‘एमएमआरडीए’च्या ठाणे कार्यालयात लाचखोरी

‘डेप्युटी प्लॅनर’ला लाच घेताना रंगेहाथ अटक

    03-Sep-2022
Total Views | 47

MMRDA
 
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या नगरविकास खात्याची जबाबदारी आहे, त्याअंतर्गत येणार्‍या ‘एमएमआरडीए’च्या ठाणे कार्यालयात लाचखोरी सुरू असल्याचे समोर आले आहे. ऐन गणेशोत्सव काळात या कार्यालयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ‘डेप्युटी प्लॅनर’ शिवराज प्रकाश पवार याला लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला लाचलुचपत अधिकार्‍यांनी पडताळणी केली असता पवार खुलेआम लाच मागत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर कार्यालयातच पंचासमक्ष लाच घेताना त्याला अटक करण्यात आली.
 
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्राधिकारी ऑथोरिटी असून जिल्ह्यात कोणतेही विकासकामे करायचे असेल किंवा बांधकाम करायचे असेल, तर ‘एमएमआरडीए’कडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यामुळे अशी ना हरकत प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी हजारो अर्ज या कार्यालयात येत असतात. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय विकासकामे होत असतानाच गेल्या काही वर्षात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याच अनुषंगाने ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालय ठाणे येथे दररोज शेकडो अर्ज येत असतात. मात्र यावर उत्तर देताना अधिकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप करण्यात येत होते. दरम्यान, शिवराज पवार याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने या कार्यालयाची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
 
दरम्यान, यापूर्वीही या कार्यालयातील कामचुकार अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून होत असल्याचे उघड झाले होते. गेल्या वर्षी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असताना कामचुकारपणा करणार्‍या महापालिकेच्या चार अभियंत्यांना महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. त्यावेळी इतर यंत्रणा म्हणजेच सार्वजनिक बांधकाम खाते, ‘एमएसआरडीसी’ आणि ‘एमएमआरडीए’च्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, संबंधित अधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई झालेली नव्हती.
 
सखोल चौकशी झाल्यास बडे मासे गळाला?
या कार्यालयाची सखोल चौकशी झाल्यास गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या लाचखोरीवर प्रकाश पडण्याची शक्यता असून यात बडे अधिकारीही सहभागी असल्याचे उघड होऊ शकते. त्यामुळे या कार्यालयातील लाचखोर अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121