा असतात. एकेक जीव त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. ‘हमास’ने नागरी वस्त्या, शाळा, दवाखानेसुद्धा सोडलेले नाहीत. हे केवळ युद्ध नाही. यात सैन्याने सैनिकांवर आक्रमण केलेले नाही. यात क्रौर्य आहे. सामान्य नागरिकांचा जाणीवपूर्वक छळ आणि हत्या केली गेली आहे.

इस्रायलचा आजवरचा इतिहास पाहता, त्यांनी प्रतिशोध घेतलेला आहे. आज नाही तर काही महिन्यांनी, काही वर्षांनी हा प्रतिशोध पूर्ण केल्याशिवाय ते राहणार नाहीत. त्यांच्या राष्ट्र बांधणीसाठी त्यांनी कायमच वास्तवतावादी धोरण स्वीकारले आहे. दहशतवाद्यांना थेट ठार करणे, हे त्यांचे धोरण आहे. ‘हमास’ पूर्णपणे संपेल, असे वाटत नाही. दहशतवादी संघटना नवीन नावे धारण करत पुन्हा-पुन्हा निर्माण होत जातात. ‘हमास’ची एक फळी कदाचित यात नष्ट होऊ शकली, तरी पूर्णपणे हा विचार संपवणे शक्य नाही. मात्र, गाझा पट्टीचा नकाशा बदलू शकतो. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसना गाझा काबीज करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत. गाझावर लष्करी, राजकीय नियंत्रण हे आता इस्रायलचे ध्येय आहे.

या युद्धात कदाचित काही काळाने युद्धबंदी घोषित करण्यासाठी इस्रायल आणि ‘हमास’वर जागतिक दबाव वाढू शकतो. कदाचित इस्रायलला पूर्ण गाझा पट्टी एका दमात, एका युद्धात काबीज करता येणार नाही. पण, टप्प्याटप्प्याने आता गाझा पट्टीवर इस्रायली नियंत्रण मिळताना दिसू शकेल. ’इस्रायलच्या रक्तरंजित इतिहासातून आपण शिकलो आहोत की, ज्यूंच्या हत्येमुळे जे रक्त सांडते, ते थांबते हिंसेला पसरवूनच आणि सगळ्या जगाला हिंसेच्या संकटात ढकलूनच. दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचून त्यांना खंबीरपणे प्रत्युत्तर देण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही,’ हे इस्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचे शब्द आजही महत्त्वाचे ठरतात.

रुपाली कुळकर्णी-भुसारी
(लेखिका ‘एकता’ मासिकाच्या संपादक आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

(Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नाही. राज्यातून हिंसाचाराच्या बातम्या वेळोवेळी येत राहतात. आता मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. यामुळे इंफाळसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर विष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121