पाक पीठासाठी तडफडतोय!

    12-Jan-2023   
Total Views |
Food Crisis in Pakistan


आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानमध्ये धान्याची टंचाई जाणवत आहे. दोन वेळच्या भाकरीसाठी पाकिस्तानी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून अनुदानित धान्याच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागत आहे. पीठासाठी देशातील अनेक ठिकाणी हिंसाचार आणि चेंगराचेंगरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सिंध प्रांतातील हुतात्मा बेनझीराबाद जिल्ह्यातील सकरंद शहरात एका पीठाच्या गिरणीबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिलांचा आणि मीरपूर खास जिल्ह्यात पीठाने भरलेली पोती घेऊन जाणार्‍या अन्न विभागाच्या ट्रकजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत एका मजुराचा जीव गेला.


नोकरीला आणि कामावर जाण्याऐवजी लोकांना पीठासाठी रांग लावावी लागत आहे. पाकिस्तानातील पंजाब, खैबर पख्तुनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लोकं पीठाच्या गिरण्यांबाहेर गर्दी करत असून पीठाची पोती घेऊन जाणार्‍या ट्रकच्या मागे धावत खुलेआम ट्रकमधून पीठाच्या पिशव्या लुटत आहेत. कराचीमध्ये गव्हाचे पीठ तब्बल १४० ते १६० रुपये किलो, इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये दहा किलो पीठ १ हजार, ५०० रुपये आणि २० किलो पीठ तब्बल २ हजार, ८०० रुपयांना विकले जात आहे. पंजाबमधील गिरणी मालक १६० रुपये किलोने पीठ विकत असून खैबर पख्तुनख्वामध्ये २० किलो पीठाच्या पिशवीची किंमत ३ हजार, १०० रुपयांवर, तर बलुचिस्तानमध्ये पीठाची किंमत २०० रुपये किलोवर पोहोचली आहे.

पाक सरकारकडून सवलतीच्या दरात पीठ वितरित करण्याचा प्रयत्न असला तरीही तो सपशेल अपयशी ठरत आहे. कारण, लोकं पीठ वाहून नेणारे ट्रकही लुटत आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, ट्रक आणि पीठाच्या गिरण्यांचे संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी सशस्त्र पोलिसांना तैनात करण्यात आले आहेत. क्वेटा, मुलतान, झांग, सियालकोट, मीरपूर खास, हैदराबादसह वजिराबादमध्ये अशीच परिस्थिती आहे. मागील काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानात पीठाच्या किमतीत जवळपास दुपटीने आणि तिपटीने वाढ झाली आहे. पीठाच्या तुटवड्यासाठी नागरिक आणि प्रांतीय सरकारेदेखील पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सरकारला दोष देत आहेत. मुळात हे पीठसंकट काही अचानक आलेले नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात गव्हाचे उत्पादन घटले असून, गहू आयात करण्याची नामुष्की पाक सरकारवर आली आहे. नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्ष’ या संकटासाठी माजी पंतप्रधान इमरान खान यांना दोष देत आहेत. त्यामुळे एकमेकांना दोष देण्यात येथील नेते धन्यता मानत असल्याने नेमके हे संकट कोण दूर करणार, असा सवाल पाकिस्तानी जनतेला पडला आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या परकीय चलनात मोठी घट होत असून, सध्या फक्त ६.७ अब्ज डॉलर इतकेच परकीय शिल्लक राहिले आहे. बाहेरून येणार्‍या मालाचे पैसे देण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ एक आठवड्याचे परकीय चलन उरल्याने पाकिस्तान दिवाळखोरस होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष बाब म्हणजे, भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे पाकिस्तानच्या राखीव निधीपेक्षा २२ पट जास्त आणि मुकेश अंबानी यांच्याकडे १५ पट जास्त मालमत्ता आहे. पाकला चीननेही आर्थिक मदत देण्यास नकार दिला असून, सौदी अरेबिया आणि इतर काही देशांनी आधीच कर्ज दिले असले तरीही त्याचे हप्ते भरण्यासाठी पाकिस्तानकडे पैसे नाहीत.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान आणि युएईच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत मदत मागितली, मात्र त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पाकमधील नेत्यांच्या घरी कसलाही तुटवडा नाही. परंतु, जनतेवर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. सध्याच्या या बकाल अवस्थेला पाक सरकार, तेथील राजकीय पक्ष, नेते आणि लष्करच जबाबदार आहे. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून पायाभूत सुविधा आणि लोककल्याणाऐवजी शस्त्रे बनवणे, दहशतवाद आणि लष्करावर पैसा खर्च झाला.पाक सरकार शिक्षणाच्या सहापट जास्त पैसा सैन्यावर खर्च करतो. पाकिस्तानात उद्योगपती नाही, तर लष्कर तेथे कारखाने चालवते. सर्व पैसा आणि बहुतांश जमीन पाक नेत्यांकडे किंवा लष्कराकडे असल्याने जनता नेहमीच वार्‍यावर सोडली जाते. पाक नेते आणि लष्कर यामुळे पाक आता आतून पुरता पोखरत चालला आहे, एवढं मात्र नक्की...!



पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121