मंत्री गिरीश महाजनांनी घेतली कस्पटे कुटुंबियांची भेट! मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉलद्वारे संवाद
24-May-2025
Total Views | 18
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने सध्या राज्यात एकच खळबळ उडाली असून यावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शुक्रवार, २३ मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यात कस्पटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वैष्णवीच्या वडीलांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.
"वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठाम असून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनाला आधीच स्पष्ट निर्देश देण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीने व्हावी, यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. तसेच वैष्णवीच्या लहानग्या बाळाच्या भवितव्यासाठी कस्पटे कुटुंबीयांसोबत आम्ही देखील तितक्याच जबाबदारीने उभे राहू," अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे यांचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना सांत्वन दिले. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच या हृदयद्रावक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या कठीण काळात संपूर्ण प्रशासन आणि राज्य सरकार कस्पटे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.