शिक्षणातून समरसता : वर्षा हांडे-यादव

    27-Sep-2022   
Total Views |
वर्षा हांडे यादव
 
 
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात फार कमी वयात स्वत:च्या कार्याचा ठसा उमटवणार्या वर्षा हांडे-यादव. त्यांच्या नि:स्वार्थी जीवनकार्याचा मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
वैभव विद्यालयाच्या विश्वस्त, साईनाथ शिक्षण सेवाश्रमाच्या विश्वस्त, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सदस्य-कार्यकर्ता, वीर हनुमान मंदिराच्या विश्वस्त असलेल्या वर्षा हांडे-यादव. ठाणे आणि ईशान्य मुंबई परिसरात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या वर्षा. एम.ए, बी.एड् केलेल्या वर्षा यांचे जगणे म्हणजे सामाजिक समरसतेचा चालताबोलता आलेखच म्हणावा लागेल. समाजाच्या स्तरावर असलेल्या बांधवांना शिक्षणाचे अमृत प्राप्त व्हावे, म्हणून त्यांनी केलेला संघर्ष हा महत्त्वाचा आहे. वैभव विद्यालय शाळेत शिकणार्या बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक हे कचरावेचक. मुलांच्या शिक्षणाचा सगळा खर्च जर शाळेने केला, तर पालक मुलांना शाळेत पाठवतील, यासाठी या शाळेत मुलांना कपडे, शालेय साहित्य आणि घरापासून शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी वाहनव्यवस्थाही शाळेतर्फेच केली जाते. हे लिहिताना सहज लिहिले गेले, तरी शेकडो मुलांच्या शिक्षणासाठीचा निधी उभा करणे, ही कठीण गोष्ट आहे. ही धुरा वर्षा यांनी सांभाळली.
 
 
 
 
शाळेचे नि:स्वार्थी कार्य आणि आर्थिक स्तरावरची पारदर्शकता तसेच वर्षा यांची जिद्द आणि तळमळ पाहून अनेक लोक शाळेशी जोडले गेले. वर्षा यांना दोन अपत्ये. त्यांची स्वत:ची मुलगीही वैभव विद्यालयातच शिकते. कारण, काय तर या शाळेत शिकणार्या मुलांच्या पालकांना विश्वास वाटावा की, शाळा चांगली आहे म्हणून तर मॅडम स्वत:च्या मुलीला पण याच शाळेत शिकवतात. सुरुवातीला मुलांच्या शिक्षणासाठीच काम करणार्या वर्षा नंतर मुलांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार मिळायलाच हवेत, यासाठी काम करू लागल्या. त्याचीही कथाच आहे. एक मुलगी दहावी इयत्तेत शिकत होती. मात्र, तिच्या पालकांनी तिचे शिक्षण बंद केले. वर्षा त्या मुलीच्या घरी गेल्या.
 
 
 
 
तेव्हा कळले की, मुलीवर अत्याचार झाला होता आणि ती बालिका गरोदर होती. वर्षा यांनी त्या मुलीच्या पालकांना विश्वासात घेतले. मुलीची काय चूक? तिला का शिक्षणापासून वंचित करायचे? नंतर वैद्यकीय उपचार करत त्या मुलीची गरोदरपणातून सुटका करण्यात आली. त्या मुलीला शाळेत आणण्याची -सोडण्याची आणि इतरही जबाबदारी वर्षा यांनी स्वीकारली. काही दिवसांतच दहावीची परीक्षा होती. तिचा अभ्यास घेत तिला आधार देत वर्षा यांनी तिला दहावीची परीक्षा द्यायला लावली. पुढे ती मुलगी दहावी उत्तीर्ण झाली, तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि ती सध्या चांगले आयुष्य जगत आहे. ही एकच घटना नव्हे, तर कुण्याही व्यक्तीला न्याय मिळावा, गरजूंचे आयुष्य उभे राहावे, यासाठी वर्षा सतत शांतपणे समन्वय साधतात. संघर्षापेक्षा त्यांचा समन्वयावर विश्वास आहे. त्यांचे पती वैभव यादव हे नेहमी त्यांना समर्थ साथ देतात. बौद्ध समाज आणि त्यातील समाजशील आश्वासक चळवळीमध्ये वर्षा या वैभव यांच्या सोबतच असतात.
 
