मुंबई (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी भागातील वनविभागाच्या लागवड शेताजवळ बिबट्याची दोन पिल्ले गुरवारी दि. १ सप्टेंबर रोजी आढळून आली. या पिल्लांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी लागवड शेतातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही पिल्ले आढळून आली. तात्काळ वन विभागाच्या रेस्क्यू युनिटला कळविण्यात आले. रेस्क्यू युनिटच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन या दोन बिबट्यांच्या पिल्लांना ताब्यात घेतले.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले, परंतु, वन विभागाने शिताफीने कारवाई करत या पिल्लांना सुखरूप ताब्यात घेतले. या दोनही पिल्लांची पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. ही पिल्ले निरोगी असून या पिल्लांची आई सोबत पुनर्भेट घडवून देण्याचा प्रयत्न गुरवारी दि. १ सेप्टेंबर रोजी रात्री करण्यात आला. परंतु, या दरम्यान मादी बिबट्या त्या भागात नसल्याचे समोर आले. या पुनर्भेटीसाठी पुन्हा एका प्रयत्न करण्यात येणार आहेत. या पिल्लांमध्ये एक नर आणि एका मादी पिल्लाचा समावेश आहे. तर, तिसरे पिल्लू बिबट्या मादी सोबतच असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, आणि रेस्क्यू युनिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नेवारे हे आपल्या इतर वन कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते.