टास्कच्या बहाण्याने सायबरचोरांनी लुटले

- कोपरखैरणेत महिलेची साडेअकरा लाखांची फसवणूक

    17-May-2025
Total Views |
 
Woman cheated of Rs 11.5 lakh in Koparkhairane
 
नवी मुंबई: (Woman cheated of Rs 11.5 lakh in Koparkhairane) कोपरखैरणेत राहणार्‍या एका महिलेला सायबर गुन्हेगारांच्या टोळीने घरबसल्या ‘व्हिडिओ लाईक करून पैसे कमवा’ सांगत काम देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 11 लाख, 44 हजार लुटल्याचे उघडकीस आले आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणातील सायबरचोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
 
फसवणूक झालेली 47 वर्षीय महिला कोपरखैरणे सेक्टर 2-ए मध्ये राहात असून दि. 15 एप्रिल रोजी सकाळी महिलेच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एका अनोळखी व्यक्तीने ‘टेलेग्राम’द्वारे घरबसल्या पैसे कमवण्यासंदर्भातील मेसेज पाठवला. तसेच व्हिडिओ लाईक करून दीड ते दोन हजार दिवसाला कमाविण्याचे प्रलोभन दाखवून त्यांना एक लिंक पाठवून दिली.
 
त्यानुसार महिलेने सायबर टोळीने दिलेल्या वेबसाईटवर जाऊन व्हिडिओ लाईक केले असता, त्यांना सायबरचोरांनी 250 रुपये पाठवून देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला टास्क खेळण्यास सांगून प्रत्येक टास्कसाठी त्यांच्याकडून वेगवेगळी रक्कम घेऊन त्याचा परतावादेखील दिला.
 
अशा पद्धतीने सायबर गुन्हेगारांच्या टोळीने या महिलेला टास्क देऊन वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख, 44 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने प्रथम ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर व नंतर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.