फॉक्सकॉन गुजरातला का नेला? वेदांताच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर!
14-Sep-2022
Total Views | 348
20
मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोपही सुरु असताना यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली. त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की, हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे. आमच्या इंडिपेंडंट एजन्सीनं असं ठरवलं की, गुजरात असं एक राज्य आहे ज्याने सिलिकॉन पॉलिसी सर्वात पहिले सुरू केली.” असे अग्रवाल यांनी सांगितले.
मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार!
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.