शिंतोडेबाज ‘आप’ला दणका

    28-Sep-2022   
Total Views |

delhi
 
 
 
अरविंद केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे उपराज्यपाल यांच्यातील बेबनाव तसा सर्वश्रुत. आपले अपयश झाकण्यासाठी अनेकदा केजरीवालांनी दिल्लीचे उपराज्यपाल काम करू देत नसल्याचा गवगवा केला आणि आताही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे.
 
 
आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यावर थेट भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप केले. खादी ग्रामोद्योग (केव्हीआयसी)चे अध्यक्ष या नात्याने लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांनी त्यांची मुलगी शिवांगी सक्सेना यांना मुंबईत खादी लाउंज डिझाईन करण्यासाठी 80 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचा आरोप ‘आप’ नेत्यांनी केला. तसेच सक्सेना यांनी ‘केव्हीआयसी’चे अध्यक्ष असताना नोटाबंदीदरम्यान 1400 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासह अनेक घोटाळे केल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला होता.
 
 
‘आप’ नेत्यांनी उपराज्यपालांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याची मागणीदेखील केली. ‘आप’चे आमदार दुर्गेश पाठक यांनी तर नायब उपराज्यपालांना ’भ्रष्ट’ म्हटले होते आणि त्यांच्याविरुद्ध ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ चौकशीची मागणी केली होती. याबाबत आप नेत्यांनी निदर्शनेसुद्धा केली. परंतु, बेछूट आरोप करणार्‍या ‘आप’च्या नेत्यांना आता अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने लगाम घातला आहे. न्यायालयाने ‘आप’च्या नेत्यांना चांगलाच दणका दिला असून सक्सेना यांना दिलासा दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये ’आप’च्या नेत्यांना उपराज्यपालांविरोधातील विरोधातील असभ्य, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे.
 
 
केजरीवालांचा आम आदमी पक्ष विरुद्ध दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातील लढतीत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी यासंदर्भातील अंतरिम आदेश जारी केले. आधीच दिल्लीचे आरोग्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली ‘ईडी’च्या कोठडीत आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून त्यांच्यामागेही ‘ईडी’ आणि ’सीबीआय’चा ससेमिरा लागलेला आहे. त्यामुळे स्वतःचे मंत्रीच इतके भ्रष्टाचाराने बरबटलेले असताना उपराज्यपालांवर शिंतोडे उडवणे आम आदमी पक्षाला न शोभणारे. जनतेशी फसवणूक करून बेभान सत्ता राबविणार्‍या आपला न्यायालयाने दिलेला हा दणका त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.
 
 
वाढता वाढता वाढे...!
 
 
'वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे ठाकरे गट हळूहळू खालसा होत चालला असून काही दिवसांत फक्त ठाकरे पिता-पुत्र राहतात की काय, अशी परिस्थिती. कारण, आधी आमदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्राबाहेरील सेना नेत्यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता तर नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंना जोरदार दणका बसला. बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि त्यांची सावली समजली जाणारे चंपासिंह थापा यांनीदेखील उद्धव ठाकरेंना रामराम करत शिंदे गटाची वाट धरली. थापा यांच्यासोबत ‘मातोश्री’वर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजेदेखील शिंदे गटात दाखल झाले.
 
 
चंपासिंह थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी सुरुवातीला छोटी-मोठी कामे करायला सुरुवात केली. दरम्यान, भांडुपचे नगरसेवक के. टी. थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना थेट ‘मातोश्री’वर प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचे विश्वासू साहाय्य्क बनले. बाळासाहेब ठाकरेंचे जेवण, औषधांच्या वेळा यांसारख्या दररोजच्या गोष्टींवर थापा लक्ष ठेवून असायचा. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापानेच बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली. ‘मातोश्री’वर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीशेजारीच थापाचीही छोटीशी खोली होती. थापाचे कुटुंब नेपाळमध्ये तर दोन मुलं दुबईमध्ये असतात. मुंबईसह महाराष्ट्रात झालेली शिवसेनेची वाढ, भुजबळ, राणे यांनी केलेले बंड तसेच राज ठाकरेंनी सोडलेली साथ असो, या सगळ्या काळामध्ये थापा बाळासाहेबांच्या कायमच जवळ राहिला.
 
 
परंतु, बाळासाहेबांशी इतका एकनिष्ठ असणारा थापा आता शिंदे गटात गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु, हे आज ना उद्या होणारच होते. शिवसेनेसाठी इतके वर्ष झटणार्‍या शिंदेंना उद्धव ठाकरे योग्य वागणूक देत नसतील, तर थापाला काय म्हणून वागणूक मिळत असेल? बरं थापा शिंदे गटात गेले, तर त्यांना काय म्हणून सेना दूषण देणार. कारण त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नाही. त्यांच्यावर ‘ईडी’च्या भीतीने शिंदे गटात प्रवेश केला असे म्हणायलादेखील जागा नाही. शिंदे गटात जाऊन थापा यांना काही फायदाही नाही. परंतु, संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांनी ज्यांंच्याविरोधात संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर थापा तरी काय करणार?
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.