ठाणे महापालिकेचा पर्यावरण दिनी संकल्प, वर्षभरात दोन लाख झाडे लावणार

उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचा औपचारिक शुभारंभ पर्यावरण दिनी होणार

    04-Jun-2025
Total Views |
on the occasion of world environment day thane Municipal Corporation will plant trees

ठाणे  : ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'हरित ठाणे अभियाना'त वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरूवार, ०५ जून रोजी होणार आहे.

ठाण्यास हरित, पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त बनविण्याच्या दृष्टीने 'उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान' एक ठोस पाऊल ठरणार आहे. त्यामुळे या अभियानात नागरिकांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. गतवर्षी महापालिकेने या अभियानात सव्वा लाख झाडे लावली आहेत.

या वृक्षारोपण अभियानात, पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ, बांबू आदी देशी वृक्षांचा समावेश आहे.

कालबद्ध कार्यक्रम


ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने आतापर्यंत दोन लाख पाच हजार झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी, १८ हजार ५०० झाडे लावण्यात आली आहेत. तर, उर्वरित एक लाख ८६ हजार ५०० झाडे लावण्याचे टप्प्याटप्प्याने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

वृक्षारोपणात सगळ्यांचा सहभाग


या अभियानात, ठाण्यात एकूण दोन लाख पाच हजार झाडे लावली जातील. त्यात, मियावाकी पद्धतीने ३० हजार झाडे, विविध विकासकांमार्फत पाच हजार झाडे, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुले आणि शासकीय कार्यालयांच्या सहभागातून पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, शेवग्याची १० हजार लावण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच हजार झाडे लावली आहेत.

आतकोली येथे बांबूची लागवड


त्याचबरोबर, महापालिकेतर्फे, आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातींच्या पाच हजार विशेष झाडे लावली जाणार आहेत.

वन खात्याच्या जागेत झाडे लावणार


प्रादेशिक वन विभागाची जागा व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे महापालिकेतर्फे एकूण एक लाख ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. त्यात, स्थानिक प्रजातीची ८० हजार झाडे, तर, बांबू प्रजातीची ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

कोलशेत येते मियावाकी वन


कोलशेत एअर फोर्स स्टेशन परिसरात मियावाकी पद्धतीने २०,००० झाडे लावण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
ही झाडे लावण्यासाठी खड्डे खोदणे, खत व माती भराव, सिंचन व्यवस्थापन ही पूर्व तयारीची कामे सध्या प्रगतीपथावर असून प्रत्यक्ष काम सुरू असल्याची माहिती वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांनी दिली.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत समन्वय साधण्यात येत आहे. या अभियानात, नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहसंकुले, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संरक्षण क्षेत्रातील विविध संस्था यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येत असल्याचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी सांगितले.

गतवर्षी सव्वा लाख झाडे लावली


गेल्या वर्षी या अभियानात ठाणे महापालिकेने एकूण एक लाख २७ हजार झाडे लावली. त्यापैकी, ठाण्यातील सर्व प्रभागांमध्ये ४९ हजार २४४ झाडे लावण्यात आली. नागला बंदर येथे १५०० झाडे मियावाकी पद्धतीने लावण्यात आली. तसेच, महापालिका आणि खाजगी शाळा, महाविद्यालये येथे ५४०० झाडे लावण्यात आली. ठाण्यातील मेट्रो मार्गाखाली तसेच इतरत्र ११ हजार बांबूची झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ६० हजार झाडे लावण्यात आली. त्यात ४० हजार पारंपरिक पद्धतीने तर, २० हजार झाडे मियावाकी पद्धतीने लावण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक केदार पाटील यांनी दिली.