मुंबई : ज्या जलदगतीने आघाडी सरकारने विदेशी दारूला कर सवलती दिल्यात त्याच जलदगतीने फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून कर सवलती दिल्या असल्याचा कागदोपत्री एखादा पुरवा दाखवा, असे आव्हान देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा जोरादार हल्लाबोल केला. या प्रकरणी मा. उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची पेग्विन सेना भ्रम निर्माण करून मराठी माणसाला थापेबाजी आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्व निर्माण करायचे काम करीत आहे, असा आरोपही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
वांद्रे येथे भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्पावरुन शिवसेनेवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आमदार अॅड आशिष शेलार पुढे म्हणाले की, पेंग्विन सेनेकडून या घटनेबाबत भ्रम निर्माण केला जातो आहे. पेंग्विन सेना जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होता तर, या प्रकल्पाची पायाभरणी, भूमिपूजन झालं होतं का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे. फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो गुजरातला नेला गेला तर राज्यात तो होता कधी? त्याच्या जागेचा प्रश्न सोडवला कधी? करारनामा झाला कधी? या प्रश्नांची उत्तर आम्हाला पेंग्विन सेनेकडून हवी आहेत. केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्यांना हिणवणार असाल आणि घालून पाडून बोलणार असाल तर माझी मुख्यमंत्र्याना विनंती आहे की, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर पेंग्विन सेना देत नसेल तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा.
राज्यातील जनतेला याबद्दलची माहिती मिळाली पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असे आता चालणार नाही. महाराष्ट्र या भुलथापांना बळी पडणार नाही. त्यानंतर वेदांताचे सर्वेसर्वा अनिल अगरवाल यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितले, आम्ही महाराष्ट्रात हब करणार आहोत. राज्यात यामुळे रोजगार निर्माण होणार आहेत, मग पेंग्विन सेना असं का म्हणते की रोजगार गेले. राज्यात हा प्रकल्प येणार आहे असंही अगरवाल म्हणाले आहेत. दोन वर्ष झाले या प्रकल्पाची चर्चा चालू आहे. तर कशाच्या आधारावर तुम्ही म्हणत आहात की, तो गुजरतला गेला. दोन वर्ष चर्चा झाल्यानंतरही त्याबाबत करार चर्चा आणि समतीपत्र झाले नसेल आणि स्वत: पेंग्विन सेना प्रमुख म्हणत असतील आम्ही हा प्रकल्प आणला तर प्रत्यक्ष कामे का नाही झाली. या दोन वर्षाच्या काळात कट, कमिशन आणि वाटवारी झाली असावी असा संशय येतो आहे. मधल्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाचा महाराष्ट्राला उपयोग काय असा सवाल केला होता. यावरुन आम्ही उपस्थित केलेल्या कटकमिशनच्या शंकेला बळ मिळते आहे, असे सांगत आमदार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.