 
 
 
तसे पाहायला गेले, तर वर्षा यांचे वडील बाळासाहेब हांडे हे जुन्नर मराठा समाजाचे मोठे प्रस्थ. मुंबईत त्यांनी अत्यंत कष्टाने जम बसवला. गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी राहत्या घरातच शाळा सुरू केली. वर्षाही याच शाळेत शिकायच्या. शाळा सुरळीत चालावी म्हणून वर्षा यांच्या आई रेखा यांनी दागिने मोडले आणि बाळासाहेब यांनी शेती विकली. याच काळात रेखा यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. डी.एड्ही केले. घरातल्या शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना पोटच्या मुलांसारखे सगळे हवे-नको ते पाहिले. तिचा दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी मावळायचा, हे तिलाच काय कुणालाही कधी कळले नाही. वर्षा हे सगळे पाहत होत्या. आई-वडील समाजासाठी किती झटतात आणि समाजही त्यातही सगळेच समाज आईवडिलांना किती प्रेम देतात, किती आदर करतात, हे वर्षा अनुभवत असत. वर्षा अभ्यासात हुशार होत्या. वकील व्हावे, असे त्यांना वाटे. दहावीनंतर त्यांच्या आयुष्याला वळण लागले. कारण, याच काळात त्यांची आई गंभीर आजारी पडली. ती अंथरूणावरून उठूही शकली नाही.
 
 
 
 
वर्षा यांनी ‘रूईया महाविद्यालया’त प्रवेश मिळाला होता, पण आईकडे लक्ष देण्यासाठी मग त्यांनी विक्रोळीच्या अस्मिता महाविद्यालयात प्रवेश घेतला. घरचे संपूर्ण काम त्यात स्वयंपाक, धुणीभांडी, स्वच्छता करून अंथरूणावरील आईला अंघोळ आणि तिचे सगळेच आटोपणे ही जबाबदारी वर्षावर आली. या सगळ्या परिस्थितीही वर्षा पदवी परीक्षेत महाविद्यालयात प्रथम आल्या. त्याच काळात त्यांच्या आईचे निधन झाले. या सगळ्या घडामोडीत शाळेचा पसारा वाढला होता. शाळेला वास्तू आणि अनुदानही मिळाले. त्यावेळी बाळासाहेब यांनी वर्षा यांना सुचवले की, शाळेकडे तू लक्ष दे. त्यामुळे मग वर्षा यांनी बी.एड्चे शिक्षण घेतले. पुढे प्रेमविवाह वैभव यादव या उच्चशिक्षित सुसंस्कारी व्यक्तीबरोबर झाला. आंतरजातीय विवाह म्हणून सुरुवातीला माहेरकडून थोडी कुरबूर झाली.
 
 
 
मात्र, वर्षा यांचे कर्तृत्व आणि अत्यंत समाजशील वृत्ती यामुळे पुढे तसा काही संघर्ष उद्भवला नाही. वर्षा यांच्या सासूबाई लिला यांनीही वर्षा यांना लेकीसारखे वागवले हे विशेष. बालपणातच अंगावर जबाबदार्या घेऊन वाढलेल्या वर्षा यांना सासूच्या रूपाने दुसरी आईच मिळाली. असो, ठाणे आणि ईशान्य मुंबईमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यामुळे वर्षा या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. वर्षा म्हणतात, शेवटच्या श्वासापर्यंत समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच जातीपातीच्या भिंती लंघून प्रत्येकाने भारतीय नागरिक म्हणून समाज, देशाचे हित साधावे, यासाठी जागृती करणार. शिक्षणातूनसामाजिक सलोखा निर्माण करणार्या वर्षा त्यांच्या ईश्वरी ध्येयात सफल होतील, हे नक्की.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.